मला पनीर घालून बनवलेली भाजी आवडते; पण पालक आवडत नाही. पालक पनीर काही लोकांची आवडती डिश असू शकेल. पालक पनीर बनवणं ही मार्केटची गरजदेखील असू शकेल. पण याचा अर्थ मी पनीर सोडून पालकाची स्तुती करावी असा होत नाही. पालक न वापरता पनीरची भाजी कुठे मिळते याचा मी शोध घेऊ शकतो किंवा तशी भाजी मिळेपर्यंत वाट बघू शकतो.
पालक तोंडात गेला की कसंतरी वाटत असताना फक्त पालक आणि पनीरची युती झाल्यामुळं पालकाला गोड मानून घ्यावं, असं मला वाटत नाही. शिवसेना (बाळासाहेबांची, धर्मवीरांची, उद्धवची, राजची, अमितची, आदित्यची, किंवा आणखी कुणाची) म्हणजे धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेचा फायदा घेऊन राजकारण करणारी टोळी आहे. निवडणूक आयोगानं त्यांना राजकीय पक्षाचा दर्जा दिलेला असला तरी सेनेच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं वागणं एखाद्या टोळीसारखंच राहिलेलं आहे.
२०१९ मध्ये राजकीय अपरिहार्यतेमुळं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन महाविकास आघाडी स्थापन करावी लागली. अचानक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांना शिवसेना नावाचा पालक गोड लागायला लागला. अकार्यक्षमतेला संयमी भूमिका म्हटलं जाऊ लागलं. पोकळ घोषणांना दुर्दम्य आशावाद म्हटलं जाऊ लागलं. अव्यावहारिक आवाहनांना कौटुंबिक साद समजलं जाऊ लागलं. भाजपा सोबत गेलेल्या गुन्हेगारांचं शुद्धीकरण होतं, त्याच धर्तीवर काँग्रेससोबत आलेल्या शिवसेनेचं पापक्षालन झाल्यासारखं वाटायला लागलं. कोणताही महत्त्वाचा, लोकोपयोगी निर्णय न घेता, अननुभवी नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व मानलं जाऊ लागलं.
पदरी पडलं आणि पवित्र झालं, असं समजून (किंवा खरोखर मनापासून ही जोडी स्वीकारून) अपयशांवर पांघरुण घालण्याच्या आणि कोरड्या आडातून पोहरा भरून काढण्याच्या धडपडीत मूळच्या काँग्रेसी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, संतुलित नेत्यांची आणि त्याहून जास्त सामान्य कार्यकर्त्यांची भयानक दमछाक आणि फरफट झालेली मागच्या अडीच वर्षात दिसून आली. ही दमछाक आणि फरफट नुसती विनोदीच नाही, तर केविलवाणी सुद्धा आहे.
काय तो पक्ष, काय ते चिन्ह, काय ते नेते, एकदम बोगस आहे सगळं. तरीसुद्धा आपला वेळ, बुद्धी, ताकद खर्च करून काही माणसं कुठलीतरी बाजू घ्यायचा प्रयत्न करताना दिसताहेत. हरकत नाही, ज्याची त्याची निवड.
पण यामुळं खरे मुद्दे बाजूला पडताहेत. मूळ प्रश्नांवर ना युती सरकार काम करतंय, ना आघाडी सरकार. पण कुठली तरी बाजू घ्यायच्या धडपडीत 'खरं' राजकीय विश्लेषण, परखड मतप्रदर्शन सध्या कुणीच करत नाही, याचं वाईट वाटतंय. खरं बोलल्यामुळं कुणीतरी दुखावलं जाणारच; पण म्हणून गप्पच बसायचं किंवा एक बाजू पकडून खोट्याला खरं म्हणायची धडपड करत रहायचं, हे दोन्ही पर्याय पटत नाहीत.
असो. विषय राजकीय असला तरी चिंतन बौद्धिक आणि व्यक्तिगत आहे, त्यामुळं सूचना आणि प्रतिक्रिया अर्थातच अपेक्षित नाहीत. धन्यवाद !
मंदार शिंदे
१२/१०/२०२२
