ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, July 15, 2011

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

दुःखाला आधार नको का? तेहि कधीतरी येते
दोस्त होऊनी हातच माझा अपुल्या हाती घेते,
जो जो येईल त्याचे स्वागत, दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे,
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळूवार
हात होतसे वाद्य : सुरांचे पाझरती झंकार,
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...

- कवी मंगेश पाडगांवकर





Share/Bookmark

Thursday, July 7, 2011

लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई

(३ जुलै २०११ च्या ‘संडे टाइम्स ऑफ इंडिया’ मधील स्वामीनाथन अय्यर यांच्या लेखावर आधारित)

- २००४-०५ मधे ४२ टक्के असणारं वर्कर पार्टिसिपेशन (म्हणजे कामगारांचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण) २००९-१० मध्ये ३९.२ टक्क्यांपर्यंत घसरलं. म्हणजेच, शंभर लोकांपैकी ४२ लोक काम करत होते, ते आता ३९ वर आले.
- देशाचा विकास ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणजे रोजगाराच्या संधी न वाढताच होतोय, अशी काही लोकांची तक्रार आहे.
- सरकारी अधिकार्‍यांचं म्हणणं आहे की बेरोजगारीचं प्रमाण २.३ टक्क्यांवरुन २ टक्क्यांवर आलंय. म्हणजेच ०.३ टक्के अधिक रोजगार निर्माण झालेत.
- वस्तुस्थिती अशी आहे की, काम करायची इच्छा असणार्‍या लोकांचीच संख्या कमी होत चाललीय.
कमतरता नोकर्‍यांची नसून कर्मचार्‍यांची आहे, विशेषतः महिला कर्मचार्‍यांची.
- वेगवान विकासामुळं रोजगाराच्या संधीही खूप वाढल्यात. पण सर्वत्र लेबर शॉर्टेज अर्थात कामगार टंचाई आहेच.
- रोजगाराविना विकास = अतिरिक्त कामगार = कमी मजुरी.
पण, कामगारांविना विकास = वाढती मजुरी.
म्हणजे काय?
जर आपल्या विकासामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत असं मानलं तर, भरपूर कामगार बेरोजगार दिसले असते. म्हणजेच, कामगारांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यानं (डिमांड-सप्लाय रिलेशन), कमी मजुरीत जास्त कामगार उपलब्ध व्हायला हवेत.
प्रत्यक्षात, मजुरीचे दर वेगानं वाढलेले दिसून येतात. डिमांड-सप्लाय रिलेशननुसार, विकासाच्या वाढत्या वेगाबरोबर वाढत जाणार्‍या कामगारांच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यानं मजुरीचे दर वाढत चाललेत.
म्हणजेच, रोजगाराच्या संधी वाढतायत, पण कामगार उपलब्ध होत नाहीत. यापैकी मोठी घट आहे महिला कामगारांच्या संख्येत. कशामुळं?
- तरुण वर्गातल्या स्त्रिया नोकरीकडून उच्च शिक्षणाकडं वळतायत.
काम करण्याचं वय सर्वसाधारणपणे १५ ते ६० वर्षे मानलं जातं.
उच्च शिक्षण घेणार्‍यांचं प्रमाण वाढल्यानं १५ ते २५ वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. यामुळं आपल्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’लाही धक्का बसतोय.
- कुटुंबाचं उत्पन्न आणि मुलींचं शिक्षण यांत सुधारणा होऊ लागली की, सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली बायकांना घरी बसवायचं प्रमाण वाढतं.
- गेल्या काही वर्षांत महिला कर्मचार्‍यांची संख्या जवळपास साडे तीन कोटींनी कमी झालीय. कशामुळं?
- गरीब निरक्षर लोकसंख्येत ‘वर्कर पार्टिसिपेशन’ जास्त आढळतं.
कारण? कामाशिवाय बसून राहणं त्यांना परवडतच नाही. त्यामुळं कुटुंबातील स्त्री-पुरुष दोघंही काम करतात.
- उत्पन्न वाढू लागलं की वर्क पार्टिसिपेशन कमी होऊ लागतं, विशेषतः स्त्रियांचं.
- कुटुंबामध्ये एकापेक्षा दोघांचं उत्पन्न येणं कधीही चांगलं. दोघंही कमावते असणं जास्त फायदेशीर.
पण समाजामध्ये, खास करुन मध्यमवर्गीयांमध्ये, ज्या घरातल्या स्त्रिया नोकरी करत नाहीत (किंवा करावी लागत नाही), त्या कुटुंबांना जास्त प्रतिष्ठा मिळते. त्यांचं सोशल स्टेटस चांगलं आहे असं म्हटलं जातं.
- गरजेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलं की, बायकांनी नोकरी करायची गरज नाही असं ठरवून त्यांना घरी बसवलं जातं. थोडक्यात, स्त्रियांनी नोकरी करुन जे जास्तीचे (पोटेन्शियल) पैसे मिळाले असते, त्याच्या बदल्यात सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा विकत घेतली जाते.
- आणखी एक मुद्दा म्हणजे, अशिक्षित स्त्रिया कुठल्याही कामाला तयार असतात.
याउलट, सुशिक्षित स्त्रियांची अपेक्षा असते स्टेटसनुसार चांगला जॉब मिळण्याची. असे सिलेक्टीव्ह जॉब सर्वत्र उपलब्ध असतीलच असं नाही.
- एकंदरीत, कामगार टंचाई, विशेषतः स्त्री कामगार टंचाईवर मात करण्यासाठी गरज आहे सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची. चेंज इन सोशल अॅटीट्यूड!
- स्त्रीचं करीयर - पुरुषाचं करीयर, किंवा नोकरीची व उत्पन्नाची ‘गरज’ यांतला स्त्री-पुरुष भेदभाव कमी झाल्यास, आणि
स्त्रियांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणांची सुधारणा केल्यास,
लेबर शॉर्टेज किंवा कामगार टंचाई निश्चितच कमी होऊ शकेल.



Share/Bookmark

Wednesday, July 6, 2011

शब्द

जे मनात माझ्या होते,
शब्दांतून व्यक्त ते झाले,
तू मनात या शिरताना,
ते शब्दही परके झाले...

Share/Bookmark

तरिही वसंत फुलतो

<-- Sudheer Moghe -->
प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

जे वाटती अतूट, जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे,
ऋतु कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

<-- Mandar Shinde -->
भासे जरि उदास, आयुष्य हे सुंदर असते,
नजरे-नजरे मधले, हे फसवे अंतर असते,
आयुष्या वीटलो म्हणुनी, मृत्यु का सखा भासतो,
तरिही वसंत फुलतो, तरिही वसंत फुलतो

Share/Bookmark

Monday, June 20, 2011

प्रवास

आठवतो मला सखे तुझा सहवास
धुंद करणारा तुझ्या आठवांचा भास,
सोबती तू येता मग मला असे वाटे
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

तुझ्याच कुशीत होई मन शांत माझे
तुझ्याच श्वासात हरवती श्वास माझे,
थांबू नये कधी श्वासांची चढाओढ
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

तुझ्याच डोळ्यांना ठावे माझे सारे भाव
माझ्या आसवांना ठावे फक्त तुझा गाव,
तुझ्या-माझ्या डोळ्यांत हा चाले लपंडाव
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

घेऊन गेलीस सखे पाखरांची गाणी
माझ्याकडे काय, फक्त तुझ्या आठवणी,
रचतो त्या आठवांची गाणी आता खास
संपू नये कधी असा देखणा प्रवास...

- अक्षर्मन
९८२२४०१२४६


Share/Bookmark

यूँ लगता है...

यूँ लगता है तुम, मेरे ही आस-पास हो
यूँ लगता है यह, अब आखरी पडाव हो,
यूँ लगता है अब, सच सारे सपने हो, जब-
पलमें छुप जाती हो, पलमें दिख जाती हो...

Share/Bookmark

Wednesday, June 15, 2011

कृष्णावतार

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
स्वार्थी दुनियेच्या गोंगाटात -
मधुर पाव्याचा सूर बरसला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
एकटेपणाच्या शापाला माझ्या -
रास-लीलेचा उःशाप मिळाला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता,
मोक्षाची याचना करता करता -
जगण्यातला आनंद अनुभवला होता...

माझ्यासाठीही कधी कृष्ण अवतरला होता...

Share/Bookmark