ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, March 12, 2010

मंथन

एका कुंपणावर दोन पक्षी बसले होते. शिकार्‍यानं अचूक नेम साधून त्यातला एक पक्षी टिपला. तर कुंपणावर किती पक्षी शिल्लक राहिले? गणिती भाषेत (दोन वजा एक) एक... आणि प्रत्यक्षात, एकही नाही. गोळीच्या नुसत्या आवाजानंच दुसरा पक्षी घाबरुन उडून नाही का जाणार?

२६/११ ला मुंबईत किंवा १३/२ ला पुण्यात, एक पक्षी टिपला गेला, आणि दुसरा...? दुसरा पक्षी गोंधळून गेला. त्यानं प्रश्न उठवले - सरकारवर, पोलिस यंत्रणेवर. संशय घेतला - आजूबाजूच्या 'आपल्या'च लोकांवर. आणि पर्यायानं हातभार लावला - दहशतवाद्यांचा हेतु साध्य होण्यास...

मुंबईच्या हॉटेलमधल्या देशी-विदेशी पाहुण्यांनी, रेल्वेच्या प्रवाशांनी, जर्मन बेकरीच्या ग्राहकांनी, किंवा अगदी पोलीस खात्यातल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी, या दहशतवाद्यांचं काय वाईट केलं होतं? मग, अचानक एके रात्री हातात एके-४७ घेऊन किंवा टेबलखाली बाँब लपवून निरपराध लोकांची हत्या करण्याचं कारण काय?

१९४७ साली पुण्यातल्या एका जाहीर सभेत आचार्य अत्रे म्हणाले होते,
"काश्मीरवर ज्या रानटी आफ्रिडी टोळीवाल्यांनी आक्रमण केलेले आहे, त्या टोळ्या काही निव्वळ लुटालूट आणि चोर्‍यामार्‍या करण्यासाठी काश्मिरमध्ये घुसलेल्या नाहीत. त्यांच्याजवळ अद्ययावत यंत्रसामुग्री आणि शस्त्रास्त्रे आहेत. ही यंत्रे आणि शस्त्रे त्यांना कोण पुरवते? त्यांच्या मोटारीमध्ये पेट्रोल कोण ओतते? हा काही काश्मीरमधल्या जनतेचा उठाव नाही. या आक्रमणामागे पाकिस्तानी महत्वाकांक्षेचे एक जबरदस्त पाताळयंत्र आहे."
काश्मीर प्रांताचं महत्त्व सांगताना आचार्य अत्रे पुढं म्हणाले होते,
"काश्मिर गेले की पूर्व पंजाब गेलाच म्हणून समजा. पूर्व पंजाब गेला की दिल्ली गेली. दिल्ली गेली की भोपाल उठलेच आणि मग सारा उत्तर हिंदुस्थान धोक्यात आलाच म्हणून समजा."
गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ जे युद्ध आपल्या देशाच्या सीमेवर अव्याहत सुरु आहे, त्याची एक झलक म्हणजे २६/११ किंवा १३/२ सारख्या घटना. मुंबई-पुण्यापासून काश्मीर खूप दूर असल्यानं, तिथल्या गोळ्यांचे आवाज आपल्यापर्यंत पोचले नसावेत, असं दहशतवाद्यांना वाटलं असावं. म्हणूनच ते आवाज देशभर पसरवण्यासाठी त्यांनी सीएसटी, ताज, आणि जर्मन बेकरीची निवड केली असावी. काश्मीरमध्ये आजतागायत हजारो जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, आजही देत आहेत, आणि न जाणे कधीपर्यंत देत राहणार आहेत. पण, याच गोष्टींची जणू आपल्याला सवय झाली आहे, आणि म्हणूनच काश्मीरच्या कुंपणावर 'दोन वजा एक बरोबर एक' हे गणित जुळत आलं आहे. शिल्लक राहिलेल्या पक्ष्याला, आपापले राज्य, भाषा, सत्ता, यांच्या गदारोळात, पहिल्या पक्ष्याच्या हकनाक मृत्युची दखलही घ्यावीशी वाटत नाही. आपल्या घराजवळ अधूनमधून घडणार्‍या अशा घटना मात्र 'दोन वजा एक बरोबर शून्य' याचीच जणू आठवण करुन देतात.
अशा घटना घडून गेल्यानंतर प्रशासन, पोलीस यांना दोष देऊन काय फायदा? पोलीसांकडं एके-४७ सारखी शस्त्रं उपलब्ध करुन दिल्यानं मुंबईकरांना, पुणेकरांना, किंवा एकंदरीत सर्व देशवासीयांना सुरक्षित वाटू लागेल अशी आशा वाटते का? तसं असेल तर मग भारत-पाक सीमेवर उपलब्ध असणारी अद्ययावत शस्त्रं, रणगाडे, लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रं यांचं काय? ही युद्धसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन, जगातली तिसर्‍या क्रमांकाची सेना ज्यांच्या संरक्षणासाठी अहोरात्र उभी आहे, त्या भारतीयांना नेहमीच सुरक्षित वाटलं पाहिजे, नाही का? किंवा कदाचित, पोलीस खात्याचं कार्यक्षेत्र मर्यादीत करुन, प्रत्येक शहराच्या व गावाच्या सीमेवर एलओसी सारखं भारतीय सैन्य दल तैनात करण्यानं तरी 'सामान्य' नागरीकांना सुरक्षिततेची खात्री वाटू शकेल?

जरा विचार करुन बघा - खरोखर एके-४७ आणि बाँब ही त्या दहशतवाद्यांची ताकद होती का?
नाही! त्यांची ताकद होती - आपली 'चलता है' म्हणणारी मनोवृत्ती ! काश्मीरमध्ये धारातीर्थी पडणार्‍या प्रत्येक जवानाबद्दल आपण पेटून उठलं पाहिजे, त्याच्या मृत्युचा जाब विचारला गेला पाहिजे. सीमेवरच्या जवानांच्या मृत्युनं सजवलेलं आयुष्य आपण मोठ्या दिमाखानं मिरवत आहोत, त्या हुतात्म्यांचं स्मरणही न करता ! आपल्याला सुरक्षित ठेवणारा एकन्‌एक जवान जिवंत राहिला पाहिजे, अशी आपली भावना नसेल तर, रस्त्यावर गोळीबार करुन अथवा स्फोट करुन शेकडो लोकांचे प्राण घेणार्‍या दहशतवाद्यांचं नैतिक मनोधैर्य आपणच वाढवत आहोत, हे लक्षात घ्या.

यावर आपण काय करु शकतो? सर्वप्रथम स्वतःला समाजाचा एक भाग समजणं आवश्यक आहे. मग हा समाज, सर्वसामान्य नागरीक, सरकारी यंत्रणा, पोलीस, शासनकर्ते, न्याययंत्रणा, प्रसारमाध्यमं, या सर्वांनी मिळून बनलेला आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणं. मी एकटा काय करणार यासारख्या सबबी न देता, स्वतःपासून सुरुवात करणं. आपण सर्वांनी मिळून हा समाज इतका भ्रष्ट व दूषित केलाय की, कदाचित एक संपूर्ण पिढी त्याच्या साफ-सफाईमध्ये खर्ची पडेल. पण किमान येणार्‍या पिढ्यांना तरी आपण एक सुरक्षित व सुदृढ समाजाची हमी देऊ शकू.

विचार करा... एकदा निश्चय केल्यावर विचार प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही.

Share/Bookmark

2 comments:

  1. एकदम बरोबर.. आपण फक्त घटना झाल्या नंतर दिवे लावतो.. 2 मिनटे शांती ठेवून जैसे थे...

    ReplyDelete