ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, July 8, 2021

Motha Manus - Marathi Short Story

 

मोठा माणूस

(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)


    चिनू आज सकाळी सहा वाजताच उठून बसला होता. रात्री झोपताना बाबांनी त्याला प्रॉमिस केलं होतं - 'उद्या नक्की पुस्तक काकांकडं घेऊन जाईन'. पुस्तक काकांकडं जायला चिनूला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडायचं. रोज सकाळी शाळेत जायला चिनू अजिबात तयार नसायचा; पण आवडीच्या ठिकाणी जायचं म्हटलं की सगळ्यात आधी उठून तयार व्हायचा!


    पुस्तक काकांचं घर चिनूचं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडीचं ठिकाण होतं. खरंतर ते घर नव्हतंच… तो एक जुना वाडा होता; पण जुन्या सिनेमात किंवा पुस्तकात असतो तसा दगडी वाडा नव्हे. या वाड्याच्या भिंती बांबूच्या होत्या आणि एकावर एक तीन मजले बांधलेले होते. बांधलेले म्हणजे खरोखर जाड्या सुतळीसारख्या दोराने बांधून घेतले होते. अशा भिंती चिनूने कुठंच बघितल्या नव्हत्या; अगदी पुस्तकातसुद्धा नाही, टीव्हीवरसुद्धा नाही, इंटरनेटवरसुद्धा नाही.


    या भिंतींचा रंग प्रत्येक वेळी वेगळा असायचा. याचीसुद्धा चिनूला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप गंमत वाटायची. एकदा भर उन्हाळ्यात चिनू बाबांसोबत पुस्तक काकांकडं गेला होता, तेव्हा त्यांच्या घराच्या भिंती हिरव्याशार आणि थंडगार होत्या. बाबांच्या आणि काकांच्या गप्पा मारुन होईपर्यंत चिनू त्या हिरव्याशार आणि थंडगार भिंतींना टेकून बसला होता. हळूहळू तो स्वतःच एवढा थंड झाला की, जाताना बाबांना त्याला झोपेतून उठवावं लागलं.


    नंतर एकदा भर पावसात त्यांच्याकडं गेल्यावर, भिंतींमधून झिरपणारं पाणी बघून त्याला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा वाटली होती. आपल्या घरी भिंतीवर चुकून एखादा ओघळ आला की वॉटर प्रूफिंगवाल्यांना फटाफट फोन जातात... आणि इथं भिंतींचे धबधबे झाले तरी पुस्तक काका गरम वाफाळत्या चहाचा घोट घेत निवांत गप्पा मारत बसलेले असतात. गंमतच आहे नाही?


    पुस्तक काकांच्या घराची आणखी एक गंमत म्हणजे त्यांच्या घरात कुठंही जिनेच नव्हते. ना जिना, ना पायऱ्या… पण मजले तर तीन होते! मग वरच्या मजल्यांवर जायचं कसं? चिनूलासुद्धा हा प्रश्न पहिल्याच भेटीत पडला होता. चिनूनं हा प्रश्न विचारल्यावर त्याचे बाबा आणि पुस्तक काका खो खो हसायलाच लागले. त्यावेळी चिनूला या दोघांचा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप राग आला होता. मोठ्या माणसांना लहान मुलांपेक्षा चार गोष्टी जास्त माहिती असतात, मान्य आहे. पण ते लहान होते तेव्हा त्यांनापण असे प्रश्न पडले असतीलच ना? मग आता लहान मुलांनी असे प्रश्न विचारले की ही मोठी झालेली माणसं खो खो हसून का दाखवतात?


    "तुला वरच्या मजल्यावर जायचं आहे का?" पुस्तक काकांनी हसू आवरत विचारलं होतं.


    "जायचंच आहे असं काही नाही; पण जायला लागलं तर कसं जाणार, एवढाच प्रश्न पडला, काका…" चिनूनं राग आवरत उत्तर दिलं होतं.


    यावर पुन्हा हसत हसत काकांनी त्याला सरळ उचललं आणि एका भिंतीसमोर धरलं. चिनूनं नकळत समोरच्या भिंतीला, म्हणजे त्यातल्या दोन बांबूंना पकडलं आणि काकांनी त्याला सोडून देताच सरसर वर चढत तो वरच्या मजल्यावर पोहोचलासुद्धा! आणि वरच्या मजल्यावर त्याला जे काही दिसलं, ते बघून तो खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच खूष झाला होता...


    आणि म्हणूनच तेव्हापासून पुस्तक काकांकडं जायला चिनूला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडायचं. आणि म्हणूनच चिनू आज सकाळी सहा वाजताच उठून बसला होता.


    बरोबर सात वाजता चिनू आणि बाबा पुस्तक काकांकडं जायला बाहेर पडले. बाबांनी त्यांच्या बाईकला किक मारून ती स्टार्ट केली. बाईक स्टार्ट झाल्याची खात्री करून मगच चिनू त्यांच्यामागं चढून बसला. त्याचं काय आहे, मागं एकदा तो गाडीवर बसलेला असताना बाबांनी किक मारली आणि ती किक गाडीला बसायच्या ऐवजी चिनूच्या पायालाच बसली. तेव्हापासून चिनू बाबांकडं हट्ट करत होता, बटण स्टार्टची बाईक घ्या म्हणून… पण बाबांना काही ते पटत नव्हतं. त्यांना किक मारल्याशिवाय गाडी चालवायचं समाधान मिळत नसावं बहुतेक... म्हणून चिनूनं स्वतःपुरता उपाय शोधला होता की, बाईक स्टार्ट झाल्याशिवाय मागं चढून बसायचंच नाही. तसा चिनू खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच स्मार्ट होता, नाही का?


    बाईक स्टार्ट झाल्याची खात्री पटल्यावर चिनू टुणकन उडी मारून बाबांच्या पाठीमागं बसला आणि आईनं शंभर वेळा दिलेल्या सूचनेचं काटेकोर पालन करत त्यानं सुरक्षिततेसाठी बाबांच्या पोटाला घट्ट मिठी मारली. पण बराच प्रयत्न करूनसुद्धा त्याच्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत. बाबांचं पोट जरा जास्तच सुटलंय, असं मनातल्या मनात म्हणत त्यानं खाली स्वतःच्या पोटाकडं नजर टाकली, आणि बाबांचा नव्हे तर आपलाच घेर वाढत चाललाय हे त्याच्या लक्षात आलं. पण आपलं वाढीचं वय आहे, त्यामुळं हे चालायचंच, असं त्यानं स्वतःला समजावलं आणि बाबांच्या ढगळ्या शर्टच्या दोन कडा मुठीत घट्ट पकडून तो बसला.


    पहिल्या वेळी पुस्तक काकांच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेल्यावर चिनूला जे काही दिसलं होतं, त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी जायची वाट तो बघायचा. आत्ता गाडीवर बसल्या-बसल्या त्याच्या डोळ्यांसमोर त्या वरच्या मजल्यावरचंच चित्र दिसत होतं आणि तिथं पोहोचल्यावर काय-काय करायचं, याचीच डोक्यात जुळणी चालली होती.


    आपल्याच विचारांमध्ये गुंगलेल्या चिनूला पुस्तक काकांचं घर आलेलं कळालंच नाही. म्हणजे घर आहे तिथंच होतं, पण तो तिथं कधी येऊन पोहोचला हे कळालंच नाही. बाबांनी गाडी सुसाट पळवलेली दिसते, असा विचार करत त्यानं गाडीवरून टुणकन खाली उडी मारली आणि पळत-पळत घराच्या उघड्या दरवाजातून थेट आत शिरला. दरवाजावर काकांच्या नावाची एक रंगीत पाटी लावलेली होती, तिच्याकडं चिनूनं नेहमीप्रमाणं दुर्लक्ष केलं. एक तर पुस्तक काकांचं खरं नाव खूप मोठं होतं; त्यापेक्षा त्याला त्यानं स्वतः ठेवलेलं 'पुस्तक काका' हे नाव जास्त आवडायचं. पुस्तक काकांनासुद्धा या नवीन नावाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता; तसं त्यांनी चिनूला आणि चिनूच्या बाबांना स्पष्ट सांगितलं होतं. म्हणजे पुस्तक काकांनासुद्धा त्यांचं खरं नाव आवडत नसण्याची शक्यता होती. खरंतर आपलं नाव आपण स्वतःच ठरवलं पाहिजे, असं चिनूला वाटायचं. म्हणून तर त्याला थोडं-थोडं कळायला लागल्यावर त्यानं आई-बाबांशी चर्चा करून त्याचं 'चिनू' हेच नाव वापरायला भाग पाडलं होतं. तसं त्याचं खरं नाव आई-बाबांनी (की आणखी कोणी, माहिती नाही) 'चंद्रशेखर' असं भारदस्त ठेवलं होतं. पण त्या नावाचं त्याला स्वतःलाच एवढं ओझं वाटायचं की विचारू नका! आणि इंग्रजी शाळेत जायला लागल्यावर एवढ्या मोठ्या नावाचं स्पेलिंग… बापरे!


    तर चिनूनं पुस्तक काकांचं 'पुस्तक काका' हे नाव ठेवण्यामागं काय कारण असावं? बरोब्बर ओळखलंत! पुस्तक काकांच्या घरात खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पुस्तकं होती आणि चिनूला पुस्तक वाचायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडायचं; म्हणून मग त्यानं पुस्तक काकांना हे नाव देऊन टाकलं.


    "तुम्ही दोघं बसा इथं गप्पा मारत; मी चाललो वरच्या मजल्यावर," अशी घोषणा करत चिनू भिंतीला धरुन सरसर सरसर वरच्या मजल्यावर पोहोचलासुद्धा. खालून बाबा आणि पुस्तक काकांचं खो खो हसणं ऐकू येत होतं; पण आता त्याला त्यांच्या हसण्याचा राग येत नव्हता. वरच्या मजल्यावर पसरलेला पुस्तकांचा खजिना बघून चिनूचे डोळे चमकायला लागले होते.


    त्या मजल्यावर सगळीकडं कपाटं भरभरून पुस्तकंच पुस्तकं होती. कपाटात न बसणारी पुस्तकं टेबलावर, खुर्च्यांवर, आणि अगदी जमिनीवरसुद्धा ठेवलेली होती. एवढी सगळी पुस्तकं पुस्तक काकांनी कधी आणली असतील? एवढी सगळी पुस्तकं त्यांनी स्वतः वाचली असतील का? एवढ्या सगळ्या पुस्तकांमधलं त्यांना थोडं थोडं तरी आता आठवत असेल का? असे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सारे प्रश्न पहिल्या वेळी या मजल्यावर आला तेव्हा चिनूला पडले होते. पण आता या प्रश्नांवर विचार करायला त्याच्याकडं अजिबात वेळ नव्हता. बाबा आणि पुस्तक काकांच्या गप्पा संपेपर्यंत त्याला जास्तीत जास्त पुस्तकं वाचून काढायची होती.


    पुस्तक काकांनी चिनूला पाहिजे तितकी पुस्तकं वाचायची परवानगी दिलेली होती; पण एकाच अटीवर... कुठलंही पुस्तक या घराच्याच काय, मजल्याच्या देखील बाहेर नाही गेलं पाहिजे. या मजल्यावर चिनूला आवडणारी गोष्टींची, चित्रांची, खेळांची, आणि माहितीची खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पुस्तकं होती. कदाचित शंभर, दोनशे, पाचशे, किंवा हजारसुद्धा असतील... पुस्तक काकांना तरी नक्की आकडा माहिती असेल की नाही कुणास ठाऊक!


    ही सगळी पुस्तकं वाचून झाली की मग पुस्तक काका त्याला अजून वरच्या मजल्यावरची पुस्तकं वाचायची परवानगी देणार होते. प्रॉमिसच केलं होतं त्यांनी तसं. वरच्या मजल्यावर म्हणे मोठ्या माणसांनी वाचायची पुस्तकं होती. पण या मजल्यावरची पुस्तकं वाचून संपेपर्यंत चिनूसुद्धा एक मोठा माणूस झालेला असेल, असं बाबा मागं एकदा म्हणाले होते.


    "वयानं नाही झाला तरी डोक्यानं नक्कीच मोठा माणूस होईल तोपर्यंत," असं त्यावर पुस्तक काका म्हणाले होते.


    ...म्हणजे फक्त वय वाढलेलीच माणसं मोठी असतात असं नाही का? म्हणजे वयानं वाढली पण डोक्यानं वाढलीच नाहीत अशा माणसांना पण आपण मोठी माणसं म्हणतो का? आणि वयानं नाही पण डोक्यानं वाढली अशा मोठ्या माणसांना आधीच मोठी झालेली माणसं लहान समजतात की मोठं? आता आपल्या डोक्यात असे मोठे मोठे प्रश्न यायला लागलेत म्हणजे आपण मोठे झालो असं समजायचं का? पुस्तक काकांएवढा मोठा माणूस होण्यासाठी किती पुस्तकं वाचायला लागतील? असे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सारे प्रश्न चिनूच्या छोट्याशा डोक्यात गर्दी करू लागले.


    पण या प्रश्नांवर आत्ता विचार करायला अजिबात वेळ नव्हता. आत्ता पुस्तकं वाचायची आहेत. बाकीचे विचार घरी परत जाताना बाईकवर मागं बसूनसुद्धा करता येतील. तेव्हा बाबा काहीतरी प्रश्न विचारतील; पण त्यांना हं हं म्हणून आपले विचार चालू ठेवता येतील. मोठी माणसं असंच करतात हे चिनूनं अनेकदा बघितलं होतं. मोठ्या माणसांच्या अशा अनेक गोष्टी त्याला लवकर लवकर कळायला लागल्या होत्या. अशानं तो खूपच लवकर मोठा माणूस होऊन जाईल आणि मग पुस्तक काका त्याला अजून वरच्या मजल्यावर पाठवून देतील. पण तोपर्यंत या मजल्यावरची पुस्तकं वाचूनच नाही झाली तर काय? या विचारानं चिनूची पुन्हा गडबड उडाली आणि बाकीच्या विचारांना मोठ्या कष्टानं बाजूला सारत तो पुस्तकात मान खुपसून वाचू लागला.


[समाप्त]


('शिक्षण विवेक' जुलै २०२१ अंकामध्ये प्रकाशित)
Share/Bookmark

No comments:

Post a Comment