ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, September 10, 2018

रक्षक (रूपककथा)

रक्षक

"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यांनी जाम वैताग दिलाय," लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेळीला म्हणाली.

"खरंय गं, पण बोलणार कोण त्यांच्याविरुद्ध? तुमचा बैल की आमचं बोकड? शिवाय ते दुसर्‍या मजल्यावरचं डुक्करपण आहेच कुत्र्याच्या साथीला..." शेळीनं दुःखद उसासा सोडला.

मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज नव्यानं घडली.

दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. एका पिल्लाच्या हॅप्पी बड्डेचं सेलिब्रेशन होतं म्हणे.

संध्याकाळपासून सोसायटीत धिंगाणा सुरु होता.

"बेकरीवाल्या उधळ कालच्या पावाला... पावाला..."

"हाडं कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍..."

अशी तुफान प्राणिप्रिय गाणी वाजत होती. शहराच्या कानाकोपर्‍यातून सगळी कुत्री जमली होती. एकत्र आल्यानं त्यांच्या भुंकण्याला कोल्हेकुईचा कॉन्फीडन्स चढला होता. तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या मजल्यावर राहणार्‍यांना तर त्या वाघ-सिंहांच्या डरकाळ्या वाटत होत्या. दारं-खिडक्या घट्ट बंद करुन, टीव्हीचा आवाज वाढवून सगळे घरात बसले होते.

"आज मौऽऽसम बडा कुत्तियाना है... बडा कुत्तियाना है..."

"भुंकी तो नाऽऽना, छेडीतो ताऽऽना, मठ्ठ हे राहीले.. डोलावीत माऽऽना..."

अशी गाणी टीव्हीवर दबक्या आवाजात वाजत होती. पापभिरू मंडळी घरात बसूनच रात्र लवकर संपायची वाट बघत होती.

तो दिवस संपला. पण दुसर्‍या दिवसापासून सोसायटीत कुत्र्यांची वर्दळ वाढली. पार्किंगमध्ये कुत्री, लिफ्टमध्ये कुत्री, जिन्यामध्ये कुत्री. टेरेसवर, ग्राऊंडवर, कुंपणावर, कुत्रीच कुत्री...

बैल, बोकड, माकड, जिराफ, सगळे कुत्र्यांना चुकवत ये-जा करु लागले. घरात आले की दार घट्ट बंद करुन लपू लागले.

पण कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढला. शेवटी वैतागून सगळे पहिल्या मजल्यावर गोळा झाले.

"हे सगळं थांबलं पाहिजे... बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव..." अशा घोषणा झाल्या.

कुत्र्यानं म्हणणं ऐकून घेतलं. मग स्वतःच घोषणा दिल्या, "बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव.."

कुत्र्यालाच मग सुचली युक्ती, वॉचमनची एका केली नियुक्ती. सगळ्यांकडून घेतली वर्गणी, सगळे म्हणाले कुत्राच गुणी!

वॉचमन होता कुत्र्याचाच मित्र. एका महिन्यात पालटलं चित्र.

आता कुत्री रोज येत नाहीत, कधीकधी येतात. ते तरी काय करणार, आपले सणच कित्ती कित्ती असतात. दसर्‍या दिवशी सोनं द्यायला, संक्रांतीला तिळगुळ घ्यायला... वर्गणी मागायला आणि फटाके उडवायला...

पण वॉचमनचा आता चांगलाच दरारा, पूर्वीसारखा नसतो रोजचाच धिंगाणा.

"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यानंच सोसायटी वाचवली, नाही का? यावेळी चेअरमन तोच होणार..." लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेळीला म्हणाली.

"खरंय गं, त्याच्याएवढं खंबीर इथं आहेच तरी कोण? तुमचा बैल की आमचं बोकड?" शेळीनं हसत डोळा मारला.

मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज पुन्हा नव्यानं घडली.

दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. पप्पा चेअरमन झाल्याबद्दल सेलिब्रेशन होतं म्हणे.

संध्याकाळपासून सोसायटीत आनंदोत्सव सुरु झाला. डॉल्बीवर गाणं वाजू लागलं...

"हाडं कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍... कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍..."

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Sunday, August 5, 2018

तू जो मिला...

#FriendshipDay Special #ShortStory
ReadingTime: 03:00 Minutes

ब-याचदा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, म्हणून आपण निराश होतो. पण ती गोष्ट का मिळाली नाही याचा नीट विचार केला तर असं कळतं की, आपण चुकीच्याच दिशेला शोध घेत होतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट जवळपासच होती, पण आपण दूर-दूर शोधत राहिलो.

अशीच काहीशी गोष्ट आहे आदित्य आणि निशाची. आदित्य तसा हुशार आणि कष्टाळू मुलगा, पण सतत असमाधानी. आपल्याला हवं ते अजून मिळालंच नाही, काहीतरी राहून गेलंय, असं त्याला नेहमी वाटायचं. कितीही यश मिळालं तरी त्याला ते अपूर्णच वाटायचं.

अशा आदित्यला भेटली निशा, थोडी बालिश, थोडी खोडकर; पण तेवढीच समजूतदार आणि प्रेमळही. कुणा कॉमन फ्रेन्डनं दिलेल्या पार्टीत दोघांची ओळख झाली आणि असमाधानी, अपूर्ण असा आदित्य नकळत निशाच्या मनमोकळ्या हास्याकडं, लाघवी बोलण्याकडं आकर्षित होत गेला.

भेटी-गाठी, गप्पा-गोष्टी सुरु झाल्या आणि आदित्यला आयुष्याचा वेगळाच अर्थ उलगडत गेला. कामाशिवाय पाच मिनिटंही एका ठिकाणी न थांबणारा आदित्य, आता निशाची वाट बघत तासन्‌तास वेळ घालवू लागला. तिच्यासोबत भटकताना त्याच्या लक्षात आलं की आपण जन्मल्यापासून याच शहरात राहिलो, तरी खूप काही बघायचं राहिलंच होतं. विनाकारण इकडून-तिकडं, या रस्त्यावरुन, त्या रस्त्यावरुन फिरताना त्यानं खूप माणसं बघितली, त्यांची वेगवेगळी आयुष्यं बघितली. त्यांच्या अडचणी बघितल्या आणि तरीही त्यांचं आनंदात जगणं बघितलं. मग स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करुन बघितली आणि त्याला जाणवलं की, आपल्याला जे हवंहवंसं वाटत होतं, ते कदाचित आपल्याच आजूबाजूला लपलंय.

निशाला भेटण्यापूर्वी आदित्यचं फ्रेन्ड सर्कल खूप लिमिटेड होतं. दुस-या कुणाचं फारसं ऐकून घेणंही त्याला जमत नसे. पण निशाचा एकही शब्द तो खाली पडू देत नव्हता. तिनं सांगितलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे, यासाठी तो जिवाचा आटापिटा करु लागला. आणि हळूहळू त्याला स्वतःच्याच छुप्या क्षमता लक्षात येऊ लागल्या. पूर्वी कधी प्रयत्नही न केल्यानं त्याला ज्या गोष्टी जमणार नाहीत असं वाटायचं, त्या सगळ्या गोष्टी आता तो मजेत करु लागला. आणि आपल्याला हे जमलं याचं समाधान त्याच्या चेह-यावर झळकू लागलं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या गायब झाल्या आणि त्याच्या गालावर मात्र वरचेवर खळी दिसू लागली.

निशाला भेटण्यामागं आदित्यचा कसलाही खास उद्देश नव्हता. जे झालं ते सगळं दोघांच्याही नकळत, काहीच न ठरवता. पण निशानं त्याच्या आयुष्यात प्रवेश करताच त्याचं आयुष्य बदलून गेलं. तो हसायला शिकला. समाधानी रहायला शिकला. त्याला आता काहीतरी मिळाल्यासारखं वाटू लागलं. अपूर्णतेची भावना निघून गेली आणि आयुष्य संपूर्ण वाटू लागलं…

आज निशाला भेटायला निघाला तेव्हा त्यानं रेडीओवर हे गाणं ऐकलं. आदित्यला वाटलं, हे गाणं खास त्याच्यासाठीच लावलं होतं जणू! गाणं गुणगुणतच त्यानं फ्लॅटचं मेन डोअर लॉक केलं आणि पाय-या उतरत पार्किंगकडं निघाला…

आशियाना मेरा, साथ तेरे है ना
ढूँढते तेरी गली, मुझको घर मिला..
आ-बो-दाना मेरा, हाथ तेरे है ना
ढूँढते तेरा खुदा, मुझको रब मिला..
तू जो मिला, लो हो गया मैं काबिल
तू जो मिला, तो हो गया सब हासिल
मुश्किल सही, आसाँ हुई मंजिल..
क्यूँकी तू धडकन, मैं दिल…

- मंदार शिंदे
9822401246


Share/Bookmark

Saturday, June 30, 2018

संजू

"संजू" - एक नंबर पिक्चर बनवलाय राजकुमार हिरानीनं.

रणबीर, विकी कौशल, अनुष्का, परेश रावल, दिया मिर्झा, बोमान इरानी, सोनम कपूर, सयाजी शिंदे, पियुष मिश्रा... सगळ्यांनी मस्त काम केलंय.

चांगल्या सिनेमासाठी लागणा-या सगळ्या गोष्टी आहेत ह्यात - गाणी, म्युझिक, मसाला, दोस्ती - यारी, फॅमिली व्हॅल्यूज, डबल-मिनींग जोक्स, सामाजिक संदेश, 'आई तुझं लेकरु' पासून 'कर हर मैदान फतेह' पर्यंतचा प्रवास वगैरे वगैरे... ज्याला जे घ्यायचंय ते त्यानी घ्यावं - पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, मोटीव्हेटींग, डिस्गस्टींग, काहीही...

नक्की बघा मित्रांनो, अजिबात चुकवू नका...

हां, आणि पिक्चर बघून झाल्यावर फेसबुक/व्हॉट्सऐपवर संजय दत्तला शिव्या घाला मनसोक्त... सगळ्यांसारख्या... म्हणजे नंतर मनात कसला गिल्ट नको रहायला... फक्त एवढं लक्षात असू द्या -

हमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में..
हमने उनको भी छुप-छुपकर आते देखा इन गलियों में...

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Tuesday, April 24, 2018

ते पेटवू म्हणाले... (मभा)
Share/Bookmark

Tuesday, April 17, 2018

God of Cricket playing Street Cricket

(Click on image to read)Share/Bookmark

Monday, April 16, 2018

पेपर बॅग कशा बनवायच्या?

रद्दीतल्या वर्तमानपत्रापासून पर्यावरणस्नेही (इको-फ्रेंडली) पेपर बॅग कशा बनवायच्या?

ही सोपी पद्धत शिका शंतनुकडून... कापणं नाही, चिकटवणं नाही, फक्त घड्या घालून बनवा बॅग...

प्लॅस्टीक बॅगचा वापर टाळा... त्याऐवजी पेपर बॅग वापरा, रद्दीतल्या वर्तमानपत्रांचा चांगला उपयोग करा, घरीच बनवलेली पेपर बॅग पुन्हा-पुन्हा वापरत रहा...

कॅमेरा व एडीटींगः मंदार शिंदेShare/Bookmark

Thursday, April 12, 2018

बरंच काही... (स्पृहा जोशी)
Share/Bookmark