ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, April 20, 2013

एका पोळ्याची गोष्ट

(चेतन भगत यांच्या १९ एप्रिल २०१३च्या 'टाइम्स ऑफ इंडीया'मधील लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद)

फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.

त्या पोळ्याचा कारभार चालवण्यासाठी काही ज्येष्ठ मधमाश्यांसोबत एका राणी माशीची नेमणूक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना 'सरकारी माश्या' असं म्हटलं जाई. 'कष्टकरी माश्या' त्यांचं मध सुरक्षितपणे साठवून ठेवण्याचं काम या 'सरकारी माश्यां'वर सोपवून निर्धास्त होत्या. याबाबतीत कष्टकरी माश्यांचा सरकारी माश्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाय, नवीन बगिच्यांचा शोध घेणं, पुढच्या पिढीतील तरुण माश्यांसाठी मधाचे नवनविन स्रोत शोधून काढणं, अशी कामंदेखील सरकारी माश्यांकडून अपेक्षित होती.

पोळ्याचा कारभार कुठलाही गडबड-घोटाळा न होता सुरळीतपणे चालावा, यासाठी सरकारी माश्यांनी काही नियम बनवले होते आणि कायदेही संमत करून घेतले होते. कष्टकरी माश्यांना त्यांचं पालन करावंच लागे, अन्यथा त्या शिक्षेस पात्र ठरत. पोळ्यात राहणार्‍या विविध जातीच्या मधमाश्या आपापसात भांडून पोळ्यासाठी समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा नियम व कायद्यांची गरज होती. उदाहरणार्थ, काळ्या माश्या आणि लाल माश्या असे दोन मुख्य प्रकार होते. त्यांचं काम एकाच प्रकारचं होतं. फक्त, त्या दिसायला थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या आपापल्या वेगळ्या पद्धती होत्या.

अशा या परिपूर्ण पोळ्यामधे सर्व काही आलबेल होतं. पण काळानुसार काही बदल घडत गेले. सरकारी माश्यांची स्वतःची मुलं, नातेवाईक, आणि मित्रमंडळी होती. त्यापैकी बहुतेकांना 'सरकारी माश्या' बनता आलं नाही. त्यांना इतरांसारखं 'कष्टकरी माश्या' बनूनच जगावं लागलं. पण एके दिवशी, एका ज्येष्ठ सरकारी माशीच्या मुलानं आपल्या जन्मदात्याकडं तक्रार केली की, कष्टकरी माशी म्हणून जगणं फारच कष्टाचं काम आहे. "आपल्या सरकारी मधाच्या साठ्यांमधून मी थोडंसं मध घ्यायला काय हरकत आहे?" त्यानं विचारलं. "नाही, हे अयोग्य आणि अनैतिक आहे," सरकारी माशीनं म्हटलं.

"कुणाला काऽही कळणार नाही. सरकारी गोष्ट आहे, सरकारपुरतीच राहील," सरकारी माशीच्या मुलानं उपाय काढला. बरोबरच होतं त्याचं. कष्टकरी माश्यांचा स्वतःपेक्षा जास्त सरकारी माश्यांवर विश्वास होता. थोडंसं मध गायब झालं तर कुणाच्या लक्षातही येणार नव्हतं.

आणि मग झाली की सुरुवात. हळूहळू, सगळ्या सरकारी माश्यांच्या मुलांनी, भावंडांनी, नातलगांनी, मित्रांनी, आणि हितचिंतकांनी रोज सरकारी साठ्यातलं थोडं-थोडं मध चोरायला सुरुवात केली. आता त्यांना दिवसभर बाग-बगिच्यात मजुरी करायची गरज नव्हती. अपेक्षेनुसार मधाची पातळी वाढत नाहीये, हे कष्टकरी माश्यांच्या लक्षात येऊ लागलं. काही कष्टकरी माश्यांनी हा मुद्दा उचलताच सरकारी माश्यांनी फर्मान सोडलं, "आळस झटका आणि कामाला लागा".

मधाचा साठा वाढवण्यासाठी कष्टकरी माश्या अजून कष्ट करू लागल्या. तरीसुद्धा, मधाची पातळी काही वाढेचना. उलट, दिवसेंदिवस मध कमीच होऊ लागला.

लवकरच, सरकारी माश्यांनी आणखी एक धोरण आखलं. एखाद्या नव्या बागेचा शोध लागला की सर्वप्रथम त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, आणि मित्रांना तिचा लाभ दिला जाऊ लागला. "जे कष्टकरी माश्यांना ठाऊकच नाही, ते त्यांच्याकडून हिरावून कसं घेणार," अशी कुजबूज सरकारी वर्तुळात सुरू झाली.

पुढेपुढे, मधाची पातळी तर घटत गेलीच, शिवाय कष्टकरी माश्यांच्या मुलांसाठी नव्या बागाही सापडेनाशा झाल्या. आता ते रिकामटेकडे आणि उपाशी राहू लागले. कधीकधी, राणी माशी या कष्टकरी माश्यांपुढं थोडं मध शिंपडे, आणि मग सगळीकडं राणीची वाहवा होई. तरीसुद्धा, हे शिंपडलेलं मध पुरेसं नव्हतंच.

"कोण चोरतंय आपलं मध?" शेवटी एके दिवशी, एका प्रभावशाली कष्टकरी माशीनं प्रश्न विचारलाच. ही प्रभावशाली बंडखोर माशी काळ्या माश्यांच्या गटातली असल्याचं सरकारी माश्यांच्या लक्षात आलं. म्हणून, सरकारी माश्या म्हणाल्या, "लाल माश्या चोरताहेत तुमचं मध." त्यानंतर, सरकारी माश्यांनी लाल माश्यांना बोलावून घेतलं, आणि त्यांना सांगितलं, "काळ्या माश्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारतायत असं आम्हाला वाटतंय."

उपासमार आणि कष्टानं वैतागलेल्या काळ्या आणि लाल माश्यांना संताप अनावर झाला. त्यांची एकमेकांशी तुफान भांडणं झाली. आपल्यावरची पीडा टळल्यानं या भांडणांची मजा लुटत सरकारी माश्यांनी मधचोरी सुरूच ठेवली. जसजशा लाल आणि काळ्या माश्या मरू लागल्या आणि जखमी होऊ लागल्या, तसतशा सरकारी माश्या अजून थोडं-थोडं मध शिंपडत राहिल्या. कष्टकरी माश्यांनी पुन्हा राणी माशीचा जयजयकार केला.

थोड्याच दिवसांत, त्या भागात दुष्काळ पडला. फुलांची संख्या कमीकमी होत गेली, आणि इतकी वर्षं साठवलेल्या मधाचा उपयोग करण्याची वेळ आली. पण, सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सरकारी साठ्यांमध्ये मधाचा थेंबही शिल्लक नव्हता. पूर्णपणे सरकारी माश्यांवर विश्वास ठेवून राहिलेल्या कष्टकरी माश्या सरकारी माश्या आणि त्यांच्या संबंधितांच्या घराकडं वळल्या. ते सर्वजण गलेलठ्ठ होऊन आपापल्या 'खाजगी' मधाच्या साठ्यांवर आरामात बसलेले दिसले. हे कमी म्हणून की काय, त्यांना शेकडो नव्या बाग-बगिच्यांचे नकाशेदेखील सापडले, ज्यांचा कष्टकरी माश्यांना थांगपत्ता लागू दिला नव्हता.

या सर्व प्रकारानं अचंबित झालेल्या कष्टकरी माश्या हा धक्का पचवत आपापल्या घरी परतल्या. लाल आणि काळ्या माश्यांची नजरानजर झाली. आपल्याला मूर्ख बनवण्यात आलं, हे दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून, एकमेकांना इजा पोहोचवल्याबद्दल माफी मागितली.

"आपण त्यांना चांगला धडा शिकवू," काळ्या आणि लाल माश्या एकमुखानं म्हणाल्या. कष्टकरी माश्यांना कळून चुकलं की, आपल्या नांग्या एकमेकांविरुद्ध नव्हे तर आपल्याला फसवणार्‍यांविरुद्ध वापरण्याची वेळ आलेली आहे.

दरम्यान, राणी माशीला तणावपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. तिनं आपल्या सुंदर तरुण मुलाला समोर आणलं, "हाच आता तुम्हाला वाचवेल. जसं इतकी वर्षं मी वाचवलं."

पण, लाल आणि काळ्या माश्या यावेळी सावध होत्या. त्या सगळ्या एकत्र आल्या आणि सरकारी माश्या व त्यांच्या बगलबच्च्यांवर त्यांनी आपल्या नांग्या उगारल्या. सरकारी माश्यांना आपली संपत्ती गोळा करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सगळं जागेवर टाकून त्यांना पोळं सोडून पळून जावं लागलं. लवकरच, त्यांच्यापैकी कुणीही त्या पोळ्यात उरलं नाही.

लाल आणि काळ्या माश्यांनी आपल्यापैकी सर्वोत्तम लोकांच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. तसंच, यापुढं कोणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही, सर्वांवर लक्ष ठेवायचं, असंही ठरवलं. हळूहळू पोळ्याची स्थिती सुधारत गेली, आणि मधाचा साठा पूर्ववत भरण्यासाठी नवी पिढी अजून कष्ट उपसू लागली. नव्या बाग-बगिच्यांनी नवी संपन्नता आणली, आणि ते पोळं जगातलं सर्वात यशस्वी पोळं समजलं जाऊ लागलं.

काही वर्षांनंतर, एका रात्री एक वृद्ध माशी आपल्या नातवाशी बोलताना म्हणाली, "तुला माहित्येय का, एके काळी आमच्यावर एका राणी माशीचं राज्य होतं?" "हो. पण आमच्यावर नाही. कारण आम्हाला माहित्येय की, एक छोऽटासा राजा आमच्यापैकी प्रत्येकाच्या आत लपलेला आहे," छोट्या माशीनं उत्तर दिलं.

- मंदार शिंदे
shindemandar@yahoo.com

(मूळ लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/The-underage-optimist/entry/once-upon-a-beehive)

Share/Bookmark

Tuesday, April 9, 2013

Let's Try Khawakee (Short Story)

"आई, अहो तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही खाऊ शकता. मी फक्‍त एवढंच म्हटलं की मला मटणाचा वास सहन होत नाही. त्यामुळं मी नाही बनवू शकणार तुमच्यासाठी. पण हां, हॉटेलमधून आणायचं असेल तर सांगा, मी ऑफीसमधून येताना घेऊन येईन..."

"नको नको, मला नै बै ते हॉटेलातलं आवडत. केवढा मसालाच असतो त्यात. चिकन तरी बर्‍यापैकी अस्तं, पण मटणाचे पिस तर शोधून काढावे लागतात..."

"...मग काय करायचं तुम्हीच सांगा आता."

"काय करणार सूनबाई, माझी म्हातारीची आता स्वैपाक बनवायची ताकद पण नाही. एके काळी पन्‍नास-पन्‍नास माणसांचा स्वैपाक घरातल्या घरात बनवायचे मी. आणि मटण तर असं बनवायचे की लोक..."

"..माहित्येय मला आई ते सगळं... पण आपण आज काय करू शकतो यावर बोललो तर जास्त चांगलं, नाही का?"

"हं... राहू देत मग. असंच खावंसं वाटलं म्हणून म्हटलं तुला. नसेल जमत तर काय... आलीया भोगासी, असावे सादर..."

"असं नका म्हणू आई, मी बघते काहीतरी संध्याकाळपर्यंत. निघते आता, उशीर होतोय."

----------------------

"काय गं, काय शोधतीयेस 'गूगल'वर?"

"अगं काही नाही, 'चांगलं' मटण बनवून देणारं कुणी मिळतंय का शोधत्येय..."

"काय म्हणतेस? तू आणि नॉन-व्हेज...?"

"माझ्यासाठी नाही गं... सासूबाईंसाठी. त्यांना आवडतं हे सगळं.. चिकन, मटण, फिश, आणि काय काय... मला तर वास सुद्धा सहन नाही होत त्याचा, मग घरात बनवणं तर लांबच!"

"अच्छा, मग हॉटेलमधून पार्सल घेऊन जायचं ना त्यांच्यापुरतं..."

"मी ही तेच म्हणाले, पण त्यांना तसं मसालेदार नाही आवडत. आता त्यांना हवं तसं, घरगुती पद्धतीचं, चविष्ट, आणि 'चांगलं' मटण बनवणारं शोधायचं तरी कुठं?"

"ए, तू 'खावाकी' ट्राय केलंयस का?"

"काय?"

"अगं 'खावाकी फूड प्रॉडक्ट्स'... मागे मी होळीच्या दिवशी पुरणपोळ्या नव्हत्या का आणल्या डब्यातून."

"हो हो हो, आठवलं. पण त्यांच्याकडं नॉन-व्हेजसुद्धा मिळतं?"

"अर्थातच! अगं आमच्याकडं तर सारखं चिकन बिर्याणी, मटण करी, प्रॉन्ज मसाला, कोंबडी वडे, आणि काय काय सारखं मागवत असतात."

"मागवत असतात म्हणजे?"

"अगं, म्हणजे फोनवरून ऑर्डर देऊन ठेवायची. आपल्याला पाहिजे असलेल्या वेळी होम डिलीव्हरी मिळते..."

"काय सांगत्येस काय? म्हणजे आपल्याला आणायला नाही जावं लागत?"

"अंहं, अगदी घरपोच मिळतं सगळं. छान घरगुती पद्धतीचं, कमी मसालेदार, चविष्ट, आणि गरम-गरम..."

"व्वा! तू सांगतियेस त्यावरून तरी सासूबाईंना आवडेल असंच वाटतंय. प्लीज मला नंबर देत्येस त्यांचा?"

"अगं माझ्याकडं आत्ता नंबर नाहीये. घरी ब्रोशर आहे त्यांचं, त्यावर आहे. आणि माझ्या सासूबाईच ऑर्डर करतात त्यामुळं माझ्याकडं सेव्ह नाही केलेला..."

"अरेरे, आता?"

"अगं डोन्ट वरी, त्यांची वेबसाईट आहे ना www.khawakee.com. त्यावर तर तुला सगळ्या पदार्थांचे रेट पण मिळतील. आणि फोटोसुद्धा बघायला मिळतील. आणि हो, ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतात बरं ते."

"मस्तच! काय म्हणालीस वेबसाईट - डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू खा-वा-की डॉट कॉम! येस्स... काय मस्त साईट आहे गं. आणि केवढे पदार्थ आहेत त्यांच्याकडं..."

"हं... आता निवांत बघून घे सगळं आणि तुझी ऑर्डर प्लेस करून झाली की मला सांग..."

"थॅक्यू व्हेरी मच! खूप मोठ्ठं काम केलंस तू माझं. आत्ताच सासूबाईंसाठी मटण करीची ऑर्डर देऊन टाकते..."

"ऑल द बेस्ट!"



Share/Bookmark