ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label 007. Show all posts
Showing posts with label 007. Show all posts

Friday, March 26, 2010

झीरो झीरो सेव्हन



“धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग, आणि मग सुरु होतो खेळ विध्वंसाचा. विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील. जेम्स बाँड म्हणतो, “विधायक कामांशी माझं फार सख्य नाही.” बरोबरच आहे ते. हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे जेम्स बाँड! त्याला 'सुपरहिरो' म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बाँड-चाहत्याला, जेम्स बाँड हे एका लेखकानं निर्माण केलेलं काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही. हेच सत्य असलं तरी.

जेम्स बाँड या स्वप्नवत नायकाच्या निर्मितीमागील अफलातून मेंदू आहे, इयान फ्लेमिंग यांचा. चला तर मग, बाँड थरारांच्या या लेखकाबद्दल अजून जाणून घेऊ. इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८ मध्ये झाला. सुरुवातीचं शिक्षण इटॉन इथं झालं. सॅँडहर्स्ट इथं काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्यानं, १९३१ ला ते रुचर्स न्यूज एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकाचा पीए म्हणून काम केलं, जिथं त्यांचा हुद्दा लेफ्टनंट वरुन कमांडर पर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालं.

युद्धानंतर फ्लेमिंग, केम्सली न्यूजपेपर्स मध्ये परराष्ट्र व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपलं घर, 'गोल्डनएज' बांधलं. इथंच, १९५३ मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी जेम्स बाँड कादंबर्‍यांतील पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झालं; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबर्‍यांच्या ४० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशाप्रकारे जेम्स बाँड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झालं.

'बर्ड्‌स ऑफ द कॅरीबियन' वरील एका उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाचं नाव (जेम्स बाँड), इयान फ्लेमिंगनी आपल्या नायकासाठी वापरलं. अतिशय साधं, मवाळ, व निर्विकार असं हे नाव त्यांना आवडलं. बाँडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगच्या अमेरीकन रेल्वेसंबंधी गोष्टीतून आला, ज्यामध्ये एका नवीन इंजिनासाठी हा नंबर वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटीश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा.

जेम्स बाँडला नैतिकतेची चाड असून, आत्मपरीक्षणाची अशी क्षमता आहे जी त्याच्या खुनी व विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारुन आत्मक्लेशाकडे झुकते. इयान फ्लेमिंग स्कॉटीश वंशाचे होते, आणि त्यांच्या मनात, बाँडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लंड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचं वेड, या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती. लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचं बहुतेक मनोरंजक लिखाणांमध्ये न आढळणारं, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात यायचं.

जेम्स बाँड च्याच बाबतीत बोलायचं झालं तर तो एक चिरंजीव नायक आहे, आणि त्याच्या थरारक कारवायांसाठी हे जग देखील पुरेसं नाही.



Share/Bookmark