ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, January 18, 2020

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत
१८/०१/२०२० । टाईम्स ऑफ इंडिया

एनआरसीनं मोठी खळबळ माजवलीय, परस्परविरोधी टोकाची मतं निर्माण केलीत, प्रचंड अस्वस्थता पसरवलीय आणि लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलंय. सरकार आता दोन पावलं मागं गेलंय. पण अजूनही त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलं नाही - ते म्हणजे, अधिकृतरित्या एनआरसी गुंडाळणं किंवा दीर्घकाळासाठी हा मुद्दा बाजूला ठेवून देणं.

हा ‘इगो’चा मुद्दा नाहीये आणि नसलाही पाहिजे. खरं तर एनआरसीची संकल्पना काही वाईट नाही, पण अंमलबजावणीमध्ये मार खाणार हे नक्की. आणि भारतातली वस्तुस्थिती लक्षात घेतली तर एनआरसीमुळं मिळणाऱ्या फायद्यांपुढं प्रश्नचिन्हच उभं राहतं. आजच्या घडीला भारतात एनआरसी लागू केल्यास, ते निष्फळ ठरण्यापासून त्याचे भयंकर परिणाम होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. चांगल्यात चांगला परिणाम म्हणजे, प्रचंड खर्च करुन निरर्थक आणि गोंधळ निर्माण करणारं काम घडेल. वाईटातला वाईट परिणाम म्हणजे, या निमित्तानं देशात यादवीसुद्धा माजू शकेल.

आता कुणी म्हणेल की, एनआरसीचे तपशील बाहेर आलेले नसताना त्यावर कशाला टिप्पणी करायची? विशेषतः, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचे निकष आणि पद्धत जाहीर केलेली नसताना. पण मुद्दा हाच आहे की, निकष काहीही असले तरी सध्या एनआरसी यशस्वी होऊ शकणार नाही.

जर निकष खूपच सोपे असतील, तर जवळपास सगळेच एनआरसीच्या चाळणीतून सहीसलामत पार पडतील. तीन साक्षीदार किंवा सध्याचं कुठलंही ओळखपत्र एवढाच निकष असेल, तर भारतातली प्रत्येक व्यक्ती एनआरसीमध्ये नोंदवली जाईल. तरीसुद्धा या कामासाठी रांगा लागतील, फायलींचे ढीग उभे राहतील, लोकांना त्रास सहन करावा लागेल, चुका होतील आणि भारतीय बाबूगिरीचा नेहमीचा विक्षिप्तपणा झेलावा लागेल. स्पष्टच बोलायचं तर, पुन्हा एकदा ‘आधार’सारखा सावळागोंधळ अनुभवायला मिळेल. आणि प्रत्येक व्यक्ती त्यामधे नोंदवली जाणार असल्यानं, शेवटी त्याला काहीच अर्थ उरणार नाही. प्रचंड पैसा ओतून, वेळेची आणि कष्टाची नासाडी करुन, आपल्या हाती उरेल फक्त भरपूर चुकांनी भरलेलं नागरिकांच्या माहितीचं एक जाडजूड रजिस्टर.

दुसरी शक्यता म्हणजे, एनआरसीचे निकष खूप कडक ठेवल्यास होणारा अजूनच मोठा गोंधळ. आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी खरोखर ऐतिहासिक कागदपत्रं लागणार असली तर? पिढ्यानपिढ्या जुने जन्माचे दाखले उकरुन काढावे लागतील. तुमचा जन्म जिथं झाला ते हॉस्पिटल कदाचित केव्हाच बंद झालं असेल. जन्माचे दाखले देणारा खेडेगावातला अधिकारी केव्हाच वारला असेल. ज्यांची घरीच बाळंतपणं झालीत अशांना काय करावं ते सुचणारसुद्धा नाही. सध्याची सगळी ओळखपत्रं निरुपयोगी ठरतील. असं झालं तर, नागरिकत्व सिद्ध होईपर्यंत सर्व भारतीय परकीयच समजावे लागतील.

श्रीमंत आणि वजनदार माणसं शेवटी यातून सुटतीलच. गरीब लोक इतस्ततः धावपळ करत, रडत नागरिकत्वाची भीक मागत राहतील. सरकारी बाबू लोकांना हा अधिकारांचा अतिरिक्त डोस मिळून ते आणखी खूष होतील. आणि हो, या सगळ्याचा काहीतरी दर ठरेलच. नागरिकत्वाचे निकष जेवढे कडक, तेवढाच त्यातून पार पडण्याचा दर जास्त राहील.

आणि मग खोट्या कागदपत्रांचं संकट आपल्यावर कोसळेल. जुन्या जन्म दाखल्यावर फोटोशॉप वापरुन बदल करणं फार अवघड आहे काय? आणि तुम्ही ठरलेल्या दरानं पैसे खायला घातले नाहीत, तर तुमचा खराखुरा जन्माचा दाखला फेटाळून लावणं सरकारी बाबूंना फार अवघड आहे काय? (मग तो दाखला खरंच खरा आहे हे कोर्टात सिद्ध करायला तुम्हाला पुढची २० वर्षं लागतील, त्यासाठी शुभेच्छा.)

हे काही बरोबर नाही. फारच जबरदस्ती केली तर लोक निदर्शनं करतील. काही निदर्शनांचं रुपांतर दंगलींमधे होऊ शकेल. हे सगळं झाल्यावर शेवटी एखादं रजिस्टर तयार होईलही, पण त्यातली माहिती, देशातल्या शांततेसारखीच, दूषित झालेली असेल.

त्यामुळं निकष काहीही असले तरी, भारतासारख्या देशातली परिस्थिती लक्षात घेता, इथं एनआरसी राबवणं सध्या तरी शक्य नाही. कदाचित २०२० नंतर भारतात जन्माला आलेल्या सर्व मुलांची अशी काहीतरी नोंद ठेवता येईल. येत्या काही दशकांमध्ये, यामधूनच एखादं चांगलं रजिस्टर तयार होऊही शकेल. पण सध्यातरी हे शक्य दिसत नाही.

पण मुळात आपण एनआरसी करायला घेतलंच कशासाठी? तर, हे सगळं करण्यामागं एक गृहीतक असं आहे की, भारताच्या लोकसंख्येतले काही टक्के लोक घुसखोर असून, आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर त्यांचा भार पडतोय. सर्वप्रथम, हे गृहीतक खरं असू शकत नाही, कारण असे घुसखोरदेखील आपल्या जीडीपी (राष्ट्रीय उत्पन्न) मध्ये भर घालतच असतात.

बरं ते जाऊ दे, विस्थापितांचं राष्ट्रीय उत्पन्नातलं योगदान आपण बाजूला ठेवू. असं समजू की आपण चांगल्या पद्धतीनं एनआरसीची अंमलबजावणी केली. असंही समजू की, सर्व भारतीय प्रामाणिक बनले, प्रत्येक भारतीय नागरिकाकडं सगळी कागदपत्रं नीट लावून ठेवलेली आपापली एक फाईल आहे आणि असंही समजू की सर्व अधिकाऱ्यांनी हसतमुखानं लांडी-लबाडी न करता काम केलं. असं समजू की आपल्याकडं एक स्वच्छ नीटनेटकं एनआरसी तयार झालं, आणि हा सगळा उद्योग करुन झाल्यावर समजा ५% नागरिकांना अ-भारतीय घोषित करण्यात आलं. ही संख्यासुद्धा ६ कोटींच्या पुढं जाते, म्हणजे इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येएवढी! मग एवढ्या लोकांचं काय करणार आपण? या सगळ्यांना कुठल्या विमानात बसवून कुठं पाठवून देणार?

आता असाही विचार करुया. दोन्हीपैकी सोपी गोष्ट कुठली आहे? या ६ कोटी लोकांना बरोब्बर वेचून काढून सगळ्यांना बाहेर पाठवून देणं? की आपली अर्थव्यवस्था वेगानं वाढवून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ५% भर घालणं? जरी कुणी घुसखोर आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर भार टाकत असतील, तरी ही ५% गळती थोपवण्यापेक्षा आपलं उत्पन्न वाढवणं जास्त सोपी गोष्ट आहे. आंब्याची चार नवीन झाडं लावणं सोपं असताना, तुम्ही गावातल्या दोन-चार आंबे चोरणाऱ्या पोरांना शोधायला एक आख्खं वर्ष घालवाल का?

एनआरसी म्हणजे हजेरी घेण्याचं काम आहे. पण तुम्ही भारतासारख्या गजबजलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर हजेरी नाही घेऊ शकत. यातून निष्पन्न होईल फक्त गोंधळ, चुका, वाद, आणि मग काही लोकांची गाडी चुकेल, तर आणखी वाईट गोष्ट म्हणजे काही लोक रुळांवर पडून चिरडले जातील.

पण फक्त अंमलबजावणी नीट होणार नाही एवढंच सध्या एनआरसी गुंडाळायला सांगण्यामागचं कारण नाहीये. अल्पसंख्याकांच्या बाबतीत भाजपची विश्वासार्हता प्रचंड खालावलेली आहे. भाजप नेतृत्वाची प्रतिमा दडपशाहीची, भीती निर्माण करणारी आहे. चूक की बरोबर जाऊद्या, पण अमित शहांनी तुमच्याकडं कागदपत्रं मागणं आणि मनमोहन सिंगांनी ती मागणं यामध्ये फरक आहे की नाही?

याशिवाय, एनआरसी आणण्याची वेळसुद्धा बरोबर नाहीये. ३७० कलम रद्द करणं आणि अयोध्या प्रकरणातला निकाल हे भारतातल्या विशिष्ट भागांमध्ये हिंदूंचे विजय मानले जातायत. याच भागांमध्ये एनआरसी हिंदूंच्या हिताचं असल्याचं मानलं जातंय (खरं तर तसं काही नसून एनआरसी धर्मनिरपेक्ष गोष्ट आहे. एनआरसीमुळे सर्वांचा धर्मनिरपेक्ष छळ होणार आहे). त्यामुळं असे मुद्दे एकामागून एक रेटत राहिल्यास एक विशिष्ट समाज दडपला जाईल, विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळेल आणि आपल्याला आजूबाजूला दिसतायत तशी निदर्शनं केली जातील. एनआरसी आणण्याची वेळ यासाठीही बरोबर नाहीये, कारण आपल्या अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप काम करण्याची आत्ता गरज आहे. अशा परिस्थितीत देशात अशांतता पसरणं भारताला परवडणार नाही.

आपल्याला अर्थव्यवस्थेवर खूप काम करायची गरज आहे, तेवढं काम आपल्या सगळ्यांसाठी पुरेसं आहे आणि सगळ्यात आधी तिकडंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. एनआरसीला सध्या तरी विश्रांतीची गरज आहे, तीसुद्धा अधिकृतपणे.

- चेतन भगत
(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)

मूळ लेखः https://timesofindia.indiatimes.com/blogs/toi-edit-page/why-nrc-must-be-shelved-it-will-be-an-expensive-gargantuan-pointless-exercise-that-could-trigger-civil-war-in-the-worst-case/Share/Bookmark

नाटक है...

नाटक है भाई नाटक है
कुछ और नहीं यह नाटक है

यह हिंदू मुस्लिम नाटक है
यह देशभक्ती भी नाटक है
यह राजनीती इक नाटक है
इन्सां के लिये सब घातक है
बस नाटक है...

वहां जम्मू कश्मीर तोड दिया
आसाम का सिर भी फोड दिया
और महाराष्ट्र से पंगा लिया
यह पडोस का कर्नाटक है
बस नाटक है...

क्यूँ चिता प्रेम की जलती है
हम तुम सब की यह गलती है
नफरत की ईंटो से बांध रखी
दीवार यहाँ से वहाँ तक है
बस नाटक है...

यह दीवार हमें ही गिरानी है
यह जंग तो सदियों पुरानी है
हम साथ लढें तो हरा सकें
नहीं उनमें इतनी ताकत है
बस नाटक है...

यह एनआरसी इक नाटक है
यह सीएए इक नाटक है
यह मंदिर मस्जिद नाटक है
यह तीन सौ सत्तर नाटक है
इन्सां के लिये सब घातक है
दीवार यहाँ से वहाँ तक है
नहीं उनमें इतनी ताकत है
बस नाटक है भाई नाटक है...

@aksharmann
18/01/2020

(Click on image to read)Share/Bookmark

Wednesday, January 1, 2020

Dabangg 3 - Bhai Ki Movie... Must Watch!

दबंग ३ - भाई की मूव्ही.. मस्ट वॉच!


सलमान खान ऊर्फ चुलबुल पांडे ऊर्फ रॉबिन हूड पांडे ऊर्फ धाकड पांडे ऊर्फ करु पांडे (म्हणजे काय कुणास ठाऊक?) हा उभ्या-आडव्या भारत देशातल्या सर्वसामान्य आणि बहुसंख्य प्रेक्षकांना अपील होणारा ‘हिरो’ आहे. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो सिटीपासून शंभरेक किलोमीटर लांब गेलं की ही वस्तुस्थिती जास्त ठळकपणे नजरेत येते. आयुष्मान खुराणा, राजकुमार राव, विकी कौशल, असे नव्या दमाचे ‘ऐक्टर’ इंडस्ट्रीत येत असले तरी, त्यांच्या सिनेमाला सलमान आणि अक्षय कुमारच्या सिनेमासारखी ‘एन्टरटेनमेण्ट व्हॅल्यू’ अजून कमावता आलेली नाही. अजय देवगणचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बऱ्यापैकी देशभरातल्या प्रेक्षकांना एन्टरटेन करु शकलेत. पण रणबीर कपूरची ऐक्टींग, आयुष्मानच्या सिनेमांची दमदार स्क्रिप्ट, ठराविकच लोकांना आकर्षित करु शकलेत हे सत्य आहे.

सलमानचा सिनेमा मात्र कितीही टिपिकल असला, स्टोरी कितीही प्रेडीक्टेबल असली, स्क्रिप्ट कितीही कमजोर असली, गाणी कितीही नीरस असली, डायलॉग कितीही बालिश असले, फाईट सीन कितीही अविश्वसनीय असले, तरीदेखील फक्त आणि फक्त सलमानच्या नावावर सिनेमा जबरदस्त हिट होतो, पैसे कमावतो, इंडस्ट्रीत खळबळ माजवतो, कित्येक नव्या-जुन्या कलाकारांना काम आणि प्रसिद्धी मिळवून देतो, हे नक्की!

उदाहरणार्थ, ‘दबंग ३’ मधे महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च केलंय. तिच्यात विशेष लक्षात राहण्यासारखं काहीच नसलं तरी, करीयरच्या सुरुवातीला तिच्या नावावर १०० कोटीचा सिनेमा लागला ना डायरेक्ट… याला म्हणायचं सलमानची जादू.

सिनेमाची स्टोरी सलमान खाननं लिहिलेली असल्यावर प्रभुदेवाला डिरेक्शनसाठी किती वाव होता माहिती नाही, पण एका गाण्यातला प्रभुदेवाचा डान्स मात्र फुल्टू पैसा वसूल!

सोहेल खानचा गेस्ट अपिअरन्स अगदीच छोटा, पण त्याची एन्ट्री हमखास टाळ्या मिळवणारी! सलमान, अरबाज, सोहेल, या तिघांना एकत्र स्क्रीनवर बघायला अजून मजा आली असती.

डुप्लिकेट विनोद खन्ना संपूर्ण सिनेमात खटकतो, पण ओरिजिनल डिंपल बरोबर असल्यामुळं काही सीनमधे तोसुद्धा खपून जातो. मागच्या ‘दबंग’चे रेफरन्स ओढून-ताणून जुळवायचा प्रयत्न केलाय, पण ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली फिजिक्सच्या नियमांसारखी स्क्रिप्ट रायटींगच्या नियमांची मोडतोडसुद्धा दुर्लक्षित केलेलीच बरी.

पहिल्या ‘दबंग’मधे सिक्स पॅकवाला सोनू सूद भाव खाऊन गेला होता. तिसऱ्या ‘दबंग’चा व्हीलनसुद्धा स्टायलीश आणि इम्प्रेसिव्ह वाटतो. उगाच बावळट आणि किरकोळ व्हीलन समोर असेल तर चुलबुल पांडेची दबंगगिरी उठून दिसणार कशी? त्यामुळं व्हीलनच्या रोलसाठी यावेळी सुद्धा चांगली चॉईस केलेली दिसली.

साजिद-वाजिदच्या संगीतात लक्षात राहण्यासारखं काहीच नाही. काही गाणी मागच्या ‘दबंग’मधल्या गाण्यांमधेच कडवी वाढवून दिल्यासारखी वाटली. यावेळी मुन्नीच्या ऐवजी मुन्ना बदनाम झालाय आणि झंडू बाम, फेव्हीकॉल या ब्रॅन्डनंतर यावेळी ‘सेट वेट जेल’चा नंबर लागलाय, एवढंच गाणी ऐकून लक्षात येतं.

कदाचित प्रभुदेवा डिरेक्टर असल्यामुळं असेल, पण फाईट सीन थोडे साऊथच्या सिनेमासारखे जास्तीचे रक्तबंबाळ वाटले. पण तरीसुद्धा बटबटीत अंगप्रदर्शन किंवा अंगावर येणारे टॉर्चर सीन कमीच वाटले. सलमानच्या सिनेमाची परंपरा जपत एकही किसिंग सीन दाखवलेला नाही, बेड सीन नाही, पाणचट आणि सूचक जोक असले तरी अश्लील किंवा ओंगळवाणे डायलॉग नाहीत. असे सिनेमे फॅमिलीसोबत बघायला जाण्यात लोकांना फारशी रिस्क वाटत नाही. या बाबतीत अक्षय कुमारचे सो-कॉल्ड कॉमेडी सिनेमे अगदीच टाळण्यासारखे असतात.

एकूण, सलमानचा सिनेमा म्हणजे कम्प्लीट फॅमिली एन्टरटेनमेण्ट. देशातली राजकीय उलथा-पालथ, आर्थिक मंदीचं संकट, बेरोजगारीचा प्रश्न, पर्यावरण बदलाची आव्हानं, अशा सगळ्या गोष्टी विसरायला लावणारा आणि शेवटी वाईटाचा पराभव, चांगल्याचा विजय होतोच अशी आशा पेरून जाणारा सलमानचा ‘दबंग ३’ सगळ्या चुका पोटात घालून एकदा बघण्यासारखा… सलमानच्या फॅन्ससाठी तर एवढं सगळं बोलायची सुद्धा गरज नाही. भाई की मूव्ही है, बस्स… मस्ट वॉच!!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/०१/२०२०


Share/Bookmark