- बँक कशासाठी असते?
- बँकेतला पैसा नक्की कुणाचा असतो?
- बँकेचं कर्ज बुडतं तेव्हा नेमका कुणाचा पैसा बुडतो?
- बँकींग प्रक्रियेमधे कल्याणकारी शासनाची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे?
'पोपट मेला आहे' हे राजाला कुणी सांगायची गरज आहे की राजाला माहिती असून पोपट बोलत नाही, खात नाही, हसत नाही, पण जिवंत आहे अशी स्वतःची समजूत घालत बसला आहे? की पोपटाला राजानंच...?
बँकींग तज्ज्ञांपासून बँकेनं पैसे बुडवलेल्या ग्राहकांपर्यंत, आणि शेवटची आशा वाटणाऱ्या राजकारण्यापासून उद्याची आशा वाटणाऱ्या पत्रकारापर्यंत अनेक लोकांना ऐकायची बघायची संधी देणारा वरुण सुखराजचा माहितीपट 'द ग्रेट इंडीयन इल्युजन'...
श्रीमंत अर्थव्यवस्था असलेल्या गरीब लोकांच्या देशात अर्थकारणावर चर्चा झालीच पाहिजे; ही चर्चा सोप्या भाषेत झाली पाहिजे. प्रामाणिकपणे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं धाडस करणाऱ्या या डॉक्युमेंटरीबद्दल वरुण सुखराज आणि संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन!
'टू मच डेमोक्रसी' आणि 'जमूरा' या दोन डॉक्युमेंटरीजद्वारे शेतकरी आंदोलन आणि निवडणुकीचा खेळखंडोबा यावर अभ्यासपूर्ण आणि सोपी मांडणी यशस्वीपणे करणाऱ्या वरुणची ही नवीन कलाकृती.
उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी बँकांनी कर्जपुरवठा केला पाहिजे हे खरं; पण रिझर्व्ह बँकेचे नियम, अर्जदाराचा कर्ज-इतिहास, बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास आणि सल्ला, या सगळ्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाटलेल्या कर्जांची भरपाई सर्वसामान्य ठेवीदारालाच करायला लागते.
परतफेड करण्याची इच्छा आणि तयारी नसलेल्यांना कर्जवाटप कसं केलं जातं, ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या कर्जाचा व्याजदर मर्सिडीज खरेदीसाठीच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त कसा लावला जातो, औद्योगिक विकासासारख्या विशिष्ट उद्देशाने स्थापन केलेल्या बँकांची अपेक्षित भूमिका बदलल्याचा अर्थव्यवस्थेवर कसा आणि काय परिणाम होतो, अशा अनेक तांत्रिक बाबी, आकडेवारीसोबतच सुरस आणि चमत्कारिक घटना आणि किस्से या डॉक्युमेंटरीमधे बघायला ऐकायला मिळतात.
यापैकी काही बातम्या आपण कधीतरी वाचलेल्या असतात, पण त्यावेळी त्याचा आपल्याशी काय संबंध असं म्हणून आपणच दुर्लक्षित केलेल्या असतात. त्या सगळ्यांची अशी एकत्रित मांडणी बघून आपण एक व्यक्ती आणि एक देश म्हणून आर्थिक दलदलीत किती खोल रुतत चाललो आहोत याचा अंदाज यायला लागतो.
मागच्या काही वर्षांमधे भारताच्या बँकींग प्रक्रियेमधे काय आणि कसे बदल होत गेले, त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि व्यक्ती ते उद्योग या सगळ्यांवर काय आणि कसा परिणाम झाला, याचं एक उत्तम डॉक्युमेंटेशन तर हे आहेच; पण चालू काळात या माहितीचा उपयोग करून भविष्यातलं नुकसान कमी करण्याची संधीदेखील यामुळं मिळू शकते.
ही डॉक्युमेंटरी लोकांनी बघावी, मित्रांना सहकाऱ्यांना मुला-मुलींना दाखवावी, त्यावर चर्चा घडवून आणावी, आणि पोपट बोलत नाही, खात नाही, हसत नाही, पण जिवंत आहे या भ्रमातून स्वतःला आणि अर्थव्यवस्थेला बाहेर काढावं, म्हणजे वरुण आणि त्याच्या टीमने घेतलेले कष्ट आपल्याला ‘इल्युजन’कडून ‘सोल्युशन’कडे घेऊन जातील, अशी आशा वाटते.
‘द ग्रेट इंडीयन इल्युजन’ https://youtu.be/AKv7Tz3p_Bc
~ मंदार शिंदे
22/05/2026







