‘धडक 2’ का बघायचा?
“जेव्हा अन्याय हाच कायदा बनतो, तेव्हा विरोध करणं हे कर्तव्य बनतं,” ही या सिनेमाची सुरुवात आहे.
“ज्यांच्यासोबत आज अन्याय होत नाही, त्यांना जगात आता कुणासोबतच अन्याय होत नाही असं वाटू शकतं,” ही या सिनेमाची थीम आहे.
“तुम्हाला स्वतःची ओळख सांगायची लाज वाटत असेल, तर तुमच्यावर कुणीही सत्ता गाजवू शकतं.” ही या सिनेमानं सांगितलेली वस्तुस्थिती आहे.
“आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीसाठी आपल्याला लढायला लागतं; लढायची तयारी असलेल्या प्रत्येकाला ती गोष्ट सापडलेली असेलच असं मात्र नाही,” हे या सिनेमानं घातलेलं कोडं आहे.
“तुम्ही जन्माला आलात त्याच दिवशी तुम्ही पॉलिटिक्सचा भाग झालात, त्यामुळं ‘मला पॉलिटिक्समध्ये पडायचं नाही’ असं तुम्ही म्हणू शकत नाही,” हे या सिनेमानं पुन्हा सांगितलेलं जुनं सत्य आहे.
“लढायचं की मरायचं अशी परिस्थिती निर्माण झाली, तर लढायचं,” ही या सिनेमाची शिकवण आहे.
“आज आम्ही दुबळे असू, पण उद्या राज्य आमचं असेल,” हा या सिनेमातून मिळणारा आशावाद आहे.
समाजाला आरसा दाखवायचा मक्ता ‘आर्ट फिल्म्स’नी घेतलेला नाही; ‘मेनस्ट्रीम फिल्म्स’सुद्धा समाजाच्या सोवळ्या वस्त्राला हात घालायचं धाडस करू शकतात, हे या सिनेमानं घालून दिलेलं उदाहरण आहे.
सिनेमाच्या माध्यमातून ‘इतिहास’ शिकवायचा आणि बदलायचा प्रयत्न केला जाण्याच्या काळात, सिनेमाच्या माध्यमातून ‘समाजशास्त्र’ शिकायची संधी मिळते आहे, ती सोडू नका.
‘आत्मपॅम्प्लेट’, ‘भाऊ-बळी’, ‘तिचं शहर होणं’, हे अलीकडचे सिनेमे बघितले नसतील तर तेपण बघा…
पण सध्यातरी, तुमच्या वयाच्या पार्टनरसोबत, वयात येणाऱ्या मुला-मुलींसोबत, वय निघून गेलेल्या आई-बाप-आत्या-मावशी-काका-मामा यांच्यासोबत जाऊन ‘धडक 2’ बघा.
आणि हो.. काही दिवसांपूर्वी.. काही दलित मुलींची.. पुणे पोलिसांविरुद्धची.. जातीय हिंसेची तक्रार खोटी आहे असं वाटणाऱ्यांना हा सिनेमा बघवणार नाही; त्यांच्याबद्दल दोन मिनिटं शांतता पाळूया…
जय हिंद, जय भीम!

No comments:
Post a Comment