धुक्यात हरवलेल्या वाटेवर
नजर काहीतरी शोधते,
तू कुठे दिसतेस का
हळूच चाहूल घेते..
वैशाखातल्या दुपारी
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर
तुझीच सावली दिसते,
मृगजळामागे धावतो म्हणून
जग मलाच हसते..
हुरहुरणार्या कातरवेळी
वार्याच्या झुळकेबरोबर
तुझे हसणे ऐकू येते,
माझ्या डोळ्यांतील अश्रूदेखील
गालावरच सुकवून जाते..
रात्रीच्या एकांतामध्ये
चांदण्यांनी भरलेल्या नभातून
नाजूक चंद्रकोर खुणावते,
अशी कशी क्षणोक्षणी
तुझी आठवण मला सतावते?
