ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, March 19, 2014

शिवजयंती… परत?

आज पुणं कसं बाळंतिणीच्या खोलीसारखं सजलंय. सगळीकडं भगव्या लंगोट्या वाळत घातलेल्या दिसतायत... काल रात्री बारा वाजता मोटारसायकलींच्या पुंगळ्या काढून 'जय भवानी जय शिवाजी' किंचाळत 'तरुणाई' रस्त्यांवर सांडली होती. आज दिवसभर कर्कश्श आवाजात पोवाडे आणि असंबद्ध गाणी (हो, आत्ताच 'ये देश है वीर जवानों का' आणि 'गणराज रंगी नाचतो' ऐकून आलोय) वाजवली जातायत. संध्याकाळी तर 'चिकनी चमेली' आणि 'तुझा झगा' वगैरे हमखास ऐकायला (आणि बघायला) मिळणार, तेही 'भव्य' स्वरुपात (हो, आमचं महाराजांवरचं प्रेमच भव्य-दिव्य आहे ना!).

होय, आज शिवजयंती आहे… परत!! आत्ता गेल्या महिन्यातच तर झाली होती? असू दे, असू दे. महाराज आहेत ते, मराठी आणि हिंदू माणसाचे (मूळ)हृदयसम्राट. त्यांच्यावर कुठं शंका घ्यायची? उगाच भावना दुखावल्या जातील, नाही का? वर्षातून दोनदाच काय, मासिक जयंती साजरी करा भौ… आपल्या बापाचं काय जातंय? नाही तरी मराठी माणसाला अभिमान वाटावं अशी गोष्ट शंभर-दोनशे वर्षांतून एखादीच घडते. मग पुढं वर्षानुवर्षं, पिढ्यान्‌पिढ्या नुसती जयंती आणि पुण्यतिथी.

आता यावर आजूबाजूचे काही ‘वैचारिक हिंदुत्ववादी’ (विरोधाभास वाटतोय खरा, पण लेट्स अझ्युम) म्हणतात की, “जयंती-स्मृतिदिन वगैरे साजरे केलेच पाहिजेत, जेणेकरुन या थोर विभूतींचा वसा पुढे घेऊन जाता येईल. शिवाय या दिवशी काही चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही होतातच. पेला अर्धा आहे अजून… तळाला गेलेला नाही”, वगैरे वगैरे!

खरं सांगायचं तर, हे 'अर्धा पेला' तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. शिवजयंती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं, हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्या लोकांना (आणि स्वतःलाही) विचारून बघा. किती जण 'चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, विचारांचा वसा' वगैरे उत्तर देतात पहा. सगळ्यांच्या दृष्टीनं हे असले सण आणि जयंत्या-मयंत्या म्हणजे डोक्याला तापच असतो. ट्रॅफीकची वाट, रस्त्यांचा सत्यानाश, कानांवर अत्याचार, अतिउत्साही भक्तांचा आणि कार्यकर्त्यांचा माज, अशाच गोष्टी समोर येतात. हे वास्तव स्विकारल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. त्यामुळं आपला समाज आजारी आहे, हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे! आम्ही निरोगी आहोत, या भ्रमात राहिल्यास उपचाराची आशाच उरणार नाही…

असो. आता येत्या १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीची तयारी महिनाभर आधीच जोमात सुरु आहे. १४ एप्रिलची होर्डींग्ज १२ मार्चलाच लावली गेलीत. तेवढ्या आठवड्याभरात पुण्यातले कुठले रस्ते टाळायचे, याची यादीच बनवली पाहिजे. म्हणजे किमान स्वतःपुरता मनस्ताप तरी टाळता येईल, नाही का?


Share/Bookmark

No comments:

Post a Comment