दुकानात एक वयस्कर बाई आल्या. आमचं हिंदुराष्ट्राला वाहिलेलं एक पाक्षिक की साप्ताहिक काहीतरी आहे म्हणाल्या. तुमच्या दुकानाची त्यात जाहिरात द्या म्हणाल्या. मी विचारलं, तुम्ही काय छापता त्यात? त्या म्हणाल्या, हिंदु संस्कृतीचं रक्षण, हिंदु बांधवांची जागृती, आपल्या धर्माच्या ख-या परंपरांचा प्रसार, इतर धर्मियांची कारस्थानं, वगैरे वगैरे. मी नम्रपणे म्हणालो, सॉरी! मी तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही. यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे. मग देणगी द्या. समर्थ हिंदुराष्ट्रासाठी हे सत्पात्री दान करा. तुम्हाला हजार पटीत फायदा होईल. एक रुपया दिलात तर तुम्हाला हजार मिळतील. मी पुन्हा म्हटलं, सॉरी! ही आमची व्यवसायाची जागा आहे. इथं आम्ही कसलंही दान, देणगी, वर्गणी देत नाही. बाई ऐकेचनात. म्हणाल्या, ठीक आहे. पैसे नका देऊ. आमच्या पन्नास-शंभर लोकांना चहा-नाष्टा स्वरुपात तरी सत्पात्री दान द्या. मी म्हटलं, हे चालेल. पण आम्ही चहा-नाष्टा नाही बनवत. चिकन-मटण बिर्याणी, पापलेट, सुरमई... माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाई अशक्य वेगानं पाय-या उतरून चक्क पळून गेल्या!

No comments:
Post a Comment