ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, January 19, 2014

कसाबच्या बिर्याणीची गोष्ट

काल एका समारंभात बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला खुलासा -

आर्थर रोड तुरुंगात अजमल कसाबची केस कडेकोट बंदोबस्तात सुरु होती. दिवस राखी पौर्णिमेचा होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, 'सव्वीस अकरा'चा आरोपी कसाबपासून पाच फुटांवर बसले होते. निकमांच्या डाव्या मनगटावर राखी बांधलेली होती, तिच्याकडं बोट दाखवून कसाबनं खुणेनंच विचारलं, हे काय आहे? निकमांनी त्याला राखी म्हणजे काय, बहीण-भावाच्या नात्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. न्यायाधीश अजून आले नव्हते, पण कसाबच्या केसचं 'लाइव्ह रिपोर्टींग' करण्यासाठी झाडून सगळ्या देशी-विदेशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उज्ज्वल निकम कसाबशी बोलत असतानाच न्यायाधीश आले. त्यांनी निकमांना 'काय चाललंय?' असं विचारलं. त्यावर, कसाब राखीबद्दल विचारत होता म्हणून त्याला माहिती देत होतो, असं निकमांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यात बहिणीचा उल्लेख आला तेव्हा कसाबची मान शरमेनं खाली गेली, असं एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पाहिलं (म्हणे)! त्याबरोबर काही अतिउत्साही प्रतिनिधी बाहेर उभ्या असलेल्या ओबी व्हॅन्सना ही 'ब्रेकींग न्यूज' द्यायला पळाले. झालं, सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही न्यूज फुटली, तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले... 'बहिणीच्या आठवणीनं कसाबच्या डोळ्यांत पाणी!', 'कसाब खरंच गुन्हेगार की फक्त बळीचा बकरा?', 'कसाबमधे जिवंत आहे माणुसकी', 'कोवळ्या वयात चुकलेला कसाबसुद्धा एक सामान्य माणूस', वगैरे वगैरे. दुपारी साधारण दीडच्या सुमारास फुटलेल्या या बातमीनं संध्याकाळपर्यंत सगळी चॅनल्स, संपूर्ण मीडिया व्यापून टाकलं.

संध्याकाळी पाच वाजता केसचं कामकाज संपवून निघालेल्या उज्ज्वल निकमांना त्यांच्या 'इंटेलिजन्स ऑफीसर'चा मेसेज मिळाला - 'सर, बाहेरचं वातावरण इमोशनली चार्ज केलं गेलंय, कसाबला भरपूर सिंपथी मिळवून दिली जातीय!' आता बाहेर पडल्यावर सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि माइक आपल्यावर रोखले जाणार याची कल्पना असल्याने काय बोलायचं याचा विचार करत उज्ज्वल निकम बाहेर आले. अपेक्षेप्रमाणे सर्व प्रतिनिधी त्यांच्यावर तुटून पडले - 'कसाब खरंच रडला का? कसाब काय म्हणाला? कसाबला बहीण आहे का? वगैरे वगैरे.' उज्ज्वल निकमांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, 'कसाबनं आज मटण बिर्याणी मागितली.' बस्स!

न्यूज चॅनेल्सवर ताबडतोब दुसरी ब्रेकींग न्यूज - 'कसाब निर्दयी अतिरेकी, निरपराध लोकांची हत्त्या करून वर बिर्याणी मागितली!' पुन्हा तज्ज्ञांचे पॅनल्स चर्चेला बसले, 'किती निर्दयी माणसं तयार केलीत पाकिस्ताननं, अशा दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे, वगैरे वगैरे.' आता 'कसाबनं मटण बिर्याणी मागितली' एवढ्यावर न थांबता, मीडियातल्या काही क्रिएटीव्ह लोकांनी नवीनच बातमी बनवली, 'सरकार कसाबला रोज बिर्याणी खाऊ घालतंय!!' आणि मग सुरु सरकारला (टु बी स्पेसिफिक, कॉंग्रेसला आणि आर. आर. आबांना) झोडपणं... 'कसाबला बिर्याणी खायला घालणारं सरकार' असा प्रचार... आणि अशाच अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी!

अलीकडेच एका चॅनेलवर 'सव्वीस अकरा' संबंधित कार्यक्रमात उज्ज्वल निकम आणि आर. आर. पाटील दोघेही सहभागी होते. त्यावेळी सर्वप्रथम निकमांनी या 'बिर्याणी प्रकरणा'चा जाहीर खुलासा केला, तेव्हा आर. आर. आबा म्हणाले, 'आत्ता मला कळालं कसाबच्या बिर्याणीमागं कुणाचा हात होता!'

(ही गोष्ट इथं सांगण्याचा उद्देश 'मीडिया पब्लिकला कसं आणि काय बनवतंय आणि पब्लिक कसं बनतंय, ते कळावं' इतकाच!)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment