ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label women's day. Show all posts
Showing posts with label women's day. Show all posts

Saturday, March 7, 2020

Baai (Poem)

“बाई”

पुरुष म्हणून जन्माला आल्यानं
मला आपोआप मिळालेला मोठेपणा
आणि बाई म्हणून जन्मल्यानं
तुझ्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या,
समानतेच्या गप्पा मारत स्वीकारलं
आपण सोयीस्करपणे जसंच्या तसं…

यात दोष ना तुझा ना माझा
दोष फक्त व्यवस्थेचा!

आणि व्यवस्था बदलणं म्हणजे
सोपी गोष्ट नव्हे…
त्याला लागतील शंभर-दीडशे
कदाचित पाचशे वर्षं.

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण मला फक्त गायची आहेत
गाणी तुझ्या क्रांतीची..
द्यायचे आहेत शब्द
तुझ्या व्यथा आणि वेदनांना..
मांडायची आहेत दुःखे तुझी
जाहीर सभा-भाषणांतून..
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं…

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण तुला प्रत्यक्ष भोगायच्या आहेत
त्या व्यथा आणि वेदना.
आणि पुरवायचे आहेत शब्द
माझ्या भाषणांना आणि गाण्यांना.
ती गाणी ऐकत सोसत राहशील सारं
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं
कधीतरी व्यवस्था बदलेल या आशेवर.

व्यवस्था बदलेल की नाही कोणास ठाऊक
पण एक दिवस मी जन्मेन बाई म्हणून
आणि तू जन्म घे पुरुष होऊन.
मग पाचशे वर्षं गायलेली गाणी
मी जगून बघेन पन्नास वर्षं.
एवढीशी खळबळ माजली व्यवस्थेत
तरी पुरे पाचशे वर्षांमध्ये…

- अक्षर्मन ९८२२४०१२४६


Share/Bookmark