ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, September 22, 2018

अमर आणि समर

चला गोष्ट सांगूया...
🙂😌☺😊😀😃😄😁

अमर आणि समर
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एका देशामध्ये दोन राज्यं होती, गुहागर आणि मीठागर त्यांची नावं होती. गुहागरात होत्या मोठ्या-मोठ्या गुहा. आणि मीठागरात होत्या बरण्याच बरण्या. गुहागरचा राजा होता अमर. मीठागरचा राजा होता समर.
एकदा काय झालं...
दुसर्‍या देशातून आले दोन चोर, एकाचं नाव चंगोर, दुसरा होता मंगोर. चंगोर आणि मंगोर रात्रीच्या वेळी, खात-खात आले डझनभर केळी. केळी खाऊन सालं रस्त्यावर फेकली, रिकामी पिशवी खांद्याला लावली.
इकडं मीठागर, तिकडं गुहागर, दोन्हीकडं लोक होते घोरत घर्र घर्र. चोर शिरले एका झोपडीत, तिथं मिळाली एक बरणी, हात घालून बघितलं तर, बरणी होती मिठानं भरली. मिठाच्या बरणीचा उपयोग काय, चोरांनी काढता घेतला पाय.
मग एका वाड्यात घुसले, दगडी भिंतीवरुन आत उतरले. भिंतीत ठोकली होती खुंटी, खुंटीवर टांगलेली एक घंटी. खुंटीखाली एकावर एक, रचल्या होत्या बरण्या अनेक. चोरानं उघडली एक बरणी, तीपण होती मिठानं भरली. चिडून त्यानं झटकला हात, मीठ उडालं दुसर्‍याच्या डोळ्यात. डोळे चोळत उठला गडी, धडकलं डोकं नि वाजली घंटी. बरणी, घंटी, मीठ-बीठ, सगळं टाकून पळाले धीट. रस्त्यावर केळीची सालं पडली, घसरुन पडले, हाडंच मोडली.
अशीच गेली सतरा घरं, चोरांचं आज काही नव्हतं खरं. वैतागले दोघं बरण्या बघून, राजवाड्यात शिरले डेरींग करून. पेंगणारे सैनिक पहार्‍यावर, घोरत होता राजा समर. राजवाड्यात होती सोन्याची बरणी, तीपण मिठानं खच्चून भरली. चोरांनी दिलं मीठ ओतून, बरणी पळवली पिशवीत भरुन. मीठागरातून सुटले पळत, गुहागरात जाऊन पोचले तडक.
सकाळी उठला राजा समर, सैनिकांनी दिली चोरीची खबर. सोन्याची बरणी गायब होती, मिठानं खोली भरली होती. राजा समर भडकला खूप, चहात ओतून प्यायला तूप. सैनिकांना त्यानं ऑर्डरच दिली, बरणीचा शोध घ्या गल्लोगल्ली.
सोन्याची बरणी शोधण्यासाठी, सगळ्यांची उडाली गडबड मोठ्ठी. झोपडीत, वाड्यात, घराघरात... शोधली बरणी मीठागरात.
शोधता-शोधता संध्याकाळ झाली, राजाला आता शंकाच आली. गुहागरचा राजा मिस्टर अमर, त्यानंच नसेल ना केला कहर? जेवायला एकदा आला होता, 'बरणी मस्तंय' म्हणाला होता.
राजा समरनं सोडला हुकूम, 'अमरचा खजिना आणा रे लुटून!' समरचं सैन्य धावत सुटलं, मीठागर-गुहागर युद्धच जुंपलं.
गुहागरचा राजा मिस्टर अमर, घाबरला ऐकून युद्धाची खबर. राजवाड्यातून लगेच गेला पळून, मोठ्ठ्या गुहेत बसला लपून.
पण गंमत काय झाली माहितीय का?
चंगोर नि मंगोर बरणी चोरुन, लपले होते मोठ्ठी गुहा शोधून. त्याच गुहेत शिरला अमर, राजाचा युनिफॉर्म त्याच्या अंगावर. राजाला गुहेत शिरताना बघून, चोरांचं पडलं अवसान गळून. बरणी घेऊन समोर आले, राजाच्या पायावर आडवेच झाले.
'माफ करा महाराज, चूक झाली.. समरची बरणी आम्हीच चोरली. पुन्हा नाही होणार चूक, जाऊ द्या आम्हाला,' रडले खूप!
गुहागरचा राजा मिस्टर अमर, म्हणाला 'अश्शी भानगड आहे तर!' सोन्याची बरणी उचलून घेतली, दोन्ही चोरांची कॉलर धरली. चोरांना दिला चांगलाच चोप, समरलासुद्धा धाडला निरोप.
चोरांसकट सापडली बरणी, राजा समरला समजली बातमी. मीठागरचा राजा समर हसला, विमान घेऊन गुहेबाहेर पोचला. चोर आणि बरणी ताब्यात घेतली, चोरांच्या गालावर मेंदीच काढली.
राजा अमरला म्हणाला 'थँक्यू, तुझे उपकार मी कसे बरे फेडू?'
गुहागरचा राजा मिस्टर अमर, नुस्ताच हसला चुकवून नजर.
समरला कळाली इच्छा त्याची खरी, विनाकारण युद्धाबद्दल म्हणाला 'सॉरी!' मीठागरचा राजा समर दी ग्रेट, सोन्याची बरणी दिली अमरला भेट.
अमर नि समर झाले दोस्त, गोष्ट कशी वाटली - भारी की मस्त?
✒✒✒🙏🙏🙏


Share/Bookmark

No comments:

Post a Comment