ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, September 13, 2023

Dil Feka, Tune Pakda... (Marathi Short Story)

 


“मराठी कविता म्हणजे फारच अवघड प्रकरण आहे बुवा,” माझा मित्र अगदी कळकळीनं बोलत होता.

“का रे, एवढं वैतागायला काय झालं?” मी विचारलं.

“वैतागणार नाही तर काय? चांगलं पोतंभर गहू घातलं गिरणीत, की मूठभर पीठ निघतंय बघ!”

माझ्या डोळ्यांसमोर, केस - मिशा - अगदी डोळ्यांच्या पापण्यादेखील पांढऱ्या झालेला माझा मित्र, एका मोठ्या पिठाच्या गिरणीच्या तोंडाशी, खाली वाकून, पीठ का येत नाही म्हणून मशिनमध्ये घुसू पाहतोय, असं चित्र उभं राहिलं. मला खुदकन् हसू आलेलं पाहून तो जास्तच वैतागला.

“हं, हसा हसा, तुम्हाला हसू येणारच. तुम्ही हिंदीत पण लिहिता ना…”

“अरे हो हो, असा एकदम हिंदी-मराठी भाषावाद का उकरून काढतोयस? आणि तुला कुणी नको म्हटलंय का हिंदीत लिहायला? तुझाच हट्ट ना - म्हणे, मातृभाषेशी प्रतारणा करणार नाही, वगैरे वगैरे…”

“करा, अजून चेष्टा करा गरीबाची…” तो अधिकच हिरमुसला. मीच मग समजुतीच्या सुरात विचारलं, “जाऊ दे रे ते सगळं, काय झालं ते तरी सांगशील का?”

“काय सांगायचं? अरे परवा शखूसाठी एक छान कविता केली होती.”

“शकू? कोण शकू?” मी त्याच्या मैत्रिणींची नावं आठवायचा प्रयत्न केला.

“शकू नाही रे, शखू.. श-खू… शिखा नाही का माझी मैत्रिण?”

“अच्छा अच्छा शिखा! ती नागपूरची? आणि एवढं चांगलं ‘शिखा’ नाव असताना ‘शकू’ काय म्हणतोस रे? तिचं काव्यात्मक नामकरण केलंयस की काय - शकुंतला, शाकंभरी, वगैरे?”

“छे छे, तसं काही नाही,” उगाचच लाजत तो म्हणाला, “ते आपलं आमचं खाजगीतलं काहीतरी…”

“खाजगीतलं? असू दे, असू दे. कवितेबद्दल काहीतरी सांगत होतास. की ते पण तुमचं खाजगीतलं काहीतरी...?”

“नाही रे, तेच तर सांगत होतो,” तो पुन्हा वैतागून बोलू लागला, “अरे ही शखू, म्हणजे शिखा, मूळची नागपूरची. सध्या मुक्काम पोस्ट पुणे. शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमात…”

“वय किती? उंची? आणि…” मी पुढं विचारू लागलो.

“का रे, तुला काय करायचंय?” त्यानं रागावून विचारलं.

“तसं नाही रे, तू मला तिचा बायो-डाटा वाचून दाखवल्यासारखी माहिती सांगतोयस, म्हणून मीच मदत केली मुद्दे आठवायला…”

“अरे बायो-डाटा कुठला? मला सांगायचं हे होतं की मूळ गाव नागपूर आणि शिक्षण इंग्रजी माध्यमातलं. परीणाम - मराठीच्या नावानं बोंब, अगदी दोन्ही हातांनी…”

“आणि अशा पोरीला तू तुझ्या साजुक तुपातल्या मराठी कविता ऐकवतोस? ग्रेट आहेस यार!”

“कसला ग्रेट? ऐक तर खरं. हिच्यासाठी मी एक सुंदर कविता केली, माझ्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहून तिला प्रेमानं वाचायला दिली.”

“मग?”

“मग काय? संध्याकाळच्या छान गार वाऱ्यात, झेड ब्रीजवर बसलो होतो. तिला सांगितलं, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय म्हणून. तीही लाजली. मी खिशातून हा कवितेचा कागद काढला, तिच्यासमोर धरला, आणि तिला म्हणालो, वाच!”

“मग?”

“छान लाजत-बिजत तिनं कागद हातात घेतला, माझी कविता वाचली, आणि काय झालं कुणास ठाऊक, तिचा चेहरा एकदम अजीर्ण झाल्यासारखा झाला. माझ्याकडं एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून ती उठली, गाडीवर बसली, गाडी स्टार्ट केली आणि भुर्रकन निघून गेली.”
 
“बाप रे, मग तू काय केलंस?”

“काय करणार? तिच्याच गाडीवर बसून गेलो होतो ना. चालत चालत स्टॉपवर गेलो, बस पकडली आणि घरी आलो.”

“अरे, ते नाही विचारलं मी. काय केलंस म्हणजे, तिला थांबवायचा प्रयत्न नाही का केलास?”

“नाही रे बाबा, ती गाडी चालवत असली की ट्राफिक पोलिस पण तिला थांबवायला धजावत नाही. मी काय थांबवणार?”

“अशी काय डेंजर कविता दिलीस बाबा तिला वाचायला? काही चावट लिहिलं होतंस की काय?”

“छे, छे! असलं-तसलं काही लिहित नाय आपण. माझ्या मनातले, अगदी आतले भाव मांडले तिच्यासमोर…”

“बरं बरं, आता आणखी सांडू नकोस. काय लिहिलं होतंस सांगशील तर खरं.”

“ऐक हं,” आयताच श्रोता मिळाल्यानं त्याला स्फुरण चढलं. चेहऱ्यावर अगदी काकुळतीचे भाव आणून त्यानं मला त्या ऐतिहासिक ओळी ऐकवल्या -
“मम हृदयीचे भाव कळावे
तव हृदयी मज स्थान मिळावे,
मम नयनांची पुष्पांजली ही
स्वीकारून तव मुख उजळावे…”

“च्यायला, शिखा ग्रेट आहे यार,” त्याची लिंक तोडून मी म्हणालो. त्याच्या कवितेला दाद द्यायचं सोडून मी शिखाचं कौतुक का करतोय ते त्याला कळेना.

“का रे, ती का ग्रेट?”

“नाही तर काय? अरे असलं काहीतरी वाचून ती मुलगी चक्क शांतपणे निघून गेली.”

“बघ ना, माझ्या कवितेची, माझ्या प्रतिभेची ही किंमत?” त्याचा इगो खूपच दुखावला गेला होता.

“अरे कसली डोंबलाची प्रतिभा? साधा कॉमन सेन्स नाही यार तुला.”

“का, काय झालं?” तो पुन्हा हिरमुसला.

“साल्या, एक तर इंग्लिश मिडियमच्या मुलीशी मैत्री करायची, तिला झेड ब्रीजवर घेऊन जायचं, ते पण तिच्याच गाडीवरून. आणि तिथं बसून तिला हे असलं काहीतरी वाचायला द्यायचं. ती पण खरंच ग्रेट आहे. मी असतो ना तिच्या जागी, तुला उचलून पुलावरून खाली फेकून दिलं असतं, निघून जाण्यापूर्वी.”

“हे अति होतंय बरं का,” माझं बोलणं त्याला फारच लागलं असावं. “काय लिहायला पाहिजे होतं मग मी?”

“अरे, जरा वाचणारं कोण आहे, वातावरण कसं आहे, याचा अंदाज घेऊन लिहावं. थोडं रोमँटीक, थोडं फिल्मी, अगदी हलकं फुलकं…”

“म्हणजे कसं?”

“म्हणजे असं काहीतरी -
दिल मेरा आवारा 
चाहे तेरे दिल का कमरा,
नैनों में फूलों का गजरा 
खिल उठेगा मुखडा तुम्हारा…”

“अरारारारा… काय रे, काय पण कविता. काय ते कल्पना-दारिद्रय!"

“वा रे वा! कल्पना-दारिद्रय काय? 'तव हृदयी स्थान मिळावे' म्हणजे रहायला 'कमरा' हवा असंच ना? आणि 'नयनांची पुष्पांजली’ म्हणजे कल्पनेची भरारी काय रे? 'नैनों में फूलों का गजरा' म्हणजे वेगळं काय म्हटलं मी? तुझ्या रबराच्या चपलेसारख्या शब्दबंबाळ कवितेपेक्षा माझी शायरी मख्खनसारखी नाही का उतरणार घशात?”

“अरेरेरेरेरे, कुठुन बुद्धी झाली आणि तुला सांगायला आलो? अरे, काय तुझी भाषा, काय तुझ्या उपमा? नैनों में गजरा काय, रबराची चप्पल काय, अरे कशाचा कशाला संबंध तरी लागतोय का?”

“करेक्ट! अगदी असंच वाटलं असणार शिखाला. मम हृदयीचे तव हृदयीचे, मुखात माशी कडमडली,” मी मुद्दाम त्याला डिवचलं.

“बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही हिंदीत लिहिता ना. मातृभाषेची खिल्ली उडवणारच तुम्ही.” तो पुन्हा हिंदी-मराठी वादावर घसरला.

“अरे, त्याचा काय संबंध इथं? मी मराठी वाईट आणि हिंदी भारी असं थोडंच म्हणतोय? फक्त आपण कुणासमोर, कुठं, काय बोलायचं याचं भान राखावं माणसानं.” मी माझा मुद्दा मांडला.

“असं कसं, असं कसं? एक तर सोयीस्कर बदल करून ठेवलेत हिंदी भाषेत. मला तर वाटतं, पूर्वी सगळेच मराठीत बोलत असणार; पण गाणी लिहायला बसले की शब्द जुळवत-जुळवत काहीतरी वेगळीच भाषा बनत गेली असेल. तुमच्यासारख्या सगळ्यांनी मिळून मग गाणी लिहायची वेगळी भाषाच मंजूर करून घेतली असेल तेव्हाच्या राजा-महाराजांकडून. कसली सोयीस्कर भाषा आहे - इकडून तिकडून चार शब्द गोळा करायचे - दिल, प्यार, नैना, सावन, असे काहीबाही - आणि झाली गाणी तयार. एकदम सुरात. यमक जुळणार, चाल बसणार. नाही तर आम्ही, बसलोय मराठीचं दळण घालून.” तो अगदी पोटतिडकीनं बोलत होता.

“सोयीस्कर भाषा कसं काय म्हणतोयस तू हिंदीला?” मी विचारलं.

“हे बघ, हिंदीमध्ये मराठीपेक्षा मुळाक्षरं कमी, जोडशब्द कमी, जिभेला त्रास कमी. मराठीत मात्र उच्चाराइतकी मुळाक्षरं, जड-जड जोडाक्षरं. कशी जुळवायची यमकं, कशी बसवायची चाल?”

“म्हणजे? हिंदीत अक्षरंच कमी आहेत असं तुला म्हणायचंय की काय?”

“होच मुळी! आता मला सांग, मराठीत जर आपण काळा-निळा म्हणू शकतो, तर हिंदीत बोलताना काला-निला का म्हणायचं? हे 'ळ' 'कुठे गायब झालं हिंदीतून?”

“आयला खरंच की! माझ्याही कधी डोक्यात आलं नाही. हिंदी बोलणाऱ्यांची जीभ वळत नसेल बहुतेक ‘ळ’ म्हणायला.”

“वा रे वा! त्यांच्या तोंडाचा आकार काय वेगळा असतोय का? आणि त्यांचं जाऊ दे, तुला तर ‘ळ’ म्हणता येतं ना?”

“मग काय, येतंच मुळी. हे बघ - श्रावणात घन निळा बरसला; घननीळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा…”

“बास, बास, कळालं तुझी जीभ किती वळवळते ते. आता मला सांग, तुला ‘ळ’ माहिती असूनही हिंदीमध्ये लिहिताना तू ‘ल’ का वापरतोस?”

“म्हणजे, तसं… तसंच असतं बुवा हिंदीत,” मला खरंच सुचलं नाही.

“तसंच म्हणजे कसं?” त्याला आता उत्साह आला होता. “तसंच म्हणजे कसं? मी सांगू? तसंच म्हणजे सोयीस्कर! म्हणजे आधी ओळी अशा सुचल्या असणार -
यशोमति मैंया से बोले नंदलाला,
राधा क्यों गोरी, मैं क्यों काळा?”

त्यानं या ओळी गाऊन दाखवल्यावर मला हसू आलं. "खरंच की, म्हणजे ‘हम काळे है तो क्या हुवा दिळवाळे हैं’ असं काहीतरी लिहायला लागलं असतं नाही का?”

“बरोब्बर!” त्याला आता हुरूप चढला होता. “तर मग, त्या काळच्या सर्व कवी, गीतकारांनी एकत्र येऊन ही अशी त्रास देणारी मुळाक्षरं शोधून काढली आणि त्या सगळ्यांना कवितेच्या, गाण्यांच्या देशातून हद्दपार करून टाकलं. ज्ञ, ळ, ण, अशी ती दुर्दैवी अक्षरं होती,” एखाद्या इतिहासकाराच्या आविर्भावात तो हे सगळं बोलत होता.

“हं, लहानपणी मलाही प्रश्न पडायचा - ते शाळेत शिकवतात ते ‘विज्ञान’ आणि टीव्हीवरच्या हिंदी बातम्यांमध्ये म्हणतात ते ‘विग्यान’ वेगळे आहेत की काय?”

“आता पुढं ऐक - मराठीत शब्द होता ‘डोळे’. इतका सुंदर अवयव, पण त्या ‘ळ’नं केला ना घोटाळा? आता यमक काय जुळवायचं कवितेत - सांग बरं…”

मी आपलं असंच काहीतरी बोललो -
“माझे डोळे, तुझे गोळे,
तोंडात बोळे, चोंबाळे!”

“अरेरेरेरे, चुकलो, चुकलो तुला विचारून,” तो परत वैतागला.

“अरे मी काय केलं? तूच सांगितलंस ना, डोळे यमकात बसवायला." मी.

“चूक झाली कविराज. आता ते डोळे यमकातून काढून परत खोबणीत बसवा. तर मी काय सांगत होतो - ‘डोळे’ यमकात बसत नाहीत म्हटल्यावर आले ‘नैना. आता ‘नैना’ची यमकं बघ - नैना, रैना, है ना, ना ना… कसं अगदी काव्यात्मक वाटतै ना?”

“होय रे, म्हणूनच ‘नैना’शिवाय गाणं लिहिलंच जैना!” मी तेवढ्यातल्या तेवढ्यात तारे तोडले.

“आता पुढचा शब्द बघ - रात्र! ओळी अशा लिहिल्या असणार -
‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो पावसाळी रात्र…’
आता या ‘रात्री’ला यमक काय जुळवायचं - मात्र की पात्र?”

“हा हा हा… ते ‘पात्र’ भारी बसंल बरं का त्यात -
‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो पावसाळी रात्र
कितना रडवेला है वो भारत भूषण का पात्र…’”

“गप रे, कशालाही काहीही जोडतोयस तू. तर, ते ‘रात्र’ त्रास देऊ लागल्यावर तिथं आलं ‘रात’. आता बघ जादू - रात, बात, मात, मुलाकात, जजबात… कसलं फिल्मी झालं ना एकदम?”

“हं, बरोबर!” मी मनातल्या मनात पुढची यमकं जुळवत म्हणालो.

“आणि हृदयावर तर काही बोलायलाच नको. त्याचं तर एकदम ‘दिल’ करून टाकलं आणि गाणी अशी टपा-टपा टपा-टपा पडायला लागली गारांसारखी. मी सांगतो, हा ‘हृदय’ शब्द कुठल्याच यमकात, कुठल्याच सुरात बसत नसल्यानं हजारो प्रतिभाशाली कवींची कारकीर्द अकाली खुंटून संपली असावी…”

“...तुझ्यासारखी!” मी उगाच चेहरा पाडून म्हणालो. त्यानं ते खरंच मनावर घेतलं. त्याचा चेहराही पडला.

“हो ना, किती कष्टानं, रात्री जागून कविता करायच्या. आणि भाषेच्या मर्यादेमुळं आमची प्रतिभा पाण्यात जायची.”

“हं,” मी त्याचं सांत्वन करत म्हणालो, “आता एखादी दुःखाची वेदना पोचवेल अशी कविता करून ऐकव शिखाला.”

“मी पण तोच विचार करतोय. पण आत्ता कविताच सुचत नाहीये. कालच संदीप सरांची एक कविता वाचली. तीच द्यावी म्हणतोय माझ्या सुंदर हस्ताक्षरात लिहून…”

मला परत तोच सीन आठवला. शिखाच्या गाडीवरून दोघं झेड ब्रीजवर जाणार; तो आपल्या खिशातून कवितेचा कागद काढून तिच्या हातात देणार; ती लाजत, हसून तो कागद घेणार; त्यावरच्या 'सुंदर' हस्ताक्षरातल्या काही अगम्य ओळी वाचणार; आणि मग…

“कुठली रे, कुठली कविता?” मी मुद्दाम विचारलं.

त्याला पुन्हा स्फुरण चढलं. जरा आठवल्यासारखं करून त्यानं कविता म्हणायला सुरुवात केली -
“हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळकन्”

मगाचच्या सीनमध्ये मी ह्या ओळी बसवून खो-खो हसत सुटलो. त्याचा चेहरा कावरा-बावरा झाला. हे ‘अती’ होतंय हे लक्षात आल्यानं मी हसू आवरलं. खिशातून डायरी-पेन काढलं. चार ओळी खरडल्या. कागद फाडून त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, “हे तिला समजेल अशा भाषेत लिहिलंय. तुझ्या भावना पुरेपूर पोचतील असा प्रयत्न केलाय. मी निघतो आता. मी गेल्यावर वाच आणि काय झालं ते नक्की सांगायला ये…” बोलत बोलतच मी निघालो. अजून एक क्षणही हसू दाबून ठेवणं अशक्य होतं, म्हणून.

डायरीतल्या पानावर लिहून दिलेल्या ओळी होत्या -
“दिल फेका -
तूने पकड़ा,
तूने छोड़ा -
हुआ टुकडा.”


- मंदार शिंदे
(‘जत्रा’ जुलै-ऑक्टोबर २०१४)
९८२२४०१२४६Share/Bookmark

No comments:

Post a Comment