"...जेव्हा एखादी समस्या खूप प्रयत्न करुनही सुटत नाही तेव्हा प्रयत्नांची दिशा बदलावी लागते. प्रॉब्लेम तोच असेल तर सोल्युशन बदलावं लागतं.
मला आमच्या पॅरीसच्या एका रेस्टॉरंटच्या मालकानं सांगितलेला किस्सा आठवला...
पीक सीझनमधे दिवसाला पस्तीस बसेसना तो लंच देतो. पस्तीस बसेस म्हणजे पंधराशे लोक. रेस्टॉरंटची कपॅसिटी विचारली तर म्हणाला अडीचशे. म्हणजे सहा बॅचेस तर कमीत कमी. सहा बॅचेस म्हणजे सहा तास.
जोक म्हणून मी विचारलं, "सकाळपासून संध्याकाळपर्यंत लंच सर्व्ह करता की काय?"
तर म्हणाला, "ह्यापाठी एक स्टोरी आहे."
"आम्ही भारतातून आलो, इथं रेस्टॉरंट सुरु केलं, हळू हळू जम बसला, रेस्टॉरंट मोठं करीत गेलो. जागा वाढली पण जास्त लोकांना केटर करता येईन. प्रत्येक येणारा ग्रुप किमान एक ते सव्वा तास घ्यायचा जेवायला. जेमतेम सातशे पर्यटक जेवून जायचे. भारतीय पर्यटकांची संख्या वाढत होती, बिझनेस समोर दिसत होता, पण प्रत्येक ग्रुप जेवायचा कालावधी काही कमी होत नव्हता. आम्ही माणसं वाढवली, सेकंड सर्व्हींग फास्ट केलं, पण काहीही उपयोग नव्हता.
"प्रत्येक ग्रुप अर्ध्या तासात जेवणं हा रिझल्ट आम्हाला हवा होता. आणि येणा-या प्रत्येक पर्यटकालाही ते हवं होतं, कारण स्थलदर्शन पूर्ण करायचं होतं.
"काय काय करता येईल ह्याची चर्चा सुरु असताना आम्हाला समस्येचं मूळ मिळालं, रूट कॉज. पर्यटकांचं जेवण अर्ध्या तासात होत होतं, त्यांना वेळ लागत होता तो टॉयलेटसाठी. कारण एवढ्या सर्वांसाठी तिथं चारच टॉयलेट्स होती आणि त्या रांगेत लोकांचा वेळ जात होता. टॉयलेट्स वाढवल्या तर प्रत्येक बॅच अर्ध्या तासात, फार फार तर चाळीस मिनिटात बाहेर पडू शकेल हे 'युरेका!' सोल्युशन आम्हाला मिळालं. आणि आम्ही चार-पाच नव्हे तर तब्बल वीस टॉयलेट्स बनवल्या. समस्येचं मूळच उखडून टाकलं मुळापासून. आता आम्ही सीझनमधे पंधराशेहून अधिक पर्यटकांना आपलं स्वादिष्ट भारतीय भोजन देऊ शकतोय."
तेवढ्याच जागेत, तेवढ्याच कर्मचा-यांमधे आमच्या ह्या मित्रानं त्याचा बिझनेस डबल केला."
- वीणा पाटील, वीणा वर्ल्ड (लोकमत मंथन, १८ डिसेंबर २०१६)

No comments:
Post a Comment