ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, August 4, 2017

भाषा आणि उच्चारांची गंमत

मराठीत 'श' आणि 'ष' या दोन अक्षरांच्या उच्चारामधे नक्की काय फरक आहे हे ब-याच जणांच्या लक्षात येत नाही. 'न' आणि 'ण' यांच्या उच्चारामधे फरक आहे तसा 'श' आणि 'ष' यांच्या उच्चारामधेही फरक आहे. अर्थात्, असा फरक सांगता येणं किंवा असाच उच्चार करणं म्हणजे 'शुद्ध' बोलणं, वगैरे मी मानत नाही. संवादासाठी भाषा वापरली जाते, त्यामुळं समोरच्या व्यक्तीपर्यंत आपले विचार पोचवू शकण्याइतकी कुठलीही भाषा शिकणं पुरेसं असतं. तरीपण...

प्रत्येक भाषेची / बोलीभाषेची / लिपीची आपली स्वतःची एक खासियत असते, स्टाईल असते. संवाद साधण्यासाठी भाषा शिकणं आणि खास भाषेचा अभ्यास करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठल्याही भाषेतली मुळाक्षरं आणि त्यांचे उच्चार, शब्द आणि त्यांचे अर्थ, अक्षरचिन्हं आणि त्यांची मांडणी, या सगळ्याकडं बारकाईनं बघितलं तरच त्या भाषेची गंमत कळायला लागते.

अशीच गंमत आहे 'श' आणि 'ष' यांच्या उच्चाराची. लिहिताना ब-याचदा आपण सवयीनं ही दोन्ही अक्षरं वापरतो, पण उच्चार मात्र एकसारखाच करतो. या दोन अक्षरांचा उच्चार नेमका कसा करायचा ते इथं दाखवायचा प्रयत्न केला आहे.

जीभ सरळ ठेऊन तोंडातून हवा बाहेर जाऊ दिली की 'श'चा उच्चार होतो. करून बघा - शाळा, शून्य, शुकशुक, शाब्बास, वगैरे वगैरे.

आता जिभेचा शेंडा वरच्या दिशेनं वळवून, 'श' म्हणताना बाहेर जाणारी हवा जिभेनं अडवायचा प्रयत्न करा. षाब्बास!! साॅरी साॅरी, षब्द चुकला. मला खरं तर हे शब्द सांगायचे होते - षटकोन, भाषा, मनीषा, विषय, निष्पाप, वगैरे वगैरे.

जमतंय ना? आता अजून एक गंमत, मला सापडलेली... 'श' अक्षराला 'र' जोडला की 'श्र' होतो. म्हणजे, श्री, श्रद्धा, श्रमदान, वगैरे. पण तुम्ही 'ष'ला 'र' जोडून 'ष्र' बनवलाय का कधी? मराठीच्या नियमांमधे हे बसत नसलं तरी अशा उच्चाराचे शब्द आहेतच की. उदाहरणार्थ? 'जॅकी श्राॅफ' हे नाव वर उच्चार सांगितलाय तसं म्हणून बघा - जॅकी ष्राॅफ. आहे की नाही दम? आता अश्रूचा उच्चार अष्रू केला तर? चुकीचं नाही पण वेगळंच वाटतंय ना? हीच तर गंमत आहे.

'ष'चा नकळत खरा उच्चार आपण करतो 'क्ष' या जोडाक्षरात. 'क' अक्षराला 'ष' जोडूनच 'क्ष' तयार होतो. त्यामुळं, अक्शर आणि अक्षर यांचे उच्चार वेगळे होतात. क्षणभर, क्षत्रिय, अक्षम्य, साक्ष, हे शब्द त्यामुळंच भारदस्त झालेत. ती मजा 'रिक्शा'मधे नाही. इंग्रजीतला 'सेक्शन' शब्द 'सेक्षन' असा लिहून चालणार नाही. रक्षण, भक्षण, शिक्षण, अशा 'दादा' शब्दांच्या शेजारी बिचारा सेक्षन अवघडून जाईल. त्याला फ्रॅक्शन, फिक्शन, सक्शन, यांच्याबरोबरच राहू दे...

आता 'श' आणि 'ष' या दोन अक्षरांच्या उच्चारात फरक करून रोजच्या बोलण्यात केवढी गंमत आणता येईल बघा...

"रिष्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है षेहेनषा!" असा अमिताभ बच्चन ष्टाईलमधे डायलाॅग हाणता येईल. किंवा आपल्या अशोक सराफचा फेमस "षाॅल्लेट"पण म्हणता येईल. खुस'खुशीत' शंकरपाळी खाऊन 'खुषीत' गाता येईल. आणि 'मिशां'वर ताव मारत 'विषा'ची परीक्षा घेता येईल. मराठी हा 'विषय' तर 'अतिशय' सोपा होऊन जाईल. 'अश्म'युगीन माणसालाही 'भीष्म' समजून जाईल.

षुद्ध-अषुद्ध, चूक-बरोबर असे षिक्के न मारता भाशेची मजा लुटणं षक्य आहे. पण त्यासाठी इच्छा असली पाहिजे, थोडाफार अभ्यास केला पाहिजे, आणि पुश्कळ प्रयोग करत रहायची तयारी पाहिजे. हे 'ष' पुराण वाचून असे प्रयोग करायची तुम्हालाही इच्छा होईल, अषी आषा करतो. जय हिंद, जय महाराश्ट्र!

- मंदार शिंदे
9822401246
(04/08/2017)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment