तू प्रसन्न होशी आशीष दिधशी, मोरया रे बाप्पा मोरया।।
लेकरं तुझी ही जनता, कुठं जाती तू बुध्दी वाटता?
तुझ्या नावानं मांडती बाजार पैशांचा, मोरया रे बाप्पा मोरया।।
तुझा उत्सव भक्तिभावाचा, ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा।
का धमक्या देऊन खंडण्या उकळती, मोरया रे बाप्पा मोरया।।
आकार मोठा तुझ्या कानांचा, ऐकशी तू धावा दीन-दुबळ्यांचा।
कान फाटेस्तोवर का मग आरत्या घोकती, मोरया रे बाप्पा मोरया।।
तू होतास रे स्वामी विश्वाचा, आता संसार तुझा रस्त्यावरचा।
तुझी धिंडही काढती पाण्यात बुडवती, मोरया रे बाप्पा मोरया।।
आता दाखव हिसका अंकुशाचा, भरलाय घडा मानवाच्या पापांचा।
त्यांची मस्ती जिरव जे तुला-मला छळती, मोरया रे बाप्पा मोरया।।

No comments:
Post a Comment