Tuesday, December 29, 2009

आठवण

तुझी आठवण आली की,
मन माझं फुलपाखरु होतं.
भूतकाळाच्या बगीच्यामध्ये
तुझ्या सावलीमागे भिरभिरतं.

तुझाच चेहरा समजून ते
सुंदर फुलांवर स्थिरावतं;
तू नाहीस हे उमगल्यावर
तेही बिचारं हिरमुसतं.

पकडायला जातो तेव्हा
चिमटीतून हळूच निसटतं;
पण जाता जाता बोटांवर
तुझीच आठवण सोडून जातं...

- मंदार

Saturday, December 26, 2009

तू

आपल्याच नादात चालणारा मी
अन्‌ तशीच तूही
स्वतःच्याच विश्वात रमणारा मी
अन्‌ तशीच तूही.

कधी आपले रस्ते जुळले
दोघांनाही नाही कळले;
स्वतःपुरते विसरुन गेलो
दोघांचे सुंदर विश्व बनले.

त्या मंतरलेल्या क्षणांच्या आठवणी
पुनःपुन्हा जागवून जगणारा मी
अन्‌ तशीच तूही !

- मंदार

Wednesday, December 9, 2009

शोध


स्वतःच्याच शोधात मी
परत परत हरवतो आहे,
नाही उमगत माझे मलाच
कोणत्या वाटेवर मी चालतो आहे.

रेशीमबंधांच्या बेड्या जिथे
मंतरलेले हे चक्रव्यूह आहे,
दाखवित रस्ता माझा मलाच
रहस्य मीच उकलत आहे.

सोबत कुणीच येणार नाही
माझे मला हे माहीत आहे,
तरीही वेड्या आशेपायी
शोध माझा चालूच आहे...

- मंदार