ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, March 3, 2010

एक महात्मा

एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला.
रस्ता होता त्याचा दूरचा, आणि अगदी उंचावरचा,
आमच्या मानेवर मात्र पापांचे ओझे...
मान वर करुन पाहूही नाही शकलो, सन्मार्ग तयाचा.
नेणार होता तो स्वर्गाकडे आम्हांला - आपल्याबरोबर घेऊन,
आम्ही मात्र पाताळातच गेलो - मोहाच्या पाशात अडकून.
एक युधिष्ठिर होऊनी गेला - 'कुत्र्या'साठी स्वर्गही नाकारला,
देवांचा राजा रथ घेऊनी उभा - त्यालाही अट्टाहास हा न उमगला !
त्या 'धर्मा'चाच अवतार हा, 'बापू' बनुनी आला पुण्यात्मा..
'गोडसे'च काय - आम्हालाही नाही समजला तो महात्मा, तो पुण्यात्मा !!


Share/Bookmark

Tuesday, February 16, 2010

जेव्हा सूर्य विसावतो...

अंधार साचू लागतो आसमंतात,
दुनियेला करीत भयभीत
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

आली खोट्याची दुनिया, गेला सत्याचा जमाना,
सावरण्या तोल जगाचा, सारे शोधतात महात्मा.
तूच तो महात्मा बन, असत्याशी युद्ध करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

इमानदारीला मोल नाही, पैशाचा आहे वचक,
मारणारेच सारे जमलेत, कोण आहे तारक?
तूच तो तारक बन, मृत्युवर मात करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

सत्य, शिव आणि सुंदरातले काहीच नाही शिल्लक,
कलियुगाच्या प्रभावामध्ये, झालेत देवही कफल्लक.
तूच एक श्रीमंत बन, त्यागाचे मूल्य वाढवीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

समर्थाच्या आधाराशिवाय, झालेत सारे लाचार,
आता तर वाटतोय सार्‍यांना, लाचारी हाच आधार.
खरा आधार होऊन दाखव, सार्‍यांचा तोल सावरीत,
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

Share/Bookmark

Monday, February 1, 2010

नटरंग















मनात आलं डोक्यात घुसलं - खूळ तमाशाचं,
कला ह्याची बावनकशी - भय कसलं मग समाजाचं.

पैसा सोडंल घरदार सोडंल - सोडंल की हो कुणी लाज,
मर्दानगीच्या गोष्टी करणारं - होईल का पर कुणी नाचं?

नावच ज्याचं गुणा - अंगी गुणांची खाण,
पुरषाच्या शरीरामधी - वागवतो बाईचा प्राण.

बाईचं घेतलं रुप स्वतः - देवानं भक्तांसाठी,
पैलवानाचा होई नाच्या - इथंच रसिकांसाठी.

ऐशी ज्याची किर्ती - देह झिजवी कलेसाठी,
मानाचा मुजरा रसिकांचा - 'अतुल' नटरंगासाठी...

Share/Bookmark

Saturday, January 16, 2010

तुझी आठवण

थंडीतल्या पहाटे
धुक्यात हरवलेल्या वाटेवर
नजर काहीतरी शोधते,
तू कुठे दिसतेस का
हळूच चाहूल घेते..

वैशाखातल्या दुपारी
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर
तुझीच सावली दिसते,
मृगजळामागे धावतो म्हणून
जग मलाच हसते..

हुरहुरणार्‍या कातरवेळी
वार्‍याच्या झुळकेबरोबर
तुझे हसणे ऐकू येते,
माझ्या डोळ्यांतील अश्रूदेखील
गालावरच सुकवून जाते..

रात्रीच्या एकांतामध्ये
चांदण्यांनी भरलेल्या नभातून
नाजूक चंद्रकोर खुणावते,
अशी कशी क्षणोक्षणी
तुझी आठवण मला सतावते?

Share/Bookmark