ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, March 31, 2020

Ghost Story for Children

स्मशानातला चाकू
(लेखकः मंदार शिंदे  9822401246)

टिपू, दिपू, आणि गोपू तिघं मित्र होते. दिवसभर काम करुन संध्याकाळी एकत्र भेटत होते. रोज भेटण्यासाठी त्यांचा अड्डा ठरला होता. बस स्टँडच्या जवळ एक फेव्हरिट वडापावचा गाडा होता. गरम-गरम वडापाव खायला तिघांनाही आवडायचं. तोंडी लावायला मिरचीसारखं गप्पांचं पुराण चालायचं. कुठल्याही गोष्टीला तिखट-मीठ लावायची तिघांनाही सवय होती. चविष्ट गप्पा मारण्यात रोजची संध्याकाळ सरत होती.

एकदा टिपूनं बोलता-बोलता वेगळाच विषय काढला. म्हणाला, “माझ्या काकांनी सांगितलेली एक गोष्ट सांगू का तुम्हाला?”

 “सांग की, काकांची सांग, मामांची सांग, मग बाबांची सांग, दादांची सुद्धा सांग…” दिपू त्याला चिडवत म्हणाला.

“ऑणि हो, नॉनाँची ऑणि टॉटाँची रॉहिलीच की… त्योंची पॉण साँगून टॉक,” तोंडात गरम-गरम वडापाव कोंबत गोपू म्हणाला.

“राहू दे, तुम्हाला माझी चेष्टा केल्याशिवाय करमतच नाही ना?” टिपू रागानं बोलला.

“अरे नाही… तसं नाही… तू चिडू नकोस. गोष्ट सांग. आम्ही नाही चेष्टा करणार. काय रे गोप्या?” दिपूनं गोपूकडं बघत डोळे मोठ्ठे केले.

“हॉ हॉ, साँग साँग… गॉष्ट साँग…” गोपूचा तोबरा भरलेलाच होता.

“अरे, माझे काका सांगत होते…” टिपूनं गोष्ट सांगायला सुरुवात केली, “त्यांचा एक मित्र अचानक वारला. कशामुळं सांग?”

“चार्जिंग संपलं असेल त्याचं,” तोंडातला वडापावचा घास संपवून गोपू बोलला. दिपूच्या तोंडातला वडापाव मात्र फुर्रकन्‌ बाहेर उडाला.

“दिप्या, ह्या गोप्याला सांगून ठेव. आपण असली चेष्टा खपवून घेणार नाय,” टिपूचा पारा पुन्हा चढला.

“ए गोप्या, गप बस की रे. ओ दादा, अजून एक वडापाव कोंबा ह्याच्या तोंडात, म्हणजे थोडा वेळ शांत बसेल. तू सांग रे गोष्ट, टिपू…” दिपूनं सगळी व्यवस्था लावली आणि हातातल्या वडापावचा लचका तोडला.

“तर काका सांगत होते की, त्यांचा एक मित्र अचानक वारला. बरोब्बर एक महिन्यापूर्वी. आणि वारल्यावर त्याला स्मशानातसुद्धा न्यायची गरज नाही पडली. का बरं, सांग बघू?”

“का रे, तूच सांग,” गोपू काहीतरी बोलायाच्या आत दिपू पटकन बोलला. गोपूला तसाही नवीन वडापाव मिळाला होता, त्यामुळं त्याचा टिपूच्या गोष्टीतला इंटरेस्ट आपोआप कमी झाला होता.

“अरे, माणूस कुठं मरतो? घरी किंवा हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याला घेऊन जातात स्मशानामध्ये. पण काकांचा मित्र मेला चक्क स्मशानामध्ये!! मग त्याला स्मशानात कसं घेऊन जाणार?” टिपू उत्साहानं सांगू लागला.

“पण काय रे…” गोपूनं वडापाव खाण्याच्या मधल्या वेळेत प्रश्न विचारला, “तुझ्या काकांचा हा मित्र स्मशानात गेला होता कशाला?”

“मरायला!! तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा? तू वडापाव खा गपचूप!” दिपू त्याच्यावर खेकसला आणि टिपूकडं वळत म्हणाला, “तू मर… सॉरी, सॉरी… तू गोष्ट सांग.”

“हां, तर मागच्या महिन्यात काकांचा मित्र काहीतरी कामासाठी गावाला गेला होता. रात्री तिकडून निघायला झाला उशीर. बिचारा एकटाच त्याच्या गाडीवरुन येत होता. तरी बरं, पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या उजेडात रस्ता स्पष्ट दिसत होता.”

“चंद्राच्या उजेडात का बरं? गाडीचे लाईट बंद होते काय?” गोपूचा वडापाव संपला होता बहुतेक. टिपू आणि दिपूनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.

“तर चंद्रप्रकाशात गाडी चालवत तो येत होता. मध्यरात्रीची वेळ होती. नदीवरचा पूल ओलांडून स्मशानाजवळ आला, तसा त्याच्या कानांवर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. ‘वाचवा, वाचवा’ असा…”

“मग?” दिपू आता टिपूच्या गोष्टीत पुरता घुसला होता. गोपूनं दोघांकडं एक तुच्छ कटाक्ष टाकत तिसरा वडापाव खायला घेतला.

“मग काय, गाडी तशीच वळवून तो निघाला आवाजाच्या दिशेनं. आवाज कुठून येतोय, ते शोधण्याच्या नादात लक्षातच नाही आलं की आपण स्मशानात येऊन पोहोचलोय!”

“बापरे! मग?” दिपूनं आवंढा गिळत विचारलं.

“आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चिता आणि राख बघून तो घाबरला. परत जाण्यासाठी गाडी वळवायचा त्यानं प्रयत्न केला, पण गाडीचं हॅन्डलच वळेना. गाडी सरळ-सरळ पुढंच जात राहिली. विशेष म्हणजे, त्यानं किल्ली फिरवून गाडी बंद केली. तरीपण गाडी पुढं जातच राहिली, जातच राहिली…”

“उतारावर असेल गाडी, त्यात काय एवढं?” गोपूनं खांदे उडवले. त्याच्याकडं लक्ष न देता टिपू पुढं सांगू लागला.

“गाडी वळेना, बंद होईना, ब्रेकसुद्धा लागेना. घाबरुन तो जोरजोरात ओरडू लागला. पण एवढ्या मध्यरात्री त्याचा आरडा-ओरडा ऐकायला तिथं कोण असणार?”

“म… म… मग काय झालं?” घाबरत-घाबरत दिपूनं विचारलं.

“मग काय? त्याची गाडी जोरात जाऊन धडकली एका मोठ्ठ्या झाडावर. आणि जागच्या जागीच मेला बिचारा. आता कुणी म्हणतं धडकल्यामुळं मेला, कुणी म्हणतं घाबरल्यामुळं मेला. पण स्मशानातच मेला एवढं खरं!” टिपूनं आपली गोष्ट संपवली आणि गार झालेल्या वडापावचा एक घास घेतला.

“बाप रे! कसलं भयानक आणि विचित्र मरण आलं बिचाऱ्याला…” कपाळावर जमा झालेला घाम पुसत दिपू म्हणाला.

“काही नाही रे, दारु पिऊन गाडी चालवत असणार नक्कीच. मी सांगतो. हॅन्डल वळलंच नाही, ब्रेक लागलाच नाही, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंदच झाली नाही. ऐकून घेतोय म्हणून काहीपण सांगायचं का?” गोपू वैतागून म्हणाला.

“हे बघ, माझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट आहे. मी जशीच्या तशी तुम्हाला सांगितली, अज्जिबात तिखट-मीठ न लावता…” वडापाव खाता-खाता टिपू बोलला.

“हो का? तिखट-मीठ न लावता?” टिपूच्या हातातल्या वडापावकडं बघत गोपू म्हणाला, “मग मला एक सांग, तुझ्या काकांचा हा मित्र रात्री मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच लोकांना सापडला असेल ना?”

“हो, बरोबर आहे,” टिपू पटकन म्हणाला.

“बरोबर आहे ना? मग त्याला स्मशानातून आवाज ऐकू आला, त्याच्या गाडीचं हॅन्डल वळत नव्हतं, ब्रेक लागत नव्हता, किल्ली फिरवूनसुद्धा गाडी बंद झालीच नाही… हे सगळं त्यानं तुझ्या काकांना कधी सांगितलं? रात्री स्वप्नात येऊन का स्वर्गात पोहोचल्यावर पत्र पाठवून? काहीतरी थापा मारायच्या उगाच…”

“तुला अजिबात नाही ना पटत?” टिपूनं विचारलं.

“अज्जिबात नाही,” गोपू ठामपणे म्हणाला.

“भूत-बित काहीच नसतं असं तुला वाटतं ना? स्मशानात घाबरायचं काहीच कारण नसतं असं तुला वाटतं ना?” दिपूनं विचारलं.

“होय, असंच वाटतं. मी नाही घाबरत स्मशानात जायला.” गोपू म्हणाला.

“ठीकाय तर मग,” दिपू आणि गोपूकडं आळीपाळीनं बघत टिपू म्हणाला, “आज पौर्णिमा आहे. आज रात्री तू स्मशानात जाऊन दाखवायचं… एकट्यानं!!”

“चालेल. त्यात काय एवढं?” गोपू खांदे उडवत बोलला. “पण तुम्हाला पण यावं लागेल ना माझ्याबरोबर… मी खरंच गेलो की नाही ते बघायला? नाही तर, उद्या म्हणाल की मी खोटं-खोटं सांगतोय, स्मशानात जाऊन आल्याचं…”

“म… म… मी नाही येणार स्मशानात. त… त… तू जा रे टिपू ह्याच्याबरोबर. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे,” दिपू बोलला.

“आपण जायची काहीच गरज नाही,” इकडं-तिकडं बघत टिपू काहीतरी विचार करु लागला. मग अचानक उठून तरातरा वडापावच्या गाडीकडं चालत गेला.

“बोलून-बोलून भूक लागली असेल बहुतेक,” त्याच्याकडं बघत गोपू बोलला. तेवढ्यात टिपू त्यांच्याकडं परत आला. येताना त्याच्या हातात कांदा कापायची सुरी होती.

“हे काय रे? ही सुरी कशाला आणली?” दिपूनं विचारलं.

“आता नीट ऐक, गोप्या. आज रात्री तू एकट्यानंच स्मशानात जायचं. सगळ्यात शेवटी नदीच्या काठावर जे मोठ्ठं झाड असेल त्याच्यावर ही सुरी खुपसून परत यायचं. उद्या सकाळी आम्ही दोघं जाऊन खात्री करुन येऊ की तू खरंच स्मशानात गेला होतास की नाही.”

“वा वा, क्या बात है! काय आयडीया काढलीस, टिपू. शाब्बास!!” दिपू आनंदानं टाळ्या वाजवत म्हणाला. त्याला आता गोपूबरोबर रात्री स्मशानात जायला लागणार नव्हतं ना.

“ठीक आहे. ठरलं!” असं म्हणत गोपूनं हात पुढं केला. टीपूनं एखादी तलवार द्यावी तशी दोन्ही हातांनी ती सुरी त्याला बहाल केली. आणखी एक-एक वडापाव खाऊन तिघं आपापल्या घराच्या दिशेनं निघून गेले.

ठरल्याप्रमाणं, मध्यरात्री गोपूनं गाडी काढली आणि निघाला स्मशानाच्या दिशेनं. थंडीचे दिवस होते. त्यानं अंगात घातलेल्या जॅकेटमधूनसुद्धा त्याला गार वारं लागत होतं. गाडी चालवताना त्यानं जॅकेटची चेन गळ्यापर्यंत ओढून घेतली.

पुलाच्या अलीकडंच त्यानं स्मशानाच्या कमानीतून गाडी आत घातली. संध्याकाळी मित्रांसमोर कितीही बढाया मारल्या तरी आत्ता मध्यरात्री स्मशानात गाडी चालवताना त्याला थोडी-थोडी भीती वाटू लागली. आजूबाजूला अर्धवट जळालेल्या चितांमधून धूर येत होता. लाकडं आणि राख चुकवत-चुकवत तो नदीच्या दिशेनं चालला होता. काठावरच्या मोठ्या झाडापाशी येऊन त्यानं गाडी बंद केली.

गाडीचा आवाज बंद होताच त्याला आजूबाजूचे आवाज स्पष्ट ऐकायला येऊ लागले. नदीच्या पाण्याची खळखळ, रातकिड्यांची करकर आणि झाडांवरच्या पानांची सळसळ त्याला भीतीदायक वाटू लागली. काम झाल्यावर लगेच निघता यावं म्हणून त्यानं गाडी वळवून परत जायच्या दिशेला तोंड करुन लावली. आता हॅन्डल न वळता अडकून बसलं तरी चालेल, आपली गाडी स्मशानाच्या बाहेरच जाईल, याची खात्री करुन त्यानं जॅकेटची चेन उघडली. जॅकेटच्या आतल्या बाजूला टिपूनं दिलेली सुरी त्यानं खोचून ठेवली होती. थरथरत्या हातात सुरी पकडून तो झाडाजवळ गेला.

आजूबाजूला कुणी आहे का, याचा कानोसा घेत गोपूनं सुरी उगारली आणि झाडाकडं न बघताच खस्सकन्‌ सुरी बुंध्यात खुपसली. सुरीवरची मूठ सोडून तो एक-दोन क्षण तिथंच उभा राहिला. त्याला वेगळं काहीच जाणवलं नाही. पाण्याची खळखळ, किड्यांची करकर, आणि पानांची सळसळ तशीच सुरु होती.

आता त्याचा धीर वाढला. ठरल्याप्रमाणं काम फत्ते झालं होतं. आता सकाळी टिपू आणि दिपू सुरी बघायला येतील. आपण आपलं मस्तपैकी घरी जाऊन ताणून देऊ. असा विचार करत तो गाडीच्या दिशेनं निघाला, तेवढ्यात…

मागून त्याचं जॅकेट कुणीतरी ओढतंय असं त्याला वाटलं. गोपूचा श्वास मधेच अडकला. मागं वळून बघायचंसुद्धा त्याचं धाडस झालं नाही. तो जोर लावून पुढं सरकू लागला.

त्यानं पुढं जायला जोर लावला की मागून तेवढ्याच जोरात कुणीतरी त्याला खेचत होतं. त्याचे पाय जागेवरच घसरु लागले. त्याच्याच पायांचा फरफर… फरफर… असा भीतीदायक आवाज येऊ लागला. त्याच्या जॅकेटवरची पकड एवढी घट्ट होती की, त्याला एक पाऊलसुद्धा पुढं टाकणं शक्य होत नव्हतं.

गोपूला दरदरुन घाम फुटला. खळखळ… करकर… सळसळ… फरफर… असे सगळे आवाज त्याच्या कानांमध्ये घुमू लागले. अंगातला सगळा जोर एकवटून त्यानं एक जोरदार किंकाळी फोडली आणि जागेवरच बेशुद्ध झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोपूला जाग आली. टिपू आणि दिपू त्याच्या समोर उभे होते. नदीच्या पाण्याची खळखळ आणि झाडावरच्या पानांची सळसळ सुरुच होती. फक्त रातकिड्यांची करकर आणि त्याच्या पायांची फरफर थांबली होती.

“टिपू… दिपू… तुम्ही…. मी… मी… म्हणजे मी अजून जिवंत आहे? त्या… त्या… भुतानं मला मारलं नाही? मी… मी जिवंत आहे?” गोपू आनंदानं ओरडू लागला.

टिपू आणि दिपू पोट धरुन खो-खो हसत होते.

“भूत…? कसलं भूत…? कुठं आहे भूत…?” दोघांनी विचारलं.

“त्या… त्या झाडावर भ… भ… भूत आहे. त्यानं माझं जॅकेट धरुन ठेवलं रात्री…” गोपू अजून घाबरलेलाच दिसत होता.

“तुझं जॅकेट धरुन ठेवलं…? भुतानं…? हॅ हॅ हॅ” गोपूकडं आणि त्या झाडाकडं आळीपाळीनं बघत दोघं हसत होते.

ते का हसतायत हे गोपूला कळेना. त्यानं धीर करुन मान हळूहळू वळवली आणि आपलं जॅकेट धरुन ठेवणाऱ्या झाडाकडं बघितलं. पण तिथं त्याला भूत-बित काहीच दिसलं नाही. त्याला दिसला - झाडाला चिकटलेला त्याच्या जॅकेटचा कोपरा आणि… जॅकेटच्या कोपऱ्यात त्यानंच रात्री खस्सकन्‌ खुपसून ठेवलेली कांदा कापायची सुरी !!

=== 0 ===


Share/Bookmark

No comments:

Post a Comment