ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, December 29, 2018

ही हॅज अराईव्ह्ड !!

शाहरुख आणि सलमाननंतर एन्ट्रीला टाळ्या घेणारा हिरो कोण?

अजय देवगण आणि अक्षय कुमारनंतर "माईन्ड इज ब्लोईंग जी" म्हणायला लावणारे ऐक्शन सीन्स देणारा हिरो कोण?

रजनीकांतपासून सलमानपर्यंत प्रत्येकानं आपापली स्टाईल बनवली, पण स्टाईल आणि एनर्जी दोन्ही एकसाथ पेश करणारा 'आजचा' हिरो कोण?

सलमानच्या 'युनिक' डान्स स्टेप्स आणि शाहरुखचं 'फॅमिली अपील' एकाच पॅकेजमध्ये देणारा हन्ड्रेड पर्सेन्ट एन्टरटेनर कोण?

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहीत शेट्टीनं एकाच पिक्चरमध्ये दिलीत...

येस्स, सिम्बा !!

रणवीर सिंगचा 'संग्राम भालेराव' एकाच वेळी इन्स्पेक्टर विजय, चुलबुल पांडे, आणि बाजीराव सिंघम या सगळ्यांची आठवण करुन देतो आणि तरीसुद्धा फ्रेश, नवाकोरा आणि हवाहवासा वाटतो. एक हळवा भाऊ, एक आदर्श मुलगा, एक समजदार बॉयफ्रेन्ड आणि शेवटी एक डॅशिंग पोलिस ऑफिसर... बॉलीवूडचा सुपरस्टार होण्यासाठी पर्फेक्ट रेसिपी !

आपल्या लक्ष्याचं (लक्ष्मीकांत बेर्डेचं) एक फेमस गाणं आहे,

"मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं..."

सिम्बा इज दॅट विनिंग मोमेंट फॉर रणवीर !!

#Simmba

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६





Share/Bookmark

Tuesday, December 25, 2018

साने गुरुजींबद्दल पु. ल. देशपांडे




Share/Bookmark

Sunday, December 2, 2018

'वजन'दार शिक्षणाची गोष्ट

'वजन'दार शिक्षणाची गोष्ट
दै. सामना । उत्सव
रविवार, २ डिसेंबर २०१८
>> मंदार शिंदे

सध्या इनपुट-आऊटपुटचा जमाना आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करणे आवश्यक झाले आहे. किती इनपुटमध्ये किती आऊटपुट मिळाले यावरून संबंधित प्रक्रियेची कार्यक्षमता आणि नफा-तोटय़ाचा हिशेब घालणे सोपे जाते; परंतु शिक्षण क्षेत्रात मात्र अजून तरी असा हिशेब शक्य झालेला दिसत नाही. एका शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याने किती ज्ञान आत्मसात केले याचे मोजमाप नक्की कोणत्या युनिटमध्ये करावे हेच अजून ठरत नाही आहे. शिक्षणाचा (तात्त्विक) उद्देश ‘शिकणाऱयाच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणणे’ असा आहे. परंतु, स्थळ, काळ, व्यक्ती आणि परिस्थितीनुसार गुणवत्ता आणि सुधारणा या दोन्ही संकल्पनांचे संदर्भ बदलत जातात हेही खरंच. मग शिक्षण घेणाऱया व्यक्तीच्या आयुष्यात कोणता बदल झाला म्हणजे गुणवत्तापूर्ण सुधारणा झाली असे म्हणता येईल ? प्रश्न कठीण आहे, म्हणूनच बहुतेकांनी आपल्यापुरती सोप्या उत्तरांची सोयदेखील करून घेतलेली आहे.

उदाहरणार्थ, जास्तीत जास्त पगाराची नोकरी मिळवून देणारे शिक्षण जास्त चांगले असे कित्येकांना वाटते. शिक्षण घेणाऱया व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणे अशा मर्यादित हेतुने दिले-घेतले जाणारे शिक्षण ही आजची वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत, मुलांना शाळेचे वातावरण आवडते का, त्यांच्यातील कला-कौशल्यांना तिथे पुरेसा वाव मिळतो का, त्यांना पडणाऱया सर्व प्रश्नांना तिथे उत्तरे मिळतात का, त्यांना आपल्या भावना आणि कल्पना मुक्तपणे मांडता येतात का, या प्रश्नांवर सहसा चर्चा होताना दिसत नाही. मग पालक, शिक्षक, संस्था, माध्यमे, लोकप्रतिनिधी हे सर्व घटक नक्की कशावर विचार आणि चर्चा करताना दिसतात? अगदी ताजेच उदाहरण घ्यायचे झाले तर, ‘दप्तराचे ओझे’ हा सध्या राष्ट्रीय चर्चेचा विषय झालेला आहे.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळेत जाणाऱया मुलांच्या दप्तराचे वजन किती असावे हा मुद्दा याआधीही बऱयाचदा माध्यमांमध्ये चर्चिला गेला आहे. काही राज्यांच्या उच्च न्यायालयांकडून संबंधित यंत्रणेला ‘दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत’ सूचनाही दिल्या गेल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर लक्षद्वीप प्रशासनाच्या सचिवांचे एक परिपत्रक फिरते आहे. या परिपत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका आदेशाचा संदर्भ दिला आहे, ज्यानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विषय अध्यापन आणि दप्तराच्या वजनाबाबत नियमावली बनविण्यास सांगितले आहे. तसेच, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये आणि भाषा व गणित याव्यतिरिक्त इतर विषय शिकवू नयेत, अशा स्वरूपाच्या सूचनाही केलेल्या दिसत आहेत. प्रत्यक्षात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ सोशल मीडियावर फिरणाऱया एका परिपत्रकाभोवती ‘शिक्षण’विषयक चर्चा घुमते आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 21 जुलै 2015 रोजी शासन निर्णय क्रमांक ‘दओझे-1814/प्र.क्र.165/एस.डी.4’ अन्वये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतच्या उपाययोजना प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये, दप्तराचे वजन विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्केपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट नमूद केले आहे. कमी जाडीच्या वह्या वापरणे, पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त अनावश्यक लेखन साहित्य व पुस्तके टाळणे, कमी वजनाचे कंपास बॉक्स आणि बॅग विकत घेणे, असे उपाय पालकांसाठी सुचवले आहेत. त्याचबरोबर, दप्तराचे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने वेळापत्रकाची आखणी करणे, कार्यानुभव, चित्रकला, संगणक इत्यादी विषयांचे साहित्य शाळेतच ठेवणे या गोष्टींची काळजी शाळेने घ्यावी असे म्हटले आहे. शिवाय, शालेय पोषण आहार आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय शाळेतच करुन विद्यार्थ्यांच्या दप्तरातून डबा आणि पाण्याच्या बाटलीचे वजन पूर्णपणे टाळण्यासही सांगितले आहे. शक्य असेल तिथे ई-पुस्तकांवर भर देण्याची सूचनाही दिसून येते.

2015 साली राज्य शासनातर्फे सुचवण्यात आलेल्या या उपाययोजनांची अंमलबजावणी 2018 साल संपत आले तरी झालेली दिसत नाही. या परिस्थितीत, केंद्रीय मंत्रालयाकडून आणखी एक परिपत्रक आले म्हणून खरेच काही फरक पडणार आहे काय ? महाराष्ट्र राज्याचाच विचार करता, शालाबाह्य मुलांचा प्रश्न शिक्षण हक्क कायद्याला दहा वर्षे होत आली तरी सुटलेला नाही. स्थलांतरित मुलांच्या शाळाप्रवेशात व शिक्षणात अजूनही अडचणी येत आहेत. शिक्षण हमी पत्रकाबाबत शाळांची उदासीनता चिंताजनक आहे. पुण्यासारख्या स्मार्ट आणि मेट्रो सिटीतील शाळांमध्ये मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नाही. एका बाजूला वेगाने विस्तारत चाललेल्या शहराच्या विविध भागांतून होणाऱया विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीकडे पालक, शाळा आणि प्रशासन या सर्वांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केलेली आहे, तर दुसऱया बाजूला स्थलांतरित समूहातील मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार परिसरातील शाळाही उपलब्ध नाहीत आणि शालेय वाहतुकीची व्यवस्थाही परवडणारी नाही. अशा मूलभूत सुविधांचीच कमतरता असताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन केंद्र शासन अथवा राज्य शासन कसे नियंत्रित करणार आहे कोण जाणे!

एका शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याने किती किलो वह्या-पुस्तकांची ने-आण केली. यावरून त्याने/तिने किती किलो ज्ञान आत्मसात केले याचे मोजमाप करता आले तर कदाचित ‘दप्तराचे वजन’ हा शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक म्हणता येईल असेच यानिमित्ताने वाटते.

– shindemandar@yahoo.com 
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत.)
(Click on image to read)



Share/Bookmark

Thursday, November 15, 2018

आठवण सुहास शिरवळकरांची...

नातं शब्दांपलीकडचं...
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

साधारण १९९८-९९ च्या दरम्यानची गोष्ट आहे. वाचनाची आवड वाढत चालली होती.  पंचतंत्र, अकबर-बिरबल, इसापनीती, रामायण-महाभारत वाचता-वाचता पुस्तकांचा आकार वाढत चालला होता. फास्टर फेणे आणि चंपक-चांदोबा मागं पडू लागले होते. मराठी साहित्याच्या पंगतीमध्ये ‘मृत्यंजय’ आणि ‘स्वामी’सारख्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत होतो. त्याचवेळी वपुंच्या कथा सात्विक पोळीभाजीपासून चखण्यातल्या शेव-चकलीपर्यंतचे अनुभव देत होत्या. पुलंच्या पुस्तकांतून कधी साखर-फुटाणे तर कधी शिरा-भाताची तृप्ती लाभत होती. आणि अगदी त्याच काळात कडक तंदुरी चिकनचा अनुभव देणारं एक पुस्तक हाती लागलं. अर्पण पत्रिकेनंच निम्मा गड सर केला होता...

"त्या सर्व वाचकांना, ज्यांनी 'दुनियादारी' विकत घेतली, वाचनालयातून वाचली, मित्राची ढापली, वाचनालयाची पळवली... पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं ! त्यांनाही, ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला ! आणि... खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना, ज्या 'दुनियादारी' जगल्या... जगतात… जगतील !"

येस्स ! ते पुस्तक होतं, सुहास शिरवळकर लिखित 'दुनियादारी'. हे पुस्तक पहिल्यांदाच वाचणाऱ्या सगळ्यांचं होतं, तसंच माझंही झालं. 'दुनियादारी'नं अक्षरशः गारूड केलं. दिग्या, श्रेयस, सुरेखा, शिरीन, श्रोत्री... अख्खी कट्टा गँग ओळखीची झाली. कित्येक प्रसंग अगदी आपल्याच आजूबाजूला घडलेत, घडत आहेत असं वाटू लागलं. मैत्री, प्रेम, धाडस, थ्रिल... यांभोवतीच विचार फिरु लागले. पुढं पुण्याला आल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर, एस. पी. कॉलेजवर जाऊन 'दुनियादारी'तले प्रसंग री-लिव्ह करणं. दिग्याचा कट्टा, अलका टॉकीज, रीगलपासून ते शिरीनच्या बंगल्यापर्यंत सगळी ठिकाणं पायी फिरुन शोधली होती. शनिवार पेठेतल्या सुशिंच्या घरापर्यंतही पोहोचलो होतो, पण थेट घरात जाऊन त्यांना भेटायचं धाडस तेव्हा झालं नाही. सिनेमात किंवा सर्कशीत सिंहाचे खेळ बघायला आवडतात म्हणून कुणी 'चला, गुहेत जाऊन सिंहाची आयाळ खाजवून येऊ' असं म्हणेल का ? पण आता वाटतं, त्यावेळी धाडस करायला हवं होतं... असो.

तसं अगदीच वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण सुहास शिरवळकरांशी माझी आधीच दोनदा भेट झाली होती. साधारण १९९९ साली काही महिन्यांच्या अंतरानं ते भेटले होते. निमित्त होतं त्यांच्या प्रकट मुलाखतीचं. पहिली भेट झाली सांगलीतल्या वि. स. खांडेकर वाचनालयात. सुशिंचा लेखन प्रवास, त्यांच्या पुस्तकांमागील प्रेरणा, रहस्यकथांपासून सामाजिक कादंबऱ्यांपर्यंत त्यांची अफाट साहित्य निर्मिती, अशा अनेक गोष्टींवर सुशि दिलखुलासपणे व्यक्त झाले. विशेष लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी म्हणजे सुशिंचं प्रवास-प्रेम आणि लेखन-शिस्त.

आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये गावांची, स्थळांची, हॉटेल्स आणि कॉलेजेसची, निसर्गाची एवढी हुबेहूब वर्णनं सुशि कशी करतात, हे मला पडलेलं कोडं होतं. तोपर्यंत कोवळीक, सालम, दास्तान वगैरे काही पुस्तकं वाचून काढली होती. पुणे-मुंबई हाय-वे वरची हॉटेल्स आणि ढाबे, पुण्या-मुंबईतलेच नाही तर राजस्थानातल्या गावांतल्या गल्ली-बोळांची डिटेल वर्णनं त्यांच्या कथांचा अविभाज्य भाग आहेत. सुशिंनी आपल्या लाडक्या 'बॉबी'वरून लांबलांबचा प्रवास कसा केला आणि आपल्या लेखनात त्याचा उपयोग कसा केला, हे त्यांनी मुलाखतीत मोकळेपणानं सांगून टाकलं.

दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, एकावेळी अनेक विषयांवर लेखन करण्याच्या पद्धतीची. तेव्हा आत्तासारखे कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधले स्टोअरेज आणि सॉर्टींगचे पर्याय उपलब्ध नव्हते. आज गुगल ड्राईव्हवर सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स आपण लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप अशा कुठल्याही माध्यमातून ऐक्सेस करू शकतो, कॉपी-पेस्ट, एडीट करू शकतो. पण या गोष्टी अस्तित्वात नसताना सुशिंनी एका शिस्तबद्ध पध्दतीनं अक्षरशः शेकडो पुस्तकं लिहिली. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, एका कथेवर काम सुरु असताना अचानक दुसराच प्रसंग किंवा कल्पना सुचली की ते वेगळ्या पानावर लिहून त्यांच्या शेल्फच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेऊन द्यायचे. पुढं त्या थीमवर लिहायला घेतलं की पाच-दहा प्रसंग आधीच लिहून झालेले असायचे. यामुळं कथा लिहून पूर्ण व्हायचा स्पीड वाढायचा आणि अचानक सुचलेली कल्पना हरवायची भीतीही नसायची. वाचकांसाठी आणि खास करून होतकरु लेखकांसाठी सुशिंच्या या टिप्स खूपच मोलाच्या होत्या.

सुशिंच्या मुलाखतीचा एक सेक्शन हमखास 'डेडीकेटेड टू दुनियादारी' असायचा. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं 'दुनियादारी'वर एकही प्रश्न विचारला नसल्यास श्रोत्यांमधून नक्की यावर प्रश्न यायचे. 'दुनियादारी सत्य घटनेवर आधारित आहे काय' अशा निरुपद्रवी चौकशांपासून ते 'दुनियादारीचा शेवट गोड नसता का करता आला' अशा तक्रारींपर्यंत सगळ्या प्रश्नांना सुशि हसतमुखानं सामोरे जायचे, प्रामाणिक आणि पटणारी उत्तरं द्यायचे. कसलाही साहित्यिक अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात नसायचा. वि. स. खांडेकर वाचनालयातल्या त्या मुलाखतीदरम्यान तर ते 'दुनियादारी'बद्दल जास्तच खूष होऊन बोलले. अर्थात त्याला कारणही तसंच विशेष होतं. त्या मुलाखतीआधी काही दिवस मुंबईची एक तरुण कलाकारांची टीम त्यांना भेटून गेली होती. 'दुनियादारी'वर सिनेमा बनवायचं प्रपोजल घेऊन ते आले होते आणि नुसत्या प्रपोजलमुळं सुशिंना झालेला आनंद त्या मुलाखतीत प्रत्येकाला जाणवत होता.

मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर अनौपचारिक गप्पा झाल्या. सुदैवानं तेव्हा कुणाकडंच मोबाईल फोन नव्हते. त्यामुळं सेल्फीच्या चक्रव्यूहात न अडकता, ऑटोग्राफ करत असताना सुशिंसोबत खूप लोकांना बोलता आलं. मी मला आवडलेली पुस्तकं, प्रसंग, पात्रं याबद्दल थोडंसं बोललो. त्यांनी शांतपणे, लक्षपूर्वक ऐकून घेतलं. एक-दोन किस्से ऐकवले, न छापलेल्या काही 'बिहाईन्ड द सीन्स' गोष्टी सांगितल्या.

त्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा गणेश वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सुशिंच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाखत नेहमीप्रमाणं झकास झाली. औपचारिक कार्यक्रम संपल्यावर इतर उपस्थितांसोबत मीही त्यांना भेटायला गेलो. मला बघितल्याबरोबर सुशि म्हणाले, "अरे, वि. स. खांडेकरमध्ये आपण भेटलो होतो ना ? सॉरी, मी तुझं नाव विसरलो." नाव विसरायला मी त्यांना माझं नाव सांगितलंच कुठं होतं ? तरी त्यांनी नुसता चेहरा लक्षात ठेऊन आपणहून ओळख दिली होती... अगदी अनपेक्षित ! त्यानंतर काही वर्षांनी सुशि गेल्याची बातमी कळाली तेव्हा थेट काळजात कळ उठली होती, ती मात्र अनपेक्षित नक्कीच नव्हती. छापलेल्या शब्दांच्या पलीकडं जाऊन त्यांनी आपल्या वाचकांशी नातं कसं प्रस्थापित केलं होतं, ते मी प्रत्यक्ष अनुभवू शकलो हे माझं भाग्यच !



Share/Bookmark

जीवन उसका पानी है (कथा)

"जीवन उसका पानी है ।"
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

"डॅड, व्हाय आर वी नॉट टेकींग द कार अप देअर ? आय डोन्ट थिन्क आय कॅन वॉक ऑल द वे." बारा वर्षांच्या अथर्वनं त्याच्या डॅडकडं अधिकृत तक्रार नोंदवली.
"येस डॅड, वी शुड हॅव टेकन द कार. कॅन यु प्लीज कॉल द ड्राइव्हर ऐन्ड आस्क हिम टू पिक अस अप ?" सोळा वर्षांच्या अस्मितानं अथर्वला पाठींबा देत म्हटलं.
अजयनं या दोघांनाही काहीच उत्तर दिलं नाही. त्यानं फक्त हसून बायकोकडं, म्हणजे अनुपमाकडं बघितलं. तीही मुक्यानंच हसत पुढं चालत राहिली. आणखी थोडा वेळ अथर्व आणि अस्मिताची कुरबूर सुरु राहिली. पण  डोंगर चढताना पुढच्या वळणावर त्यांना समोर खूप खोल दरी, त्यातून वाहत जाणाऱ्या नदीचा संथ निळा प्रवाह आणि सभोवताली हिरवीगार झाडी दिसली. या निसर्गरम्य दृश्यानं दोन्ही मुलांचा थकवा आणि कुरबूर कुठल्या कुठं पळाली.
"वॉव, दॅट्स अमेझिंग... ती कुठली रिव्हर आहे डॅड ?" अथर्वनं मध्येच थांबून विचारलं.
"ती जीवनी नदी आहे, बेटा !" अजयनं कौतुकानं नदीकडं बघत उत्तर दिलं.
"जीवन मीन्स वॉटर, राईट डॅड ?" अस्मितानं विचारलं.
"तुला गं काय माहीत 'जीवन'चा अर्थ ?" अनुपमानं आश्चर्यानं आणि कौतुकानं आपल्या मुलीकडं पाहिलं.
"ओह मम्मा, आय रिमेम्बर दॅट पोएम फ्रॉम चाइल्डहूड... 'मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है ।' करेक्ट ना ?"
"संदर्भ चुकीचा दिला तरी अर्थ बरोबर सांगितलाय कन्येनं," अजय हसत हसत अनुपमाला म्हणाला. तिनंही हसून अस्मिताच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुढं चालू लागली.
"चला, असं थांबत थांबत संध्याकाळ होईल इथंच. वर सगळे आपल्यासाठी खोळंबले असतील."
"आपल्यासाठी नाही मम्मा, ओन्ली फॉर डॅड ! ही इज द सेलिब्रेटी गेस्ट टुडे," अस्मिता म्हणाली.
"नाही रे बाळा, मी कुणी सेलिब्रेटी वगैरे नाही. मी याच गावातला एक उनाड, खोडकर मुलगा आहे." अजय जुन्या आठवणींत हरवत म्हणाला.
"डॅड, यू ऐन्ड खोडकर ? तुम्ही कुणाच्या खोड्या काढायचे ? आय कान्ट बिलीव्ह इट !" अथर्वनं अविश्वास दाखवत म्हटलं.
"अरे, तू अजून याचे लहानपणीचे किस्से ऐकले नाहीत. सगळ्याच बाबतीत तुमचा 'बाप' आहे तो !" अनुपमाच्या या वाक्यावर चौघेही खळखळून हसले.
"ओ अजयदादा, ओ वैनी..." डोंगरावरून त्यांना हाका मारत किशोर आणि साईनाथ पळत येताना दिसले.
"अरे हो हो, सावकाश. काय झालं, तुम्ही धावत-पळत का आले खाली ?" ते दोघं जवळ आले तसं अजयनं विचारलं.
"पळत येऊ नको तर काय करु ? सम्दी लोकं खोळांबल्यात वर आन् तुम्मी दांडीयात्रंला चाल्ल्यागत निगालाय जनू," धापा टाकत किशोर म्हणाला.
"तरी आमचं आबा म्हनले हुतेच, त्यो ल्येकाचा गाडी आननार न्हाई वर, चालतच येनार !" छोटा साईनाथ बडबडला. त्याच्या निरागस बोलण्यावर अनुपमा, अजय आणि दोन्ही मुलं मनापासून हसली.
"ए गप रे, काय बी बोलतुस," किशोरनं त्याला दटावलं. मग अनुपमाकडं वळून म्हणाला, "वैनी, तुम्ही तरी सांगायचं ना दादांना. पोरं बगा किती दमलीत चालून चालून..."
"असू दे हो, किशोरभाऊ. काही दमत-बिमत नाहीत एवढंसं चालून. त्यांनासुद्धा जरा डोंगर चढायचा अनुभव घेऊ द्या की." अनुपमा हसत हसत म्हणाली. दोन्ही मुलं खरंच आता उड्या मारत पुढं निघाली होती.
"वा वा ! दोघं सारक्याला वारकी भेटलाय बगा तुम्ही," किशोर अजय-अनुपमाकडं आळीपाळीनं बघत म्हणाला. "बरं मग चला बघू आता चटचट. कारेक्रमाची सम्दी तैयारी करून आलुय वर. तुम्ही पोचला की खुर्च्या मांडायच्या आन् भाशन ठोकायचं..."
"अरे वा, तू कशावर भाषण करणार आज किशोर ?" अजयनं आश्चर्यानं विचारलं.
"काय दादा, गरिबाची चेश्टा कर्ताय व्हय ? माझं भाशन आयकून गडावरचे मावळे कापलेल्या दोरावरनं पळून जात्याल. भाशन तर तुमचं आयकायचं हाय."
बोलत बोलत मंडळी डोंगरमाथ्यावर येऊन पोहोचली. समोर देवीचं एक पुरातन मंदिर होतं. अलीकडंच मंदिराची डागडुजी आणि रंगरंगोटी केलेली दिसत होती. लहान असताना अजय कित्येकदा शाळा चुकवून मित्रांसोबत या मंदिरात येऊन बसायचा. त्यावेळी हे मंदिर अगदीच पडक्या अवस्थेत होतं. आजूबाजूला झाडं तर सोडाच, खुरटं गवतसुद्धा मुश्किलीनं दिसायचं. डोंगरमाथा म्हणजे एक उजाड माळ होता. खरं तर डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं त्यांचं गावसुद्धा असंच उजाड होतं. गावकऱ्यांचं उत्पन्नाचं मुख्य साधन शेतीच होतं, पण शेतीसाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी, त्याचीच टंचाई होती.
तसं बघितलं तर डोंगराच्या एका बाजूनं वाहणाऱ्या जीवनी नदीचं पात्र खूप मोठं होतं. उन्हाळ्यातसुद्धा नदीला थोडं का होईना पण पाणी असायचंच. पण नदी आणि गावाच्या मधे हा मोठ्ठा देवीचा डोंगर होता. डोंगरापलीकडून पाणी गावात आणण्याची काहीच सोय नव्हती. गावातल्या छोट्या विहिरी-नाल्यांवरच सगळी माणसं अवलंबून होती. त्यामुळं शेती, प्राणी, माणसं, सगळेच पाण्यावाचून असमाधानी आणि अतृप्त राहत होते. अलीकडच्या एक-दोन पिढ्यांतली तरूण माणसं गावातल्या परिस्थितीला वैतागून नोकरी-धंद्यासाठी शहराकडं वळू लागली होती.
शाळा चुकवून अजय, संभा, हनमा, पक्या, अशी मित्रमंडळी मंदिरात जमायची. माळावर खेळून-हुंदडून दमली की मंदिराच्या दगडी सभामंडपात पडून रहायची. उन्हातान्हात खेळून, आरडा-ओरडा करून घशाला कोरड पडलेली असायची. पण डोंगरावर पाण्याची सोय कुठून असणार. मग इच्छा नसताना त्यांना धावत-पळत डोंगर उतरून घर गाठावं लागायचं. घरी गेल्याशिवाय पाण्याचा थेंबसुद्धा मिळणं कठीण होतं.
"या या या, अजयराव ! नमस्कार वहिनी ! मला वाटलंच होतं तुम्ही गाडी खाली लावून वर चालत येणार. या, बसा इथं. दमला असाल. पाणी घ्या." गावचे सरपंच संभाजीराव स्वतः हातात तांब्याभांडं घेऊन स्वागताला सामोरे आले. अजयनं त्यांच्या हातातला तांब्या घेऊन अनुपमाकडे दिला आणि आपल्या शाळासोबत्याला कडकडून मिठी मारली.
"संभा, लेका अजयराव काय म्हणतोस ? आपली शाळेतली नावं विसरलास का काय ?"
"माझ्या सगळं लक्षात हाय, अज्या. पन आता पोरं मोठी व्हायला लागलीत, त्यांच्यासमोर जपून बोलायला लागतंय." संभाजीराव हसत हसत म्हणाले.
"होय, तुमचा जपून सांगितलेला निरोप साईनाथनं ऐकवला आम्हाला वाटेतच," अनुपमानं चेष्टेत भाग घेत म्हटलं. आपण साईनाथसमोर काय बोललो होतो ते आठवून संभाजीरावांनी जीभ चावली.
"सॉरी बरं का वहिनी ! त्याचं काय आहे ना, कितीही ठरवलं तरी काही शब्द तोंडातच बसलेत लहानपणापासून. आणि ही पोरं तेवढंच ऐकून कुठंतरी बोलून येत्यात. कुठं गेला त्यो साईनाथ ?"
"आबा, साईनाथ गेलाय अजयदादांच्या पोरांना घेऊन, मंदिर दाखवायला. आपन कारेक्रम सुरु करावा काय ? सम्दी लोकं खोळांबल्यात," किशोरनं पुढं येत आठवण केली.
"होय होय, करुया सुरु. आपण नंतर निवांत गप्पा मारत बसू, अजयराव" असं म्हणत संभाजीराव मंदिराच्या दिशेनं चालू लागले. अजय आणि अनुपमा त्यांच्या मागोमाग निघाले.
मंदिराच्या सभोवताली छान बाग फुलवली होती. समोरच्या पटांगणात छान हिरवळ उगवली होती. मंदिराच्या पायऱ्यांसमोरून जाणाऱ्या पायवाटेवर मधोमध छोटा हौद बांधला होता. हौदातल्या पाण्यावर कमळाची पानं पसरली होती आणि मधूनमधून काही कळ्या तर काही उमललेली कमळाची फुलं दिसत होती. हौदाच्या मध्यभागी छोटा दगडी कारंजा होता.
बागेच्या पलीकडं सावली देणारी मोठी झाडं ऐसपैस लावलेली होती. त्याच झाडांच्या सावलीत मोठ्या सतरंज्या अंथरून गावातली माणसं बसली होती. समोर चार-पाच लाकडी खुर्च्या आणि एक लाकडी टेबल मांडलं होतं. एका खुर्चीवर गावातले वयस्कर गुरुजी बसले होते. त्यांना बघताच अजय चटकन पुढं आला आणि त्यानं आदरानं वाकून गुरुजींना नमस्कार केला. अनुपमाची ओळख करून दिली. मग अजय आणि अनुपमा शेजारच्या खुर्च्यांवर बसले आणि संभाजीरावांनी कार्यक्रमास सुरुवात केली.
"मंडळी, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या गावाची आणि या परिसराची अवस्था काय होती, ते आपल्यापैकी जुन्या-जाणत्या लोकांना आठवत असेलच. पाण्यावाचून आपल्या गावाची खुंटलेली प्रगती आपल्याच लोकांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरु व्हावी, यासारखा दुसरा आनंद नाही. डोंगरापलीकडून वाहणाऱ्या जीवनी नदीचं पाणी डोंगर ओलांडून आपल्या गावात आणण्याची किमया तुम्ही सगळ्यांनी करून दाखवली आहे. एवढंच नाही तर, डोंगरमाथ्यावरच्या या मंदिर परिसराचं रूपसुद्धा पाणीपुरवठ्यामुळं बदलून गेलेलं तुम्ही स्वतःच अनुभवत आहात. आपल्या गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून शक्य ती सर्व मदत करणारे, आपल्याच गावचे सुपुत्र, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ते माझे शाळासोबती, वर्गमित्र आहेत, असे अजयराव आज सहकुटुंब आपल्या भेटीला आले आहेत. अजयरावांनी शहरात जाऊन नुसतंच शिक्षण घेतलं असं नाही, तर काही वर्षे नोकरीतून अनुभव मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की, आपल्या गावचे अजयराव आज एक यशस्वी उद्योजक बनले असून, धंद्यातल्या यशाइतकंच त्यांनी आपल्या गावच्या विकासाला महत्त्व दिलं आहे. गावातल्या पाणीपुरवठा योजनेची संकल्पना, आखणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये त्यांनी स्वतःचा वेळ, पैसा, कौशल्य या सगळ्यांचं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीमुळंच आपण गेल्या पंधरा-सोळा वर्षांत टप्प्याटप्प्यानं गावाचा कायापालट करू शकलो आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं मी स्वागत करतो. त्यांनी आता आपल्याशी संवाद साधावा, आपलं मनोगत व्यक्त करावं, अशी मी त्यांना विनंती करतो."
टाळ्यांच्या कडकडाटात संभाजीरावांनी अजयला पुन्हा एकदा मिठी मारली आणि गुरुजींच्या शेजारी रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसले. अजयनं खुर्चीतून उठताना अनुपमाकडं वळून बघितलं. तिच्या डोळ्यांत त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे मोती जमा झाले होते. पाण्याचे मोती ! पाणी !!
शाळेतल्या लहान मुलांपासून वयोवृद्ध गावकऱ्यांपर्यंत असंख्य स्त्री-पुरुषांनी समोरचं पटांगण फुलून गेलं होतं. अजयनं कित्येक वर्षं याच संधीची वाट बघितली होती. आज आपल्या मनातला एक कोपरा तो सगळ्यांसमोर उघडा करणार होता. बोलायला सुरु करण्यापूर्वी त्यानं मागं वळून एकदा मंदिराकडं आणि त्याभोवतीच्या बागेकडं बघितलं. मग गुरुजींच्या दिशेनं बघितलं. त्यांनी मानेनं त्याला 'सुरु कर' असं खुणावलं. समोरच्या श्रोत्यांमध्ये अगदी पुढं साईनाथसोबत अथर्व आणि अस्मिता त्यांच्या 'सेलिब्रेटी डॅड'चं स्पीच ऐकायला आतुर बसलेले त्याला दिसले. हसून त्यानं बोलायला सुरुवात केली.
"मित्रांनो, संभाजीरावांनी माझी ओळख करून देताना जरा जास्तीचं कौतुक केलं, पण तुम्ही त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट तिखट-मीठ लावून रंगवून सांगायची सवयच आहे त्यांना..." अजयच्या या वाक्यावर समोरच्या गर्दीसोबत गुरुजी आणि स्वतः संभाजीरावदेखील खळखळून हसले. अजय पुढं बोलू लागला.
"मित्रहो, गावातल्या पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु केले तेव्हापासून माझ्या मनात होतं की एकदा तुम्हा सर्वांशी असं मनमोकळं बोलावं. पण योग्य वेळ आल्यावर बोलू म्हणून इतकी वर्षं मी थांबलो होतो. आज ती योग्य वेळ आली आहे असं मला वाटतंय. घाबरू नका, मी तुमच्यासमोर कसलं भाषण ठोकायला उभा राहिलेलो नाही. मला माझ्या शाळेतल्या दिवसांमधली एक आठवण फक्त तुम्हा सगळ्यांना सांगायची होती. तेवढी सांगून मी थांबणार आहे. या घटनेतली अनेक पात्रं आज इथं माझ्यासमोर बसलेली आहेत. स्वतः संभाजीराव आणि आमचे आदरणीय गुरुजीदेखील या आठवणीचा एक महत्त्वाचा हिस्सा आहेत." असं म्हणून अजयने गुरुजींकडं बघितलं. तो नक्की काय सांगणार आहे याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होती. त्यांची मूक संमती घेऊन अजय पुढं बोलू लागला.
"आम्ही शाळेत असतानाची गोष्ट आहे ही. तेव्हा आम्हाला शाळा चुकवून इथं या डोंगरावर खेळायला यायला खूप आवडायचं. माझ्यासोबत हे तुमचे संभाजीराव, समोर बसलेले हणमंतराव, मागं बसलेले प्रकाशराव, असे सगळे मित्र दिवस-दिवसभर इथं भटकत रहायचो. उन्हातान्हात खेळून, आरडा-ओरडा करून घशाला कोरड पडली की मग आम्हाला घर आठवायचं. त्यावेळी इथं डोंगरावरच काय, गावातसुद्धा पाण्याची टंचाई असायची.
"शाळा बुडवून आम्ही खेळायला येत असलो तरी शाळा आम्हाला आवडत नव्हती असं मात्र अजिबात नव्हतं. उलट आमच्या या गुरुजींकडून नवनवीन गोष्टी ऐकायला, शिकायला आम्हाला खूप आवडायचं. गुरुजींची शिकवायची पद्धतसुद्धा काहीतरी निराळीच होती. कधी कोडी घालून, कधी गाणी गाऊन, तर कधी नाटक बसवून ते आम्हाला वेगवेगळे विषय शिकवायचे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत कधी कुठला अवघड विषय सोपा होत जातो तेसुद्धा आम्हाला समजायचं नाही.
"मला आठवतंय, एकदा आमच्या या गुरुजींनी आम्हाला चित्र काढायला एक विषय सांगितला होता - 'माझ्या स्वप्नातला गाव'. बरोबर ना गुरुजी ?" गुरुजींच्या दिशेनं बघत अजयनं विचारलं. तो आता नक्की कशाबद्दल बोलणार आहे, ते गुरुजींना कळून चुकलं. प्रसन्नपणे हसत त्यांनी मान डोलावली आणि अजय पुढं बोलू लागला.
"आमच्यापैकी प्रत्येकानं खूप विचार करून, डोकं लावून वेगवेगळी चित्रं काढली. कुणी मोठमोठे बंगले काढले, तर कुणी लंबेचौडे रस्ते काढले. कुणी चकाचक रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड रंगवलं, तर काहीजणांनी चक्क स्टँडवर प्रवाशांची वाट बघणारं विमानसुद्धा काढलं. कुणी जत्रेत रमलेले गावकरी काढले, तर कुणी बसमध्ये बसून शहराकडं निघालेले लोकही दाखवले. माझं चित्र या सगळ्यांच्या मानानं खूपच साधं होतं. मी काय काढलं होतं माहितीये ?" दोन क्षण थांबून अजय पुढं सांगू लागला.
"मी काढलं होतं डोंगरमाथ्यावरचं हे मंदिर. पण तेव्हा हे जसं होतं तसं नव्हतं काढलं. गुरुजींनी सांगितलं होतं तसं माझ्या स्वप्नातलं दृश्य मी कागदावर उतरवलं होतं... माझ्या स्वप्नातल्या मंदिराच्या सभोवताली छान बाग फुललेली होती... मंदिरासमोरच्या पटांगणात छान हिरवळ उगवलेली होती... मंदिराच्या पायऱ्यांसमोरून जाणाऱ्या पायवाटेवर मधोमध छोटा हौद बांधलेला होता... हौदातल्या पाण्यावर कमळाची पानं पसरली होती आणि मधूनमधून काही कळ्या तर काही उमललेली कमळाची फुलं दिसत होती... हौदाच्या मध्यभागी छोटा दगडी कारंजा होता... बागेच्या पलीकडं सावली देणारी मोठी झाडं ऐसपैस लावलेली होती... त्याच झाडांच्या सावलीत मोठ्या सतरंज्या अंथरून गावातली माणसं, शाळेतली मुलं बसलेली होती..." बोलता बोलता अजयचा कंठ दाटून आला. त्यानं हळूच चष्मा वर सरकवून डोळ्यांच्या कडांवर जमलेलं पाणी टिपलं. पाणी !!
"गुरुजींनी सगळ्यांची चित्रं मन लावून बघितली. हेच चित्र का काढलं याबद्दल प्रत्येक मुलाशी चर्चा केली. माझं चित्र हातात घेऊन गुरुजी बराच वेळ शांत उभे होते. त्यांनी माझ्याशी कसलीच चर्चा केली नाही. फक्त एक प्रश्न विचारला, 'हे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करशील ?' तेव्हा त्या प्रश्नाचा पूर्ण अर्थसुद्धा मला नीट समजला नव्हता.पण माझ्या स्वप्नात खरोखरच ते दृश्य दिसत असल्यानं मी मोठ्ठ्यानं 'होऽऽ' म्हणालो. गुरुजींनी शाबासकी देऊन मला खाली बसवलं आणि माझं चित्र आपल्यासोबत घेऊन गेले. या प्रसंगानंतर आठवड्याभरानं गुरुजी माझ्या त्या चित्राची फ्रेम बनवून शाळेत घेऊन आले. फळ्याच्या वर सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी त्यांनी ती फ्रेम लावून घेतली आणि मला म्हणाले, 'हे स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे, विसरू नकोस.'
"त्यानंतर मी जसजसा पुढच्या इयत्ता चढत गेलो तसं ते चित्र माझ्या पुढच्या वर्गांमध्ये लावलं जाईल याची गुरुजींनी काळजी घेतली. पुढच्या शिक्षणासाठी मी गाव सोडून शहरात गेलो, तेव्हा मात्र माझा आणि या चित्राचा संपर्क तुटला. त्यानंतर कॉलेज झालं, नोकरीला लागलो. शहरात घर घेतलं, बँकेत पैसे साठू लागले. गावाकडं येणं कमी झालं. आई-बाबांना शहरात चला म्हणू लागलो. तुझ्या लग्नानंतरच आम्ही शहरात येऊ, असं त्यांनी सांगितलं. मग यथावकाश लग्नही ठरलं..." थोडं थांबत अजयनं अनुपमाकडं बघितलं. तिनं अजयच्या तोंडून ही गोष्ट कित्येकदा ऐकली होती, तरीदेखील आजचा दिवस त्याच्यासाठी खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे, हे ती जाणून होती. तिनं कौतुकानं हसून त्याच्याकडं बघितलं. अजयसुद्धा हसला आणि पुढं बोलू लागला.
"लग्न गावाकडं करायचं असंच ठरलं होतं. लग्नात गुरुजींनी मला एक खास गोष्ट प्रेझेंट दिली. 'माझ्या स्वप्नातल्या गावा'चं तेच चित्र. मी विसरलो तरी गुरुजींनी जपून ठेवली होती ती फ्रेम. लग्नानंतर सगळे प्रेझेंट उघडून बघताना ती फ्रेम समोर आली आणि गुरुजींचे शब्द माझ्या कानात घुमू लागले, 'हे स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे, विसरू नकोस.'
त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. मी शाळेत असताना काढलेलं चित्र म्हणून माझ्या बायकोनं कौतुकानं ती फ्रेम आमच्या बेडरुममध्ये लावली. मग रोज रात्री मला स्वप्नात तेच दृश्य दिसू लागलं. हे स्वप्न मला पूर्ण करायचंच आहे, असं मी मनोमन ठरवलं. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ? पाणी !! बास्, त्या दिवसापासून मी पाण्याचा अभ्यास सुरु केला. पाणीपुरवठा, सरकारी योजना, परदेशी तंत्रज्ञान... वेळ मिळेल तसा सगळ्या गोष्टींची माहिती मिळवत गेलो. हातातली मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका पंप बनवणाऱ्या छोट्या कंपनीत काम करू लागलो. वर्षभरात कंपनीच्या मालकांशी बोलून त्यांच्याच कंपनीची डिलरशिप मिळवली. मग सर्व्हीस सेंटर आणि थोड्याच काळात स्वतःची पंप बनवणारी कंपनी. फक्त पंप नाही तर पाणीपुरवठ्याच्या सर्व वस्तू...
"हे सगळं करत असताना गावात पुन्हा येणं वाढवलं. जुन्या मित्रांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा करून प्लॅन ठरवला. सरकारी योजना आणि गावकऱ्यांच्या सहभागातून टप्प्याटप्प्यानं जीवनी नदीचं पाणी वळवायचे प्रयत्न सुरु केले. आधी गावाला पिण्यासाठी पाणी, मग शेतीला आणि इतर कामाला लागणारं पाणी, आणि शेवटच्या टप्प्यात डोंगरमाथ्यावर मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी लागणारं पाणी... तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांतून आणि गुरुजींसारख्या मोठ्या माणसांच्या आशिर्वादानं आपण हे स्वप्न पूर्ण करू शकलो... तुम्हाला दिलेला शब्द मी पाळला, गुरुजी. तुम्हाला सांगितलेलं स्वप्न मी पूर्ण केलं, हे स्वप्न आम्ही पूर्ण केलं..." अजयचे यापुढचे शब्द टाळ्यांच्या गजरात विरून गेले. त्यावेळी त्याच्या, संभाजीरावांच्या, गुरुजींच्या आणि कित्येक गावकऱ्यांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा रंग अगदी एकसारखा होता... अगदी जीवनी नदीच्या वाहत्या पाण्यासारखा !



Share/Bookmark