गुलाबी हत्ती
(लेखक - मंदार शिंदे)
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका दूरवरच्या देशात एक जंगल होतं. हिरवीगार झाडं, पाणी निळं-निळं; हवा होती स्वच्छ आणि आकाश होतं मोकळं. उंदीर आणि सशापासून वाघ-सिंहांपर्यंत खूप खूप प्राणीसुद्धा होते. माकडं होती, जिराफ होते, साप आणि अस्वल होते. आकाशामध्ये उंच उडणारे घार आणि गरूड होते. चिमणी होती, पोपट होते, पाण्यामध्ये बदक होते. पण या सगळ्यांपेक्षा वेगळे तिथं शेकडो भव्य हत्ती होते.
हत्तींचा जंगलात दरारा होता; जंगलाच्या सीमेवर त्यांचा पहारा होता. बाकीच्या प्राण्यांमध्ये मिसळत नव्हते; हत्ती स्वतःच्याच मस्तीत जगत होते. एक तर हत्तींचा आकार होता मोठा, त्यातून एकत्रच फिरायचा त्यांचा रिवाज देखील होता. भले-थोरले हत्ती जेव्हा धूळ उडवत फिरायचे, बाकीचे प्राणी झाडा-झुडपात हळूच लपून बसायचे. तसा त्यांनी मुद्दाम कुणाला त्रास नसेल दिला; पण बाकीचे म्हणायचे, उगाच कशाला हत्तींच्या नादाला लागा? चालता-चालता चुकून त्यांच्या पायाखाली यायचो, चेंदामेंदा होऊन आपण उगीचच मरून जायचो. त्यापेक्षा आपण आपले बाजूलाच बरे; झाडावरून, झुडपामधून बघत राहू सारे.
या जंगलातल्या हत्तींची एक खासियत होती. नेहमीच्या हत्तींपेक्षा त्यांची वेगळी ओळख होती. नेहमीचे हत्ती कसे काळे-करडे दिसतात; लठ्ठ आणि बेढब अंग सांभाळत फिरतात. या जंगलातले हत्ती मात्र फक्त काळे नव्हते; हत्ती आणि हत्तीणींचे दोन रंग होते. पुरुष हत्ती काळे-करडे होते दिसायला; पण हत्तीणींचा कळप होता गुलाबी रंगाचा. छोट्या-मोठ्या हत्तीणी गुलाबी रंगाच्या; रंगावर स्वतःच्या त्या खूपच खूष दिसायच्या. पुरुषांपेक्षा वेगळ्या आहोत आपण दिसायला; कित्ती कित्ती झटायच्या हा रंग टिकवायला.
जंगलाच्या मधोमध एक मोठ्ठं कुंपण होतं; हत्तीणींच्या कळपाचं तेवढंच जग होतं. पुरुष हत्ती जंगलभर हुंदडत फिरून यायचे; हत्तीणींचे कळप मात्र कुंपणामध्येच रहायचे. कुंपणाच्या आतमध्ये छोटी-छोटी झाडं होती; एक छोटं तळं आणि हत्तीणींची दाटी होती. पुरुष हत्ती खात फिरायचे गवत हिरवं-हिरवं; झाडावरून तोडून घ्यायचे रसरशीत फळं. हत्तीणींना असलं काही खायची बंदी होती; त्यांच्यासाठी कुंपणाच्या आत खायची सोय होती. गुलाबाची रोपं होती कुंपणाच्या आत पसरलेली; तळ्यामध्ये कमळंसुद्धा गुलाबीच उमललेली. गुलाबी फुलं खाऊनच त्यांचा रंग गुलाबी झाला होता; तोच रंग टिकवायला डाएट प्लॅन ठरला होता.
“कमी खा, जाड होशील!”
“गुलाबी खा, गुलाबी राहशील!”
“हत्तीसारखी चालू नको, पाय नीट टाक!”
“हत्तीण आहेस, हत्ती नाही, लक्षात ठेवून वाग!”
मोठ्या हत्तीणी लहान हत्तीणींना व्यवस्थित शिकवत होत्या; काय करायचं, काय नाही, सतत त्यांना ऐकवत होत्या. पुरुष हत्ती कुंपणाभोवती फेर धरून नाचायचे; जगभरचं शहाणपण हत्तीणींना शिकवायचे.
“हत्तीण कशी नाजूक हवी!”
“सुंदर आणि साजूक हवी!”
“कुंपणाच्या आत तुझं खरं जग आहे!”
“छान गुलाबी दिसण्यासाठीच तुझा जन्म आहे!”
पुरुष हत्ती सांगायचे मग जंगलातल्या गमती-जमती; प्राणी पक्षी फुलं झाडं केवढी अवती-भवती. पण बाहेर जावं वाटलं कधी एखाद्या हत्तीणीला; खूप वाईट आहे जग, सांगायचे सगळे तिला. बागडणाऱ्या काळ्या-करड्या हत्तींकडे बघत, हत्तीणी बिचाऱ्या दिवस काढायच्या गुलाबाची फुलं हुंगत. तीच फुलं खायच्या आणि कानांमागं खोचायच्या; त्याच फुलांच्या माळा करून गळ्यामध्ये घालायच्या. गुलाबी अंगावर गुलाबी फुलं दिसायची तशी शोभून; पण कंटाळा यायचा एकच रंग आयुष्यभर बघून. एकमेकींच्या रंगांची मग तुलना करत बसायच्या; माझाच रंग खरा गुलाबी, भांडणसुद्धा करायच्या. जिचा रंग कमी गुलाबी, तिला टोमणे मारायच्या; हिरवं गवत खाल्लं असशील म्हणून तिला चिडवायच्या.
अशीच एक छोटुशी हत्तीण होती मधु; गुबगुबीत गोंडस मधु पळायची दुडुदुडु. कुंपणाच्या आत बागडायची, तळ्यामध्ये डुंबायची; आईची नजर चोरून हळूच हिरवं गवत चरायची. आईच्या जीवाला घोर मोठ्ठा मधुमुळं लागला; जन्मापासून रंग तिचा काळाच होता राहिला. गुलाबी रंग आणायला आई कित्ती प्रयत्न करायची; ताजे टवटवीत गुलाब रोज वेचून-वेचून आणायची. मधुसाठी बनवायची ती गुलाब घालून गुलाबजाम; गुलकंद आणि गुलाब शेकचा रतीब सकाळ-संध्याकाळ. गुलाबाची बनवून पोळी मधुबाळाला चारायची; झोपताना पण गुलाबाचीच फुलं खाली अंथरायची. एवढं करून रंग मधुचा गुलाबी नाही झाला; गुलाबांचा फ्रॉकच मग आईनं शिवून घेतला. मधुच्या रंगाची कुंपणामध्ये चर्चा मोठी रंगली; खूप वर्षांनी वेगळी मुलगी कळपामध्ये दिसली.
लहानपणी मधुला याची गंमतच वाटायची; आपल्याबद्दल बोलतात सगळे भारीच गोष्ट वाटायची. पण हळूहळू कळू लागलं तिला खोचक बोलणं; सगळ्यांमधून बाजूला काढणं आणि सारखे टोमणे मारणं.
“काय तिचा रंग, काय तिचं अंग!”
“असली कसली हत्तीण, हत्तीसारखी दबंग?”
“शोभत नाही आपल्यात, काढा तिला बाहेर!”
“आमच्या मुली बिघडतील ना, बघून तिचे थेर!”
आई मधुची हताश व्हायची, ऐकून सगळा कल्ला; मधु मात्र वागत राहिली एकदम खुल्लमखुल्ला. गुलाबांचा फ्रॉक तिनं केव्हाच फाडून टाकला, गुलकंदाचा जारसुद्धा खळ्ळ फोडून टाकला. बोलणाऱ्यांनो बोलत रहा, मला फरक नाही पडत; तोंडावरच सुनावून ती मस्त चरत सुटायची गवत. माझा रंग माझं अंग मला आवडतं खूप; तुमच्या डोळ्यात खुपतंय तर डोळे मिटून घ्या निमूट.
आता मात्र हद्द झाली, सगळ्याजणी भडकल्या; त्या दिवशी गुलाबी नाही, लालच दिसू लागल्या. डोळ्यांमध्ये पेटली आग, कानांमधून निघाला धूर; मधुच्या आईला हुकूम केला, मुलीला कुठंतरी पाठवा दूर. आमच्या समोर नका ठेवू असलं कुरूप ध्यान; आमचा नाही निदान आमच्या रंगाचा ठेवा मान. आई बिचारी रडली आणि मधुला भरला दम; गुलाबी होऊन दाखव नाहीतर सोडून जा हे कुंपण.
आईची परवानगी मिळताच मधु खूप-खूप खूष झाली; गुलाबी पिंजरा तोडून एका मिनिटात धूम पळाली. सगळ्या जणी बघत राहिल्या जिकडं उडाली धूळ; नंतर गेल्या विसरून मधुचं जगावेगळं खूळ. गुलाबाची फुलं पुन्हा-पुन्हा तोडून खात राहिल्या; गुलकंदाच्या बरण्या पुन्हा भरून ठेवू लागल्या. अधून-मधून आईला आठवण मधुबाळाची यायची; पण असली उद्धट मुलगी नकोच, स्वतःची समजूत काढायची. मधुच्या मैत्रिणी विचारत होत्या आपल्या-आपल्या आयांना; कुठं गेली कशी गेली मधु, आम्हाला पण जाऊ द्या ना. गुलाबी हत्तीणी लाल डोळ्यांनी मुलींकडं बघायच्या; मुली बिचाऱ्या कान पाडून गुलाब चघळत बसायच्या.
थोड्याच दिवसांनी मैत्रिणींना पुन्हा दिसली मधु; कुंपणाच्या बाहेर हत्तींबरोबर खेळत होती हुतुतु. नदीवर गेली, डुंबून आली, लोळली मस्त मातीत; झाडावरची फळं तोडून खाल्ली सोंड हलवीत. कुंपणाच्या आतून बघू लागल्या तिच्या साऱ्या मैत्रिणी; आपल्यासारखीच असून मधु दिसते-वागते कशी. हत्तींबरोबर खेळणं-बोलणं आपल्याला कुठं शोभतं; मधु गेली कुंपणाबाहेर, तेच बरं होतं. आपण कशा खूष आहोत, एकमेकींशी बोलल्या; कुंपणामधल्या हत्तीणी त्या खोटं-खोटंच हसल्या.
पण रोज-रोज मधुला बघून मावळलं त्यांचं हसू; आपण कधी करणार मजा, विचार झाला सुरु. थोड्याच दिवसांत हळूच एक हत्तीण पळून गेली; कुंपणाबाहेर मधुसोबत खेळताना दिसू लागली. दुसरी गेली, तिसरी गेली, कळपात उडाली खळबळ; पुरुष हत्ती आणि हत्तीणी घाबरून गेल्या पुष्कळ. नाही धाक, नाही भीती, बंडच उभं राहिलं; हत्ती आणि हत्तीण यातलं अंतर संपू लागलं. बाहेर पडून खाल्लं गवत, खाल्ली फळं ताजी; बघता-बघता उतरू लागला रंग त्यांचा गुलाबी.
सगळेच खूष दिसू लागले, कसलंच नाही बंधन; कुठेही जा, काहीही खा, उरलं नाही कुंपण. हत्ती आणि हत्तीण आता सारखेच दिसायला लागले; एकमेकांशी मोकळे आणि समान वागायला लागले. वेगळेपणाचा हट्ट आणि गळून पडला तोरा; सगळ्या हत्तींचा रंग झाला पाटीसारखा कोरा. तेव्हापासून हत्तींमध्ये समानता झाली सुरु; या सगळ्याला निव्वळ आपली निमित्त झाली मधु!
(अदेला तुरीन, इटली यांच्या १९७६ साली प्रकाशित ‘कॅन्डी पिंक’ कथेवर आधारीत…)
- मंदार शिंदे
9822401246