ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, January 26, 2026

What Superhit Movies Don't Say About Fighting Terrorists

सुपरहिट होणारे चित्रपट दहशतवाद्यांशी लढण्याबद्दल काय सांगत नाहीत, या विषयावर निरूपमा राव यांचा लेख 19 जानेवारी 2026 या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडीया’मधे प्रकाशित झाला आहे.

कोण आहेत निरूपमा राव?

निरूपमा राव 2011 मधे भारताच्या परराष्ट्र सचिव (फॉरेन सेक्रेटरी) म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी चीन, श्रीलंका, अमेरिका, अशा देशांमधे भारताच्या राजदूत (ॲम्बेसॅडर) म्हणून काम केलं आहे.

2001 च्या भारत - पाकिस्तान तणावग्रस्त परिस्थितीमधे परराष्ट्र मंत्रालयातर्फे प्रवक्ता म्हणून भारताची अधिकृत भूमिका मांडायचं काम त्यांनी केलं. 2008 च्या ताज-मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच, 2010 मधे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संवादामधे त्यांनी भारताकडून परराष्ट्र सचिव म्हणून महत्त्वाच्या चर्चेत भाग घेतला.

परराष्ट्र खात्याबद्दल सोशल मिडीयावर अपडेट द्यायला निरूपमा राव यांनी सुरुवात केली. सरकारी अधिकाऱ्यांपैकी बहुतेक सगळ्यात जास्त फॉलोअर्स त्यांच्या ट्विटर अकाउंटला असतील.

निवृत्तीनंतर त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी शिकवायचं काम केलं, करत आहेत.

निरूपमा राव यांचे वडील सैन्यात कर्नल होते आणि त्यांची बहीण - डॉक्टर निर्मला कन्नन - इंडीयन नेव्हीमधून रिअर ॲडमिरल पदावरून निवृत्त झाल्या आहेत. निरूपमा राव यांचे पती सुधाकर राव निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.

निरूपमा राव यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडं किती गांभीर्यानं बघितलं पाहिजे, हे लक्षात येण्यासाठी त्यांची थोडक्यात ओळख सांगितली.

त्यांचा संपूर्ण लेख वाचण्यासारखा आहेच, पण लेखामधे मांडलेले हे मुद्दे खूप महत्त्वाचे वाटतात -

“दहशतवाद ही विचारपूर्वक हाताळायची, नियंत्रणात ठेवायची, किंवा घडू न देण्यासारखी समस्या नसते. दहशतवाद हा आपला अपमान असतो, ज्याला शक्यतो रक्तबंबाळ उत्तर द्यायचं असतं,” असं सांगायचा प्रयत्न ‘धुरंधर’सारखी फिल्म करते.

अशा प्रकारच्या गोष्टी सिनेमातून सांगितल्या म्हणून युद्धं होतात का? नाही, पण समाजातलं भावनिक वातावरण बदलायचं काम अशा प्रकारच्या गोष्टी करतात, ज्यामुळं माणसं सहजपणे युद्धाचा विचार करायला लागतात.

‘धुरंधर’ फिल्ममधली फॅन्टसी पाकिस्तानपुरती राखीव आहे, चीनबद्दल असलं काही बोललं जात नाही. खरंतर भारताचा जास्त ताकदवान प्रतिस्पर्धी चीन आहे. भारताच्या सुरक्षेसंबंधी वातावरणावर चीनचा प्रभाव जास्त आहे, पण अशाप्रकारे सिनेमातून आपल्याबद्दल काही दाखवलं जाणं चीन खपवून घेत नाही. एकटा हिरो जाऊन ज्याला हरवून येईल अशा व्हीलनच्या रुपात चीनला सादर करणं शक्य नाही, इतका तो ताकदवान, पद्धतशीर, आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत रुतलेला देश आहे.

भारताच्या लोकप्रिय भौगोलिक राजकारणाची आवडनिवड अस्वस्थ करणारी आहे. आपल्याला बौद्धिक पातळीवर स्पर्धा करायला लागेल असे प्रतिस्पर्धी नको आहेत. त्याऐवजी, प्रतिकात्मक पद्धतीनं ज्यांच्यावर वर्चस्व गाजवता येईल असे शत्रू आपल्याला आवडतात.

चीनबद्दल काही बोलायचं असेल तर तंत्रज्ञान, दळणवळण, औद्योगिक क्षमता, आपल्याला फायदेशीर राहतील असे निर्णय इतरांना घ्यायला लावणारी कार्यपद्धती, आणि दीर्घकाळ स्पर्धेमधे टिकून रहायची क्षमता, या गोष्टींबद्दल कथा रचायला लागतील. पाकिस्तानबद्दल बोलायचं असेल तर बदला घेण्याच्या कथांमधे काम भागतं.

वस्तुस्थिती काय आहे किंवा आपल्या भौगोलिक क्षेत्रामधे कोणते विषय नाजूक आहेत याची फिकीर न करता, आम्हाला वाटेल तीच खरी वस्तुस्थिती असं जगाला सांगायची भारताची इच्छा आहे, असं ‘धुरंधर’सारख्या फिल्म सांगायचा प्रयत्न करतात.

चित्रपट बघून युद्धं सुरू होत नसतील, पण अंधारात युद्धाचे प्रसंग बघून चेकाळायला आणि टाळ्या पिटायला शिकलेल्या समाजामधे युद्धाची अपरिहार्यता पटवून द्यायला सोपं जातं.

“What Superhit Movies Don't Say About Fighting Terrorists”
Written by Nirupama Rao
Times of India 19/01/2026
Link -



Share/Bookmark

No comments:

Post a Comment