ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, April 7, 2010

श्रीमंतांच्या तिजोर्‍या कशा उघडायच्या?

(प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या लेखावरुन)

नुकताच पार पडलेला आयपीएल लिलाव म्हणजे जबरदस्त यशस्वीतेचं उदाहरण मानावं लागेल. यामध्ये १० वर्षांसाठीच्या फ्रांचाईजेसना १,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली. शून्यातून सुरुवात करुन, केवळ तीनच वर्षांत भारतातील सर्वांत मोठा शो-बिझ इव्हेंट साकारण्यासाठी तर आयपीएल व्यवस्थापन प्रशंसेस पात्र आहेच. पण त्याबरोबरच त्यांनी आत्ताच्या फ्रांचाईजेस इतक्या जास्त किंमतीला विकल्या आहेत की, त्या खरेदी करणार्‍यांसाठी त्यातून पैसे कमविणं जवळजवळ अशक्यप्राय बनलं आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांनी आयपीएलचे हिशेब मांडले आहेत आणि प्रत्येकाचे अंदाज निरनिराळे येत आहेत. पण ढोबळमानानं पाहता, ताज्या लिलावातील विजेत्याला प्रति मोसम १७० कोटी रुपये नुसती फ्रांचाईज किंमतच मोजावी लागणार आहे. गेल्या हंगामात, खेळाडूंचं मानधन व प्रशासकीय खर्चासाठी साधारण ४५ कोटी रुपये खर्च आला (त्रयस्थ संशोधन केंद्रांच्या अंदाजानुसार). अशाप्रकारे, पैशाचं कालसापेक्ष अवमूल्यन विचारात न घेतादेखील, या फ्रांचाईजेसना नुसता खर्च भरुन काढण्यासाठी प्रति मोसम २१५ कोटी रुपये उत्पन्न मिळवणं भाग आहे. आयपीएलच्या दुसर्‍या मोसमातील कोणताही संघमालक सर्वाधिक ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकला नाही. म्हणजेच नव्या संघमालकांनी त्यांच्या संघांसाठी अवास्तव किंमत मोजली, हे उघड गुपित आहे. इतर उत्पन्नाच्या स्रोतांद्वारे हळूहळू आयपीएलकडं अधिक पैसा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्याबरोबरच अनेक धोकेदेखील संभवतात. नवनवीन संघांच्या समावेशामुळं आयपीएलचं प्रेक्षणमूल्य सौम्य होऊ शकतं. भारताच्या या सर्वांत मोठ्या रिऍलिटी शोची नवलाई उतरणीला लागू शकते. शेवटी, आयपीएल हा शो-बिझनेसचाच एक प्रकार आहे आणि अनिश्चितता हा त्याचा मुलभूत गुणधर्म आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, आयपीएलची प्रेक्षकसंख्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांच्याही खाली घसरु शकते. (तसाही, या मालिकांचा निर्मितीखर्च आयपीएलपेक्षा कितीतरी पटींनी कमी असतो.) या निष्कर्षाचे परिणाम महत्त्वपूर्ण ठरु शकतात.

असं असलं तरी, मोठमोठ्या उद्योगसमूहांनी या शो-बिझचा भाग होण्यासाठी मजबूत पैसा ओतला आहे. त्यांच्याकडं नक्कीच वित्त अधिकारी व सल्लागार असतील, ज्यांनी ही सर्व गणितं जुळवायचा प्रयत्न केला असेल. गुंतवणुकीवरील परतावा हा संघखरेदीमागील मुख्य उद्देश नसेलही कदाचित. पैशाव्यतिरिक्त अजून काहितरी फायदे त्यामागे असले पाहिजेत. आयपीएल संघाच्या मालकीतून मिळणारी झटपट दृश्य प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा इतर कोणत्याही मार्गानं मिळवणं अवघड आहे. तुमच्या बॅँक-खात्यामध्ये लाखो-करोडो रुपये असतील, पण तुम्हाला स्टेडियममध्ये बॉलीवूडच्या तारकांसोबत बसायची संधी मिळते का? तुमच्या संघाच्या प्रत्येक चौकार-षटकारासाठी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज तुम्हाला टाळी देतो का? सामन्यानंतरच्या पार्टीमध्ये सर्वांदेखत चिअरलीडर्सच्या ग्लासाला ग्लास भिडवण्याची संधी तुमच्या पैशानं मिळू शकते का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, असं करताना अख्खा देश तुम्हाला पाहत असतो का? नसेल तर मग नुसत्या गगनचुंबी इमारती आणि तेलसाठ्यांचा काय उपयोग? काही भागधारकांना आणि सतावणार्‍या बॅँकर्सना परतावा मिळवून देण्यासाठी? छे छे, तुमच्याकडं पैसा असेल तर, लोकांना तुमची किंमत कळालीच पाहिजे. आणि जर 'पेट्रोकेमिकल्स बनवायचं रटाळ काम करणारा' ही ओळख बदलून, 'कोची कूलनेस संघाचा मालक' अशी तुमची ओळख बनणार असेल तर, वर्षाला १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचं काही वाटणारही नाही.

खरंच की. एका आयपीएल संघाची मालकीच तुम्हाला झटपट प्रसिद्धी, उत्साह, ग्लॅमर मिळवून देऊ शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अलौकीक झळाळी आणू शकते. तुमच्याकडं विशेष कौशल्य किंवा जन्मजात कलागुण असण्याची काही गरज नाही. फक्त एकच गोष्ट हवी जिची चलती आहे - पैसा.

काहीजणांना हा सर्व प्रकार म्हणजे उथळ व्यावहारिकता वाटेल. मला मात्र यामध्ये, श्रीमंत भारतीयांकडून पैसे कसे उकळायचे याच्या भारी युक्त्या दिसतात. पाश्चिमात्य लक्ष्मीपुत्रांच्या तुलनेत, भारतातील श्रीमंत लोक आपल्या संपत्तीच्या खूपच क्षुल्लक प्रमाणात दानधर्म करतात. हा त्या लोकांचा खाजगी निर्णय असू शकतो, आणि खूपशा सेवाभावी संस्थांना भारतीय उद्योग क्षेत्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो. शेवटी, या सेवाभावी चळवळींतून नफा कमविण्याची संधी थोडीच मिळते? पण, आयपीएल लिलावांनी सिद्ध केलं आहे की, नफ्याच्या आशेशिवायही श्रीमंत लोक आपल्या तिजोर्‍या उघडतात आणि प्रचंड पैसा ओततात, फक्त तुम्ही एक गोष्ट सांभाळली पाहिजे - त्यांचा अहंकार. तुम्ही त्यांना जोपर्यंत खूष ठेवाल तोपर्यंत ते पैसा ओतत राहतील.

या श्रीमंत लोकांना आपण कुणीतरी महान व्यक्ती आहोत असं वाटायला लावणार्‍या गोष्टी देऊ करण्यात काहीच गैर नाही. यातून बहुविध संधी निर्माण होतील – उड्डाणपूल, सी लिंक, रस्ते, गल्ल्या, मेट्रो स्टेशन्स, एखाद्या मार्गावरील रेल्वे, यांना अशा श्रीमंत लोकांची नावं देता येतील – जे त्यासाठी बोली लावून अधिकाधिक पैसे मोजतील. एकदा का यासाठी चढाओढ सुरु झाली की, ही साथ वार्‍यासारखी पसरत जाईल आणि उद्याच्या बातम्यांमध्ये झळकण्यासाठी हे लोक एकमेकांच्या वरचढ बोली लावू लागतील. जर यातून चांगल्या कामांसाठी काही हजार कोटी रुपये उभे होणार असतील, तर त्यामध्ये गैर काय?

भरपूर निधी मिळवण्यासाठी, सरकार त्या दानशूर माणसाचं नाव नाणी व नोटांवर छापू शकतं - भले ते मर्यादीत काळासाठी का असेना. सरकारी महाविद्यालयांना श्रीमंत माणसांची नावं देता येतील – यातून फक्त पैसाच उभा राहणार नाही तर, त्यांच्या नावाचा वापर त्यांना संस्थेची गुणवत्ता राखण्यासही उद्युक्त करु शकेल.

नाममात्र अधिकार असणारी काही सरकारी पदं श्रीमंत लोकांना देऊ करता येतील. प्रचंड किंमत मोजून त्यांना एका वर्षासाठी द्वितीय उपाध्यक्ष असं काहितरी बनता येईल, ज्यायोगे त्यांना प्रत्येक परदेशी अधिकारी व पाहुण्यांसोबत फोटोमध्ये झळकायला मिळेल आणि एका साधारण खतनिर्मिती कारखान्याचा मालक यापेक्षा अधिक प्रतिष्ठेनं मिरवता येईल.

यापैकी काही सूचना विचित्रही वाटतील, पण निदान माझ्या बोलण्याचा रोख तरी तुमच्या लक्षात आला असेल. अहंकार हे माणसाच्या अंतरंगात राहणारं, कायम भुकेनं वसवसलेलं जनावर आहे. तो माणूस कितीही यशस्वी वा प्रसिद्ध असला तरी या जनावराला खाऊ घालावंच लागतं. ललित मोदी आणि आयपीएल व्यवस्थापनानं यालाच लक्ष्य करुन, दुप्पट भावानं संघ विकले आणि विशेष म्हणजे विकत घेणारे देखील शेवटी खूषच आहेत. या कामगिरीसाठी ते खरंच कौतुकास पात्र आहेत. निधी उभारणार्‍या संस्थांनी व शासकीय संस्थांनी रोख पैशाच्या मोबदल्यात प्रतिष्ठा व प्रसिद्धी देऊ करण्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे, खास करुन जेव्हा चांगल्या योजनांसाठी निधी अत्यंत आवश्यक असतो.

तोपर्यंत, तुमच्याकडं १,७०० कोटी रुपये पडून नसतील, तर तुम्ही नशीबवान आहात असं समजा. कधीकधी गरजेपेक्षा जास्त पैसा तुम्हाला असे बावळट प्रकार करायला लावतो. त्यापेक्षा टीव्हीवरच्या चीअरलीडर्स पाहणं कितीतरी चांगलं.


(स्रोतः http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/all-that-matters/How-to-make-the-rich-open-their-wallets/articleshow/5758477.cms)


Share/Bookmark

1 comment:

  1. Mast lihilay
    ani khare pan ahe te
    Baki trains ani ratyana nave denyachi kalpana ekdum bhannat :-)

    ReplyDelete