ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label बालसाहित्य. Show all posts
Showing posts with label बालसाहित्य. Show all posts

Tuesday, March 31, 2020

Ghost Story for Children

स्मशानातला चाकू
(लेखकः मंदार शिंदे  9822401246)

टिपू, दिपू, आणि गोपू तिघं मित्र होते. दिवसभर काम करुन संध्याकाळी एकत्र भेटत होते. रोज भेटण्यासाठी त्यांचा अड्डा ठरला होता. बस स्टँडच्या जवळ एक फेव्हरिट वडापावचा गाडा होता. गरम-गरम वडापाव खायला तिघांनाही आवडायचं. तोंडी लावायला मिरचीसारखं गप्पांचं पुराण चालायचं. कुठल्याही गोष्टीला तिखट-मीठ लावायची तिघांनाही सवय होती. चविष्ट गप्पा मारण्यात रोजची संध्याकाळ सरत होती.

एकदा टिपूनं बोलता-बोलता वेगळाच विषय काढला. म्हणाला, “माझ्या काकांनी सांगितलेली एक गोष्ट सांगू का तुम्हाला?”

 “सांग की, काकांची सांग, मामांची सांग, मग बाबांची सांग, दादांची सुद्धा सांग…” दिपू त्याला चिडवत म्हणाला.

“ऑणि हो, नॉनाँची ऑणि टॉटाँची रॉहिलीच की… त्योंची पॉण साँगून टॉक,” तोंडात गरम-गरम वडापाव कोंबत गोपू म्हणाला.

“राहू दे, तुम्हाला माझी चेष्टा केल्याशिवाय करमतच नाही ना?” टिपू रागानं बोलला.

“अरे नाही… तसं नाही… तू चिडू नकोस. गोष्ट सांग. आम्ही नाही चेष्टा करणार. काय रे गोप्या?” दिपूनं गोपूकडं बघत डोळे मोठ्ठे केले.

“हॉ हॉ, साँग साँग… गॉष्ट साँग…” गोपूचा तोबरा भरलेलाच होता.

“अरे, माझे काका सांगत होते…” टिपूनं गोष्ट सांगायला सुरुवात केली, “त्यांचा एक मित्र अचानक वारला. कशामुळं सांग?”

“चार्जिंग संपलं असेल त्याचं,” तोंडातला वडापावचा घास संपवून गोपू बोलला. दिपूच्या तोंडातला वडापाव मात्र फुर्रकन्‌ बाहेर उडाला.

“दिप्या, ह्या गोप्याला सांगून ठेव. आपण असली चेष्टा खपवून घेणार नाय,” टिपूचा पारा पुन्हा चढला.

“ए गोप्या, गप बस की रे. ओ दादा, अजून एक वडापाव कोंबा ह्याच्या तोंडात, म्हणजे थोडा वेळ शांत बसेल. तू सांग रे गोष्ट, टिपू…” दिपूनं सगळी व्यवस्था लावली आणि हातातल्या वडापावचा लचका तोडला.

“तर काका सांगत होते की, त्यांचा एक मित्र अचानक वारला. बरोब्बर एक महिन्यापूर्वी. आणि वारल्यावर त्याला स्मशानातसुद्धा न्यायची गरज नाही पडली. का बरं, सांग बघू?”

“का रे, तूच सांग,” गोपू काहीतरी बोलायाच्या आत दिपू पटकन बोलला. गोपूला तसाही नवीन वडापाव मिळाला होता, त्यामुळं त्याचा टिपूच्या गोष्टीतला इंटरेस्ट आपोआप कमी झाला होता.

“अरे, माणूस कुठं मरतो? घरी किंवा हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याला घेऊन जातात स्मशानामध्ये. पण काकांचा मित्र मेला चक्क स्मशानामध्ये!! मग त्याला स्मशानात कसं घेऊन जाणार?” टिपू उत्साहानं सांगू लागला.

“पण काय रे…” गोपूनं वडापाव खाण्याच्या मधल्या वेळेत प्रश्न विचारला, “तुझ्या काकांचा हा मित्र स्मशानात गेला होता कशाला?”

“मरायला!! तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा? तू वडापाव खा गपचूप!” दिपू त्याच्यावर खेकसला आणि टिपूकडं वळत म्हणाला, “तू मर… सॉरी, सॉरी… तू गोष्ट सांग.”

“हां, तर मागच्या महिन्यात काकांचा मित्र काहीतरी कामासाठी गावाला गेला होता. रात्री तिकडून निघायला झाला उशीर. बिचारा एकटाच त्याच्या गाडीवरुन येत होता. तरी बरं, पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या उजेडात रस्ता स्पष्ट दिसत होता.”

“चंद्राच्या उजेडात का बरं? गाडीचे लाईट बंद होते काय?” गोपूचा वडापाव संपला होता बहुतेक. टिपू आणि दिपूनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.

“तर चंद्रप्रकाशात गाडी चालवत तो येत होता. मध्यरात्रीची वेळ होती. नदीवरचा पूल ओलांडून स्मशानाजवळ आला, तसा त्याच्या कानांवर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. ‘वाचवा, वाचवा’ असा…”

“मग?” दिपू आता टिपूच्या गोष्टीत पुरता घुसला होता. गोपूनं दोघांकडं एक तुच्छ कटाक्ष टाकत तिसरा वडापाव खायला घेतला.

“मग काय, गाडी तशीच वळवून तो निघाला आवाजाच्या दिशेनं. आवाज कुठून येतोय, ते शोधण्याच्या नादात लक्षातच नाही आलं की आपण स्मशानात येऊन पोहोचलोय!”

“बापरे! मग?” दिपूनं आवंढा गिळत विचारलं.

“आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चिता आणि राख बघून तो घाबरला. परत जाण्यासाठी गाडी वळवायचा त्यानं प्रयत्न केला, पण गाडीचं हॅन्डलच वळेना. गाडी सरळ-सरळ पुढंच जात राहिली. विशेष म्हणजे, त्यानं किल्ली फिरवून गाडी बंद केली. तरीपण गाडी पुढं जातच राहिली, जातच राहिली…”

“उतारावर असेल गाडी, त्यात काय एवढं?” गोपूनं खांदे उडवले. त्याच्याकडं लक्ष न देता टिपू पुढं सांगू लागला.

“गाडी वळेना, बंद होईना, ब्रेकसुद्धा लागेना. घाबरुन तो जोरजोरात ओरडू लागला. पण एवढ्या मध्यरात्री त्याचा आरडा-ओरडा ऐकायला तिथं कोण असणार?”

“म… म… मग काय झालं?” घाबरत-घाबरत दिपूनं विचारलं.

“मग काय? त्याची गाडी जोरात जाऊन धडकली एका मोठ्ठ्या झाडावर. आणि जागच्या जागीच मेला बिचारा. आता कुणी म्हणतं धडकल्यामुळं मेला, कुणी म्हणतं घाबरल्यामुळं मेला. पण स्मशानातच मेला एवढं खरं!” टिपूनं आपली गोष्ट संपवली आणि गार झालेल्या वडापावचा एक घास घेतला.

“बाप रे! कसलं भयानक आणि विचित्र मरण आलं बिचाऱ्याला…” कपाळावर जमा झालेला घाम पुसत दिपू म्हणाला.

“काही नाही रे, दारु पिऊन गाडी चालवत असणार नक्कीच. मी सांगतो. हॅन्डल वळलंच नाही, ब्रेक लागलाच नाही, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंदच झाली नाही. ऐकून घेतोय म्हणून काहीपण सांगायचं का?” गोपू वैतागून म्हणाला.

“हे बघ, माझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट आहे. मी जशीच्या तशी तुम्हाला सांगितली, अज्जिबात तिखट-मीठ न लावता…” वडापाव खाता-खाता टिपू बोलला.

“हो का? तिखट-मीठ न लावता?” टिपूच्या हातातल्या वडापावकडं बघत गोपू म्हणाला, “मग मला एक सांग, तुझ्या काकांचा हा मित्र रात्री मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच लोकांना सापडला असेल ना?”

“हो, बरोबर आहे,” टिपू पटकन म्हणाला.

“बरोबर आहे ना? मग त्याला स्मशानातून आवाज ऐकू आला, त्याच्या गाडीचं हॅन्डल वळत नव्हतं, ब्रेक लागत नव्हता, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंद झालीच नाही… हे सगळं त्यानं तुझ्या काकांना कधी सांगितलं? रात्री स्वप्नात येऊन का स्वर्गात पोहोचल्यावर पत्र पाठवून? काहीतरी थापा मारायच्या उगाच…”

“तुला अजिबात नाही ना पटत?” टिपूनं विचारलं.

“अज्जिबात नाही,” गोपू ठामपणे म्हणाला.

“भूत-बित काहीच नसतं असं तुला वाटतं ना? स्मशानात घाबरायचं काहीच कारण नसतं असं तुला वाटतं ना?” दिपूनं विचारलं.

“होय, असंच वाटतं. मी नाही घाबरत स्मशानात जायला.” गोपू म्हणाला.

“ठीकाय तर मग,” दिपू आणि गोपूकडं आळीपाळीनं बघत टिपू म्हणाला, “आज पौर्णिमा आहे. आज रात्री तू स्मशानात जाऊन दाखवायचं… एकट्यानं!!”

“चालेल. त्यात काय एवढं?” गोपू खांदे उडवत बोलला. “पण तुम्हाला पण यावं लागेल ना माझ्याबरोबर… मी खरंच गेलो की नाही ते बघायला? नाही तर, उद्या म्हणाल की मी खोटं-खोटं सांगतोय, स्मशानात जाऊन आल्याचं…”

“म… म… मी नाही येणार स्मशानात. त… त… तू जा रे टिपू ह्याच्याबरोबर. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे,” दिपू बोलला.

“आपण जायची काहीच गरज नाही,” इकडं-तिकडं बघत टिपू काहीतरी विचार करु लागला. मग अचानक उठून तरातरा वडापावच्या गाडीकडं चालत गेला.

“बोलून-बोलून भूक लागली असेल बहुतेक,” त्याच्याकडं बघत गोपू बोलला. तेवढ्यात टिपू त्यांच्याकडं परत आला. येताना त्याच्या हातात कांदा कापायची सुरी होती.

“हे काय रे? ही सुरी कशाला आणली?” दिपूनं विचारलं.

“आता नीट ऐक, गोप्या. आज रात्री तू एकट्यानंच स्मशानात जायचं. सगळ्यात शेवटी नदीच्या काठावर जे मोठ्ठं झाड असेल त्याच्यावर ही सुरी खुपसून परत यायचं. उद्या सकाळी आम्ही दोघं जाऊन खात्री करुन येऊ की तू खरंच स्मशानात गेला होतास की नाही.”

“वा वा, क्या बात है! काय आयडीया काढलीस, टिपू. शाब्बास!!” दिपू आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाला. त्याला आता गोपूबरोबर रात्री स्मशानात जायला लागणार नव्हतं ना.

“ठीक आहे. ठरलं!” असं म्हणत गोपूनं हात पुढं केला. टीपूनं एखादी तलवार द्यावी तशी दोन्ही हातांनी ती सुरी त्याला बहाल केली. आणखी एक-एक वडापाव खाऊन तिघं आपापल्या घराच्या दिशेनं निघून गेले.

ठरल्याप्रमाणं, मध्यरात्री गोपूनं गाडी काढली आणि निघाला स्मशानाच्या दिशेनं. थंडीचे दिवस होते. त्यानं अंगात घातलेल्या जॅकेटमधूनसुद्धा त्याला गार वारं लागत होतं. गाडी चालवताना त्यानं जॅकेटची चेन गळ्यापर्यंत ओढून घेतली.

पुलाच्या अलीकडंच त्यानं स्मशानाच्या कमानीतून गाडी आत घातली. संध्याकाळी मित्रांसमोर कितीही बढाया मारल्या तरी आत्ता मध्यरात्री स्मशानात गाडी चालवताना त्याला थोडी-थोडी भीती वाटू लागली. आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चितांमधून धूर येत होता. लाकडं आणि राख चुकवत-चुकवत तो नदीच्या दिशेनं चालला होता. काठावरच्या मोठ्या झाडापाशी येऊन त्यानं गाडी बंद केली.

गाडीचा आवाज बंद होताच त्याला आजूबाजूचे आवाज स्पष्ट ऐकायला येऊ लागले. नदीच्या पाण्याची खळखळ, रातकिड्यांची करकर आणि झाडांवरच्या पानांची सळसळ त्याला भीतीदायक वाटू लागली. काम झाल्यावर लगेच निघता यावं म्हणून त्यानं गाडी वळवून परत जायच्या दिशेला तोंड करुन लावली. आता हॅन्डल न वळता अडकून बसलं तरी चालेल, आपली गाडी स्मशानाच्या बाहेरच जाईल, याची खात्री करुन त्यानं जॅकेटची चेन उघडली. जॅकेटच्या आतल्या बाजूला टिपूनं दिलेली सुरी त्यानं खोचून ठेवली होती. थरथरत्या हातात सुरी पकडून तो झाडाजवळ गेला.

आजूबाजूला कुणी आहे का, याचा कानोसा घेत गोपूनं सुरी उगारली आणि झाडाकडं न बघताच खस्सकन्‌ सुरी बुंध्यात खुपसली. सुरीवरची मूठ सोडून तो एक-दोन क्षण तिथंच उभा राहिला. त्याला वेगळं काहीच जाणवलं नाही. पाण्याची खळखळ, किड्यांची करकर, आणि पानांची सळसळ तशीच सुरु होती.

आता त्याचा धीर वाढला. ठरल्याप्रमाणं काम फत्ते झालं होतं. आता सकाळी टिपू आणि दिपू सुरी बघायला येतील. आपण आपलं मस्तपैकी घरी जाऊन ताणून देऊ. असा विचार करत तो गाडीच्या दिशेनं निघाला, तेवढ्यात…

मागून त्याचं जॅकेट कुणीतरी ओढतंय असं त्याला वाटलं. गोपूचा श्वास मधेच अडकला. मागं वळून बघायचंसुद्धा त्याचं धाडस झालं नाही. तो जोर लावून पुढं सरकू लागला.

त्यानं पुढं जायला जोर लावला की मागून तेवढ्याच जोरात कुणीतरी त्याला खेचत होतं. त्याचे पाय जागेवरच घसरु लागले. त्याच्याच पायांचा फरफर… फरफर… असा भीतीदायक आवाज येऊ लागला. त्याच्या जॅकेटवरची पकड एवढी घट्ट होती की, त्याला एक पाऊलसुद्धा पुढं टाकणं शक्य होत नव्हतं.

गोपूला दरदरुन घाम फुटला. खळखळ… करकर… सळसळ… फरफर… असे सगळे आवाज त्याच्या कानांमध्ये घुमू लागले. अंगातला सगळा जोर एकवटून त्यानं एक जोरदार किंकाळी फोडली आणि जागेवरच बेशुद्ध झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोपूला जाग आली. टिपू आणि दिपू त्याच्या समोर उभे होते. नदीच्या पाण्याची खळखळ आणि झाडावरच्या पानांची सळसळ सुरुच होती. फक्त रातकिड्यांची करकर आणि त्याच्या पायांची फरफर थांबली होती.

“टिपू… दिपू… तुम्ही…. मी… मी… म्हणजे मी अजून जिवंत आहे? त्या… त्या… भुतानं मला मारलं नाही? मी… मी जिवंत आहे?” गोपू आनंदानं ओरडू लागला.

टिपू आणि दिपू पोट धरुन खो-खो हसत होते.

“भूत…? कसलं भूत…? कुठं आहे भूत…?” दोघांनी विचारलं.

“त्या… त्या झाडावर भ… भ… भूत आहे. त्यानं माझं जॅकेट धरुन ठेवलं रात्री…” गोपू अजून घाबरलेलाच दिसत होता.

“तुझं जॅकेट धरुन ठेवलं…? भुतानं…? हॅ हॅ हॅ” गोपूकडं आणि त्या झाडाकडं आळीपाळीनं बघत दोघं हसत होते.

ते का हसतायत हे गोपूला कळेना. त्यानं धीर करुन मान हळूहळू वळवली आणि आपलं जॅकेट धरुन ठेवणाऱ्या झाडाकडं बघितलं. पण तिथं त्याला भूत-बित काहीच दिसलं नाही. त्याला दिसला - झाडाला चिकटलेला त्याच्या जॅकेटचा कोपरा आणि… जॅकेटच्या कोपऱ्यात त्यानंच रात्री खस्सकन्‌ खुपसून ठेवलेली कांदा कापायची सुरी !!

=== 0 ===


Share/Bookmark

Monday, December 30, 2019

जेशूची गोष्ट

चला गोष्ट सांगूया…

👶🌉⛽🛣🔩🏭👶

"जेशूची गोष्ट"
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एकदा एका जेसीबीला आठवण आली आईची;
मान खाली घालून त्यानं मागणी केली सुट्टीची.
म्हणाला, “मालक, जाऊ द्या मला.. आठवण येते खूप.
आठवण काढण्यात विसरली बघा माझी तहान-भूक.”
पोट धरून मालक त्याचा खो-खो हसत सुटला,
“यंत्राला कुठं अस्त्या आई, खुळाच हैस की दोस्ता!
गप-गुमान कामावर चल, खड्डा खनायचा हाई.
काम करून पोट भरु, बोलायला येळ न्हाई…”

नाराज होऊन जेशूनं मग उलट प्रश्न केला,
“मालक, तुम्हाला नाही का आई? सांगा बघू मला.”
मालक म्हणाला, “जेशू बाळा, सगळ्यांना अस्त्या आई.”
जेशू म्हणाला, “मग का म्हणता, मलाच आई नाही?”

मालकानं मग विचाऽऽर केला, ढेरीवर फिरवत हात.
म्हणाला, “तुझा मुद्दा आत्ता आलाय माझ्या लक्षात.
आसंल बाबा तुझी बी आई, न्हाई कशाला म्हनू?
येवढा खड्डा खनल्यानंतर दोगं मिळून शोदू.”

जोरजोरात सोंड हलवत ‘नाही, नाही’ बोलला;
“खड्डा खणतो, मालक… पण मग सुट्टी द्या मला.
माझ्या आईला शोधण्यासाठी मीच एकटा जाईन;
काळजी नका करू मालक, लवकर परत येईन.”

मालकाचा पण जीव होता लाडक्या जेशू यंत्रावर;
सोंड त्याची थोपटत बोलला, “जा… मनासारखं कर!”

सुट्टी मिळणार म्हणून त्याचे हेडलाईट चमकू लागले;
दहा फुटांच्या खड्ड्याला आज दहाच मिनिट लागले.
काम संपवून जेशू निघाला आईचा घ्यायला शोध.
मालकानंपण केला नाही त्याला आता विरोध.
मोबाईलमधल्या गुगल बाईंशी केली त्यानं चर्चा,
आणि म्हणाला, “जेशू लेका, तू तर पुन्याकडचा!!
सांगलीपासून पुन्यापतुर अंतर लई न्हाई.
दोन-चार दिवसात पोचून जाशील, काळजी करायची न्हाई.”

जेशू म्हणाला, “काय मालक, चेष्टा माझी करता?
वाऱ्यासारखा जाईन मी, पोहोचेन बघता-बघता…”

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde

 https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9



👶🌉⛽🛣🔩🏭👶

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, November 30, 2019

पडक्या घरातलं भूत...

चला गोष्ट सांगूया...

👻🏚😱👻🏚😱

"पडक्या घरातलं भूत..."
'बालक-पालक संवाद' विशेषांक २०१९ मध्ये प्रकाशित

👻🏚😱👻🏚😱






Share/Bookmark

Wednesday, November 13, 2019

वारुची गोष्ट

चला गोष्ट सांगूया…

✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

वारुची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एक होतं विमान, नाव त्याचं वारु;
उडण्याचं काम अजून व्हायचं होतं सुरु.
चकचकीत पोलादाची होती त्याची बॉडी;
वयाच्या मानानं मात्र बरीच होती जाडी.
जाडजूड लांब-रुंद वारु सुखात होता;
उडण्याची वेळ येऊच नये, विचार करत होता.
बसवलेले होते त्याला जरी मोठ्ठे पंख;
हवेत उडायच्या विचारानं डोकंच व्हायचं बंद.
खरंच सांगतो वारुचं हे वागणं होतं विचित्र;
हवेत उडायला घाबरणारं हे विमान होतं भित्रं.

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde

 https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9


✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Friday, June 14, 2019

अमर, समर आणि किशोर

'किशोर' मासिकाच्या जून २०१९ अंकात 'अमर आणि समर'ची गोष्ट छापून आलीय... शाळेत असताना 'किशोर' आवडीनं वाचण्यापासून आता 'किशोर'साठी लिहिण्यापर्यंत एक चक्र पूर्ण !

मुलांना आवडेल असं नवनवीन ताजं-ताजं लेखन शोधून छापणार्‍या कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांचे, आणि अख्खी गोष्ट एका सुंदर चित्रातून मांडणाऱ्या जान्हवी जेधे यांचे खूप खूप आभार !

गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा.

(वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.)



Share/Bookmark

Thursday, October 11, 2018

चिंगूस मुंगूसची गोष्ट

चला गोष्ट सांगूया...
😀😀😀😀😀😀

चिंगूस मुंगूसची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

समुद्राच्या किनारी होतं एक गाव, गावामध्ये रहात होते एक तिकडमराव. तिकडमराव माणूस होता भलताच कंजूस, सगळे त्याला म्हणायचे ‘चिंगूस मुंगूस’. चिंगूस मुंगूसची बायको फारच बिचारी, कंजूषपणाला त्याच्या कंटाळली भारी. विकत आणलं नाही धान्य कणभर जरी, तिकडमराव म्हणायचे आज बनव श्रीखंड-पुरी. बायको म्हणायची, “ऑर्डर देत राहू नका उभे, किचनमध्ये येऊन बघा रिकामे सगळे डबे !” पैसे होतील खर्च जर गेलो दुकानात, तिकडमराव म्हणायचे मग “चालेल डाळभात !”

असे आपले चिंगूस मुंगूस लग्नात एकदा गेले, श्रीखंड-पुरी गुलाबजाम पोट भरून खाल्ले. पण लक्षात राहिली एकच गोष्ट पहिल्यांदाच खाल्ली, गोड-गोड मऊसूत खोबर्‍याची एक वडी. वडीची ती चव त्यांच्या तोंडामध्येच राहिली, आनंदानं नाचत त्यांनी घरची वाट धरली.

घरामध्ये शिरल्या-शिरल्या ऑर्डर त्यांनी सोडली, “बनवा बघू किलोभर मस्त खोबर्‍याची वडी.” बायको आली तरातरा किचनमधून चालत, कापडाची पिशवी मोठी हातात होती झुलत. पिशवी फेकून अंगावरती बायको ओरडली, “नारळ नाही घरामध्ये, साखरसुद्धा संपली.” पैसे होतील खर्च जर गेलो बाजारात, पण खोबर्‍याची वडीसुद्धा बसली होती मनात.

नाराजीनंच तिकडमराव बाजारात गेले, ‘नारळ-नारळ’ पुटपुटत रस्त्याने निघाले. घरापासून जवळच दिसला एक नारळवाला, लांबूनच विचारलं “एक नारळ केवढ्याला ?” नारळवाल्याला ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट, ‘पाच रुपये’ सांगून टाकले डिस्काउंटमध्ये झटपट.

“बापरे ! पाच रुपये ? नारळ एवढा महाग ?” नारळवाल्याने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. इथून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला नारळाची मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत इथल्याएवढे महाग !”

नारळ स्वस्त मिळवण्याची आयडीया त्यांना आवडली, दहा किलोमीटर चालत चालत कंजूष स्वारी निघाली. खूप वेळ चालल्यावर दिसली नारळाची मोठ्ठी बाग, “एक नारळ मिळेल काय ?” बाहेरून त्यांनी दिली हाक. बागेचा मालक चढला झाडावरती झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट. ‘तीन रुपये’ नारळाचे झाडावरूनच सांगितले, याच्यापेक्षा स्वस्त नसते त्यालासुद्धा परवडले.

“बापरे ! तीन रुपये ? नारळ एवढा महाग ?” बागमालकाने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला याहून मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत माझ्याएवढे महाग !”

नारळ अजून स्वस्त मिळणार - केवढी भारी गोष्ट, त्यासाठी करु म्हणाले चालायचे थोडे कष्ट. दहा किलोमीटर चालून चालून तिकडमराव थकले, खोबर्‍याची वडी आठवून पुन्हा पळत सुटले. शेवटी एकदा दिसली त्यांना नारळाची ती मोठ्ठी बाग, “एक नारळ केवढ्याला ?” बाहेरूनच दिली हाक. त्या बागेचा मालक बसला झाडामागं लपून, चिंगूस मुंगूसची कटकट आली माझ्याकडं कुठून ? ‘एक रुपया’ नारळाचा भाव सांगून टाकला, मालक कुठं दिसेना, आवाज फक्त ऐकला.

“बापरे ! एक रुपया ? नारळ एवढा महाग ?” बागेचा मालक खालीच बसला डोक्याला लावून हात. म्हणाला, “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. इथून दहा किलोमीटरवर भेट होईल समुद्राशी, समुद्राच्या किनारी दिसतील झाडंच झाडं नारळाची. किनार्‍यावरच्या झाडांचा कुणीच नाही मालक, वाट्टेल तेवढे नारळ तिथं मिळतील तुम्हाला फुकट !”

फुकट ! फुकट !! फुकट !!!

‘फुकट’ हा तर चिंगूस मुंगूसचा शब्द होता आवडता, हजार किलोमीटर चालून जाईल फुक्कट काही मिळवायला. चालून चालून दमले तरी पाय निघाले पुन्हा पुढे, नारळ-नारळ जप करत तिकडमराव समुद्राकडे. दहा किलोमीटर चालून जायला झाली त्यांना संध्याकाळ, पण किनार्‍यावर दिसली शेवटी नारळाच्या झाडांची माळ. वाकडे तिकडे आडवे सरळ, एका-एका झाडाला शंभर नारळ. या नारळांचा मालक कोण, किती नेले मोजणार कोण !

फुकट नारळ काढण्यासाठी, सरसर झाडावर चढली स्वारी. नारळ शोधून चांगला मोठ्ठा, चिंगूस मुंगूसनं मारला डल्ला. दोन्ही हातांनी नारळ धरून, खेचला सगळी शक्ती लावून.

पण तेवढ्यात काय झालं माहितीय ?

तिकडून आली वार्‍याची झुळुक, नारळाची झाडं हलली सुळुक-सुळुक. वारा वाहू लागला मग गोल-गोल, तिकडमरावांचा सुटला की तोल. पायांची पकड सुटली रे सुटली, नारळ पकडून स्वारी लटकली. हातांनी ठेवला नारळ धरून, झटकले पाय नि ओरडले खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् झाडावर चढलो !” आरडाओरडा त्यांचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !

पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, हत्तीवाला माहूत एक चालला होता घरी. किनार्‍यावरुन आला त्याला आवाज ऐकू, माहूत म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं एक माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट.

“माहूत दादा, वाचवा मला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”

माहूत बोलला हत्तीवरुन, “सत्काराचं करू काय ? पाचशे रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”

चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी माहुताचं ऐकलं.

माहूत झाला खूष पाचशे रुपयांसाठी, मदतीसाठी झाडाजवळ त्यानं नेला हत्ती. हत्तीच्या पाठीवर राहिला माहूत उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” तिकडमरावांचे त्यानं घट्ट धरले पाय, हत्तीला कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, माहुताला सोडला वरतीच लटकत.

माहुतानं ठेवले त्यांचे पाय घट्ट धरून, घाबराघुबरा होऊन तो ओरडला खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् मदतीला धावलो !” आरडाओरडा त्याचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !

पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, घोडेस्वार मजेत एक चालला होता घरी. किनार्‍यावरुन आला त्याला आवाज ऐकू, घोडेस्वार म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं डब्बल माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, नको म्हणाला आपल्यामागं चिंगूस मुंगूसची कटकट.

“घोडेवाले दादा, वाचवा आम्हाला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”

घोडेस्वार बोलला, “मी सत्काराचं करू काय ? हजार रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”

चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी घोडेस्वाराचं ऐकलं.

घोडेस्वार झाला खूष हजार रुपयांसाठी, झाडाजवळ घोडा घेऊन गेला मदतीसाठी. घोड्याच्या पाठीवर राहिला घोडेस्वार उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” लटकणार्‍या माहुताचे घट्ट धरले पाय, घोड्याला पण कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, घोडेस्वाराला सोडला वरतीच लटकत.

कोणालाच कळेना असे कसे झाले, एक नाही दोन नाही लटकले तिघे. नारळाच्या शेंडीला झाला तिघांचा भार, घोडेस्वार आणि माहुतावर पडले तिकडमराव. जमिनीवर पडून त्यांची मोडली हाडं आधी, वरून नारळ पडून फुटली तिघांची पण डोकी.

खोबर्‍याच्या त्या वडीसाठी रामायण हे घडलं, चिंगूस मुंगूसचं कंजूषपण फारच महागात पडलं. शेवटी एका नारळाचे पाच रुपये वाचले, दवाखान्यात लाखो मात्र खर्च की हो झाले !!

(सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथेवर आधारित…)


Share/Bookmark

Saturday, September 22, 2018

अमर आणि समर

चला गोष्ट सांगूया...
🙂😌☺😊😀😃😄😁

अमर आणि समर
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एका देशामध्ये दोन राज्यं होती, गुहागर आणि मीठागर त्यांची नावं होती. गुहागरात होत्या मोठ्या-मोठ्या गुहा. आणि मीठागरात होत्या बरण्याच बरण्या. गुहागरचा राजा होता अमर. मीठागरचा राजा होता समर.

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde



✒✒✒🙏🙏🙏


Share/Bookmark