ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, November 23, 2019

चोरीमागची प्रेरणा...

गाण्यांच्या चाली किंवा शब्द चोरण्याबाबत एक किस्सा आहे, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतला...

सचिनच्या एका सिनेमासाठी अरुण पौडवाल संगीत दिग्दर्शन करत होते. खूप कष्टानं त्यांनी एक चाल बनवली आणि सचिनला ऐकवली.

ऐकल्याबरोबर सचिन लगेच म्हणाला, ही तर सरळ-सरळ कॉपी आहे.

अरुणजी बुचकळ्यात पडले. त्यांनी तर खूप विचार करुन, प्रयत्न करुन चाल लावली होती. त्यांना सचिनच्या बोलण्याचं वाईट वाटलं.

पण सचिनच्या म्हणण्यानुसार, या नवीन गाण्याच्या ट्युनवरुन कुणीही जुनं ओरिजिनल गाणं लगेच ओळखून दाखवेल... अरुणजींना मात्र सचिन कुठल्या गाण्याबद्दल बोलतोय, काहीच कळेना.

शेवटी जेव्हा सचिननं अरुणजींना ते ओरिजिनल गाणं गाऊन दाखवलं, तेव्हा अरुणजींना प्रचंड आश्चर्य वाटलं. आपल्याला एवढं लोकप्रिय गाणं कसं काय आठवलं नाही आणि एवढ्या प्रसिद्ध गाण्यासारखीच चाल आपल्याला कशी काय सुचली?

यावर अरुणजींचं म्हणणं असं होतं की, आपल्या कानांवर लहानपणापासून काही गीतांचे, सुरांचे, चालींचे, शब्दांचे संस्कार झालेले असतात. त्यांचं प्रतिबिंब कळत-नकळत आपल्या निर्मितीवर पडतच असतं. ते आपण टाळू शकत नाही. मग कुणी त्याला प्रेरणा म्हणेल, कुणी चोरी...

अरुण पौडवालांनी रचलेलं नवीन गाणं होतं - "उधळीत ये रे गुलाल सजणा, तू शाम मी राधिका..."

आणि या गाण्याची चाल ऐकून सचिनला आठवलेलं 'ओरिजिनल' गाणं होतं - "भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे..."

(हा किस्सा अरुण पौडवालांनी स्वतः दूरदर्शनवर एका मुलाखतीत सांगितला होता.)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment