‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण
गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन, तसेच तबला, पखवाज, हार्मोनियम, गिटार, इत्यादी वाद्यांचे प्रशिक्षण देणा-या ‘सप्तसुर संगीत अकादमी’चे भव्य वार्षिक सादरीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे गुरुवारी पार पडले. सुमारे १०० विद्यार्थी कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली. शास्त्रीय रागावर आधारित गीतांपासून ते भक्तीगीते, भावगीते, गझल, लावणी, आणि कव्वालीपर्यंत विविध गीतप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गायलेल्या सर्व गीतांना विद्यार्थ्यांनीच वाद्यांची साथ दिली. तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांच्या जुगलबंदीतून आपले विशेष कौशल्य दाखवण्याची संधीदेखील ‘सप्तसुर’च्या विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी व्यासपीठावर एकत्र येऊन ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे गीत निरनिराळ्या भाषांमधे सादर केले. संगीत प्रशिक्षक योगेश कुनगल, उत्तरा जावडेकर-पेंडसे, महेश बधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण करण्यात आले. मंदार शिंदे व निकीता कुनगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रसिद्ध व्याख्याते व योगगुरु डॉ. दत्ता कोहिनकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सुरेश विश्वकर्मा, अन्वय बेंद्रे, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, योगिनी पोफळे, राहुल वेलापूरकर, इत्यादी ता-यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व कलाकारांचे कौतुक केले. ‘सप्तसुर संगीत अकादमी’त प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थी कलाकारांचे पालक, मित्रपरिवार, तसेच अनेक संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
No comments:
Post a Comment