गद्य आणि पद्याचा विचार करताना मला पडलेले काही प्रश्नः
प्रिंटींगची सोय निर्माण होण्यापूर्वीचं सर्व साहित्य पद्य स्वरुपातच का आहे? त्यावेळी लोकांनी गद्य साहित्यनिर्मिती केलीच नसेल का?
शेकडो अभंग रचणार्या तुकोबांनी आयुष्यात एकही लघुनिबंध किंवा कथा रचली नसेल का?
हजारो ओव्या रचणार्या माऊलींना एखादा ललित लेख लिहावासा नसेल का वाटला?
हजारो श्लोक रचणार्या समर्थांनी एखादं गद्य 'मॅनेजमेंट मॅन्युअल'/मार्गदर्शक पुस्तिका का नसेल लिहिली?
शेकडो दोहे रचणार्या कबीराला एखादं 'सेल्फ-हेल्प बुक' लिहावंसं का नसेल वाटलं?
रामायण, महाभारत, भगवद्गीता ही महाकाव्यं का आहेत, महाकादंबर्या का नाहीत?
पारंपारिक भजन, कीर्तन, आरत्या, भारुड, ओव्या, हे सगळं पद्य स्वरुपातच का आहे? पारंपारिक गद्याची उदाहरणं कोणती?
मला असं वाटतं की, प्रिंटींगची सोय नसताना मौखिक स्वरुपातच साहित्य साठवणं व हस्तांतरित करणं भाग होतं. लयबद्धता, यमकं, वृत्तबद्धता, गेयता, मोजक्या नि नेमक्या शब्दांचा वापर या गुणधर्मांमुळंच पद्य साहित्य मुखोद्गत होऊन टिकून राहिलं असावं. याउलट, गद्य साहित्य मात्र काळाच्या ओघात नाहीसं झालं असावं.
प्रिंटींगची सोय झाल्यानंतर गद्य साहित्य वरचेवर संदर्भासाठी किंवा पुनर्वाचनासाठी उपलब्ध होऊ लागलं, त्यामुळं तिथून पुढं ते टिकून राहिलं असावं.
पण आजही लहान मुलांचं शिक्षण बडबडगीतं, गाणी किंवा पद्यरुप गोष्टींपासून सुरु होतं. मूल स्वतः वाचू व समजू लागलं की गद्य धडे सुरु होतात. यामागंही वरील कारणंच असावीत असं वाटतं.
कथा, कादंबरी, कविता अशा साहित्यप्रकारांची सरसकट तुलना करता येणार नाही, हे मान्यच. तरीही, आकलन, स्मरण, पुनर्निर्माण या मुद्यांवर पद्य नक्कीच गद्यापेक्षा जास्त सोयीस्कर आणि परिणामकारक ठरतं, हे नक्की!
तुम्हाला काय वाटतं?
- मंदार शिंदे 9822401246

No comments:
Post a Comment