ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, February 11, 2014

स्वप्न आणि परिस्थिती

आजकाल कोरडे-कोरडे दिसतात ओठ तुझे
कधीकाळी त्यांनीच ऐकवली होती
स्वप्नं मुलायम...
परिस्थितीवर कधीपासून बोलू लागलीस?
आणि का?
ती स्वप्नंच हवीहवीशी वाटत होती
ही परिस्थिती नेहमीच नकोशी...
पण स्वप्नं बदलता येतात, परिस्थिती नाही!
तूच म्हणालीस.. कोरड्या ओठांनी.
पण लक्षात ठेव -
तुझे ओठ परत मुलायम व्हावेत
हे माझं स्वप्न आहे,
आणि माझी स्वप्नं अपूर्ण राहत नाहीत
ही परिस्थिती!


Share/Bookmark

Sunday, February 9, 2014

कुणासाठी?

विश्वासाची दोरी, चेष्टेत तोडलेली
पुन्हा जोडलेली, पण 'गाठ' मारलेली

प्रेमाची लक्तरं, शपथा-वचनांची
फाटली नाहीत अगदी, पण रंग विटलेली

ग्लास संपला तरी, बाटली भरलेली
दारु काढणार कशी, रक्तात भिनलेली?

शब्दांचीही संगत, मधेच सुटलेली
अजून एक कहाणी, अर्धीच उरलेली

नको वाटते आता, दादही ठरलेली
कुणासाठी मग ही, कविता रचलेली?

- अक्षर्मन


Share/Bookmark

खरा झोल

"सत्य कल्पनेहून रंजक असते"
(या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक असून प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती वा प्रसंगांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

"नमस्कार दादा!"
"अरे! या या आबा, तुमचीच वाट बघत होतो..."
"काय येवढं अर्जांट काम काढलंय आमच्याकडं?"
"बोलू हो कामाचं, जरा बसा तरी. चहा घेताय?"
"नको, तोंडात तंबाखूय..."
"असू द्या, असू द्या. काम जरा अर्जंट होतं म्हणूनच बोलवलं तुम्हाला."
"बोला, काय झोल झाला आता?"
"तसा काय नविन नाई, जुनाच झोलंय. ते टोलचं प्रकरण नाय का..."
"त्यात मी काही करू शकत नै दादा. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, 'माज'ला आवरा. विरोध करणं, मोर्चे काढणं, विधानसभेत दंगा करणं, हे परवडलं. पण डायरेक्ट तुडवातुडवीची भाषा?"
"असू दे आबा, तरुण रक्तंय, माज करणारच. नायतर ह्या पब्लिकनं करायचं काय? आमचे काका म्हंतात तसं 'सहकार' करायचा? का आपले बाबा म्हंतात तसा 'सहभाग' वाढवायचा? येवढं कळत अस्तं तर महाराष्ट्र कुठल्या कुठं गेला अस्ता..."
"कळतंय मला तुम्ही काय म्हंताय ते. पण मग कसला झोल झालाय ते तरी सांगा."
"अहो त्या 'माज'ला जाहीर सभा घ्यायचीय पुण्यात."
"हं, आलंय माझ्या कानावर. आपल्या सरकारच्या टोलचं पोल खोलणाराय म्हंतोय."
"हां, तेच! तर त्याच सभेसाठी जागा मिळंना आबा त्याला पुण्यात."
"काय म्हंताय दादा? ह्यांच्या सेनेला जागा नाकारली? आणि मुळात ह्यांनी 'परवानगी' मागितली? आश्चर्यच म्हणायचं..."
"चेष्टा पुरे, आबा. त्या जागेचं तेवढं बघा लवकर..."
"कोण? मी? चेष्टा मी करतोय का तुम्ही?"
"आबा, उगाच अंगावर झुरळ पडल्यासारखं झटकून टाकू नका. ही सभा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते तुम्हालाही ठाऊकाय..."
"हो तर. 'आपलं' सरकार 'आपल्या' पीडब्ल्यूडीला हाताशी धरून टोलच्या रुपानं जनतेची लूट कशी करतंय, तेच सांगायला सभाय ना ही?"
"हो, पण तेवढंच तिचं महत्त्व नाही आबा. टोलचा मुद्दा खरंच एवढा मोठा आहे का? आणि सत्तेत आपण असलो काय नि दुसरं कुणी असलं काय, टोल तर लावाय लागणारच ना? का हे सत्तेत आल्यावर स्वतःच्या खिशातनं पैशे घालून रस्ते बांधणारेत?"
"त्यासाठी तरी पैसे कमवाय लागतात की दादा."
"मग आपल्याकडनं घेतलेले कुठं..."
"हां, जरा संभाळून शब्द वापरा दादा. मागच्या वेळी असंच कायतर बोलून गेला सहज म्हणून आणि..."
"आहे लक्षात आमच्या. बरं ते जाऊ दे, त्या पुण्यातल्या सभेचं तेवढं घ्या की मनावर."
"हां, पण झालंय काय नक्की?"
"एस. पी. कॉलेजवर सभा होणार म्हणून बॅनर लावलेत गावभर..."
"एस. पी.? पण त्यांनी तर राजकीय पक्षांना ग्राऊंड द्यायचं बंद केलंय ना?"
"तेच तर! ह्यांनी कुणी विचारलंच नै कॉलेजवाल्यांना. डायरेक्ट बोर्डच लावले, आणि पोलिस परवान्याच्या वेळी ते नाही म्हंटले की... हां, तुम्हाला हसू येतंय आता; पण त्यांचा चेहरा कसा झाला असंल विचार करा की जरा."
"बरं मग आपण काय करायचं ह्यात? ह्यांची एखादी शिक्षण संस्था, एखादा साखर कारखाना, गेला बाजार एखाद्या पतसंस्थेचं पटांगण तरी..."
"काय आबा तुम्ही? कुणाबद्दल बोलताय हे? अहो सेनेनं युद्ध करायचं का संस्था चालवायच्या? काय पण तुमचं..."
"बरं बरं, मी काय करायचंय ते तरी सांगा. त्या डेक्कनच्या नदीपात्रात काय सर्कस-बिर्कस चालूय का? नसेल तर तिकडंच घ्या म्हणावं सभा."
"तसं नाही आबा. गावभर बॅनर लागलेत, एस.पी. कॉलेजवर सभाय म्हणून. आता कॉलेजनं नाही म्हटल्यावर ठिकाण बदलायचं म्हंजे अपमान नाही का? असा अपमान गिळून माज कसा करणार तुम्हीच सांगा."
"बरोबराय तुमचं दादा. मग काय करायचं म्हंता?"
"जरा एस.पी.वाल्यांकडं बघता का?"
"अरंरंरं, काय हे दादा. अहो शिक्षण क्षेत्रातली पापभीरु माणसं ती. त्यांना कशाला ह्यात ओढताय? त्यापेक्षा 'माज'ला समजवा की. म्हणावं, एस.पी. चुकून छापलं बॅनरवर; सभा तर एस.एस.पी.एम.एस. ला होणारे..."
"वा वा आबा! काय शक्कल लढवलीत. मानलं तुम्हाला. पण तसलं काही होणार नाही. एस.पी.लाच सभा होईल. तुम्ही बघा कसं जमवायचं ते."
"बरं, बघतो. पाठवतो डिपार्टमेंटच्याच कुणाला तरी. उगाच आपलं नाव आलं तर वेगळीच बोंब व्हायची..."
"हां... हे बी खरंच की. माझ्या नव्हतं डोक्यात आलं, पण आबा..."
"आता काय दादा?"
"ही आयडीया चांगलीय की!"
"कुठली? डिपार्टमेंटचाच माणूस पाठवायची?"
"नाही. ते तर तुम्ही कराच. पण जरा मिडीयात लीकेज करा की ह्याचं."
"काय म्हंताय काय?"
"तुम्ही ऐकताय तेच. जरा हवा होऊ दे की सभेच्या तोंडावर. 'सरकार'च्याच मदतीनं 'सरकारविरोधी' सभा! म्हंजे कसंय, पब्लिकला बी जरा विचार करु दे - आम्हीच कसं ह्यांना खांद्यावर घेतो आणि मग हे माजात आमच्याच कानात..."
"बास बास, दादा. कळलं. होऊन जाऊदे तुम्ही म्हंताय तसं... येतो आम्ही."


Share/Bookmark

Monday, February 3, 2014

एका कवेत चंद्र...

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती

तो चंद्र दाखवी स्वप्ने, भलतीच भलतीसलती
मग चंद्रावर पांघरली, मी भाकरीची चादर होती

झोपेला गाई अंगाई, मी असाच निद्रानाशी
स्वप्नांच्या दुनियेलाही, मारली मी ठोकर होती

त्या चांदण्यांच्या गप्पा, अन्‌ पौर्णिमेची स्वप्ने
या फाटक्या संसाराला, आशेची झालर होती

एका कवेत चंद्र अन्‌ दुसरीत भाकर होती
जिंदगीची गोष्ट माझ्या, भलतीच कातर होती


Share/Bookmark