ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 17, 2017

युनिफॉर्म कम्पल्सरी...

शाळेला युनिफॉर्म असण्याची सुरुवात का आणि कधीपासून झाली याबद्दल कुणाला माहिती आहे का? माझ्या माहितीनुसार, शाळेत येणार्‍या मुलांनी चित्रविचित्र कपडे घालून इतर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करु नये म्हणून, किंवा अंगावरच्या कपड्यांवरुन मुलांची आर्थिक पातळी कळून भेदभावाला वाव मिळेल म्हणून, सरसकट एकाच रंगाचे / पॅटर्नचे गणवेश घालायची पद्धत सुरु झाली असावी.

शाळेत दिवसभर बसण्यासाठी, खेळण्यासाठी सुटसुटीत कपडे घालावेत, हे पटण्यासारखं आहे. पण मग विशिष्ट रंग / पॅटर्नची गरज काय? काहीजणांच्या मते शाळेतल्या मुलांना गणवेशसक्ती करणं म्हणजे मुलांचं सैनिकीकरण करणं आहे. मुलांना सैन्यासारखी शिस्त, आदेशपालन शिकवण्यासाठी युनिफॉर्मची सक्ती केली जाते म्हणे. असेलही कदाचित...

मुद्दा असा आहे की, युनिफॉर्म घातल्या - न घातल्यानं मुलांच्या शिकण्यात काय फरक पडतो? म्हणजे विशिष्ट प्रकारचे/रंगांचे कपडे घातल्यानं मुलांना शिकवलेलं लवकर कळतं किंवा कळत नाही, असा काही प्रकार आहे का? मुलांच्या कपड्यांवर शाळेचा लोगो छापणं हा शाळेच्या मार्केटींगचा भाग झाला, पण त्यामुळं मुलांना काय फायदा होतो? (मी अमूक एका प्रतिष्ठीत शाळेचा विद्यार्थी आहे, हे दाखवण्यासाठी होतही असेल कदाचित...)

सरकारी शाळांमधून दिले जाणारे युनिफॉर्म, बूट यांवर खूप चर्चा चालते. गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाला, बूट कमी दर्जाचे आणले, मुलांना गणवेश उशिरा मिळाले, वगैरे गोष्टी सतत चर्चेत असतात. मग युनिफॉर्मची, बुटांची खरेदी कुणी करायची, शासनानं खरेदी करुन शाळेत वाटप करायचं की खरेदीसाठी थेट पालकांनाच अनुदान द्यायचं, असे अनेक प्रश्न दरवर्षी समोर येतात. आधीच शिक्षकांना शिक्षणेतर कामं जास्त, त्यातून गावाकडच्या शाळा तर एकशिक्षकी, दोनशिक्षकी. मग गणवेशसक्ती राबवण्यासाठी शिक्षकांचा अजून वेळ आणि कष्ट खर्ची पाडून नक्की काय साध्य केलं जातं, हाही प्रश्न आहेच.

शाळा खाजगी असोत की सरकारी, एक गोष्ट दोन्हीकडं कॉमन आहे. ती म्हणजे, युनिफॉर्म आणि शूज वगैरे गोष्टींची सक्ती! जर विशिष्ट प्रकारचे बूट, कपडे शाळेला अपेक्षित असतील तर ते त्यांनीच पुरवावेत ना? नाहीतर मूल कसलेही कपडे, चपला घालून आलं तरी त्याला शिकवण्यावर जास्त लक्ष द्यावं. नाहीतरी दहावीच्या निकालानंतर मुलं आणि पालक जास्त श्रेय ज्या खाजगी क्लासेसना देतात, त्यांच्याकडं कुठं गणवेश सक्ती असते? स्व-प्रेरणेनं स्वयंसेवी संस्था वर्षानुवर्षं प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना शिकवून पुढं आणायचं काम करतात, त्यांना कधी मुलांनी विशिष्ट प्रकारचे / रंगाचे कपडे, बूट घालावेत असं वाटतं का? मग औपचारिक शाळांमधेच हा हट्ट इतका मोठ्या प्रमाणावर का? कुणी काय कपडे घालावेत ह्यामधे आपल्याला एकंदरीतच खूप इंटरेस्ट असतो, त्याचं कारण काय?

शाळा सुरु झाल्या, चित्रविचित्र कॉम्बिनेशनचे युनिफॉर्म घालून, गळ्यात टाय बांधून, छोटी-छोटी मुलं स्कूल व्हॅनमधून दाटीवाटीनं शाळेला निघालेली बघितली आणि दरवर्षीप्रमाणं हे सगळे प्रश्न पुन्हा डोक्यात आले. तुम्हालाही पडतात का हे प्रश्न? कुणाला त्यांची उत्तरं सापडली असतील तर जरुर कळवा.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

No comments:

Post a Comment