ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, May 18, 2017

लावणी अखेरच्या विनवणीची

लावणी अखेरच्या विनवणीची

मैतर हो! खातरजमा करु मी कशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी

काय तरुणपणाची एकेक येडी घडी
काय धुंदफुंद रंगात रंगला गडी
काय खट्याळ खोड्या येक येकावर कडी
मस्तीत मिजाशित रमलो रातंदिशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी
आम्ही छंदीफंदी नादी नाना गुणी
इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी
केली फसवाफसवी अन्‌ कितिदा पडलो फशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

किणकिणता कंकण कणकण नाचायचा
रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा
कधी मैनेसंगे वनभर उधळायचा
दो हाती लुटली आणि लुटवली खुशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

तुम्ही जीव लावला, मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल तुमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी

- वसंत बापट


Share/Bookmark

No comments:

Post a Comment