...सिंधुकाठी एक गरीब कोळी राहत होता. घरात चूहेसुद्धा यायचे नाहीत इतकं वाईट चाललेलं. ना बायकोला दागिना ना पोरांना कपडा. रोज रात्री मतलई वारे सुटले की जमिनीवरच उघड्यानागड्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या अंगावर आपलं नेसूचं धोतर पांघरून नुसत्या लंगोटीवर नदीकाठच्या तराफ्यावर बसायचं, बांबू खुपसत नदी नेईल तितकं आत जायचं. भोवर्यांमध्ये टोपली बुडवून बुडवून जे आत येईल ते - मासे, खेकडे, सुंगटे, शिंपले, कालवे मडक्यात टाकायचे, वारा पडला की पहाटे परत बांबू खुपसत खुपसत उघडं घरी. उघडीनागडी पोरं बापाला पाहताच दुडूदुडू पळत किनार्यावर येऊन मडक्यातले नुस्ते घेऊन परत पळत पळत जाऊन आईला ताजं ताजं तेच रांधायला लावायचे. कारण घरात दुसरं काहीच दिवसभर नसायचं. बायको मिळालेल्यातलाच थोडासा वाटा वाण्याला देऊन भात, मीठ, मसाला, तेल रोज लागेल तेवढं आणायची. इकडे चुलीवर स्वैंपाक होईपर्यंत कोळी चिलीम फुंकत ताटं मांडून रांगेनं समोर बसलेल्या पिल्लांकडे अपूर्व मायेनं पाहत बसायचा. मग तोही जेवून झोपी जायचा. असं रोज. अर्धं आयुष्य हेच चाललं. हेच कष्ट, हाच विरंगुळा, हीच करमणूक. निजसुख, आनंद. मग एकदा झोपेत स्वप्नात आपलं झोपलेलं नशीबच त्याला अचानक दिसलं. वा रे वा. काय डाराडूर झोपलं आहे. या अल्ला, हे इथे असं झोपलेलं असल्यानंच माझ्या घरात धनसंपदा येत नाही. कधी घरात इतरांकडे असतात तशा वस्तू येतील? निदान घर तरी इतरांसारखं कधी ह्या जागेत होईल? या अल्ला, मला मार्ग दाखव. असा खूप कल्ला केल्यावर मग अल्लानं त्याला असा सल्ला दिला की, त्याला झोपू दे, उठवू नकोस. ते एकदा उठलं, की पुन्हा झोपत नाही. तुला ते चालेल का? बघ, तुझा तू ठरव आणि कर तुला वाटेल तसं.
मग बायकोचा विचार घेऊन कोळीमहाशय स्वप्नात झोपलेलं नशीब जिकडे दिसलं होतं त्या अंदाजानं वाट काढत घराबाहेर पडले. सापडलं. एका मोडक्या तोडक्या खळ्यात पालापाचोळ्यावर झोपलेलं स्वप्नात पाहिलं होतं तसंच... संतापून त्याला लाथ घालून उठवत कोळी म्हणाला, माँके लौडे, ऊठ. मेरा ये हाल और तू सालोसाल सोया पडा अँ? ऊठ. त्यानंतर त्याचं नशीब त्याला तरातरा दूर, एका सतत गजबजलेल्या मोठ्या शहरात घेऊन गेलं. श्रीमंतीचा झगझगाट. कामधंदा काय तोटा? खाणं पिणं कपडे चंगळ. पण राहण्याची सोय कामधंद्याच्या पन्नास मैल दूर, वर खोप्यासारखी, कारण तिथपर्यंत ज्यांची नशीबं आधीच जागी झाली होती त्यांची घरंच घरं वर ७-७ मजली हसताहेत. रोज पहाटे अंधारात उठून कामावर जायचं, मिळेल ते खात काम करून रात्री घरी येताबरोबर जोडे काढण्याचीही सोय नसे, इतकी झोप. पुन्हा पहाटे तेच. हळूहळू तो तिथे श्रीमंत झाला. सगळ्या वस्तू खरेदी केल्या. बायको मुलं आली. पण त्यांना तो दिवसा कधीच घरी सापडायचा नाही. दिवसेंदिवस अनेक भानगडींमध्ये अडकून पडलेला तो घरी उशिरा परततांना नेहमी म्हणायचा, सालं हे नशीब पुन्हा झोपणार नाही का? ते सुखाचे दिवस पुन्हा येणारच नाहीत का?
यावर शेवटून अवलियासाहेब मोहमदराम म्हणायचे, एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल.
('हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' - भालचंद्र नेमाडे)

झोपलेल्या नशीबाची गोष्ट