ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, June 8, 2014

काय शिकवायचं आणि काय नाही?

लहानपणापासून, रामानं रावणाला मारलं, पांडवांनी कौरवांना संपवलं, शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अशा हिंसक गोष्टी संदर्भहीन पद्धतीनं शिकवल्यावर, मोठेपणी गांधीजींचं अहिंसेचं तत्वज्ञान पटण्याची अपेक्षा कशी करता येईल? सुष्ट कोण आणि दुष्ट कोण हे कसं आणि कुणी ठरवायचं? पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींमधला संदर्भ काढून टाकून, फक्त मारामारी आणि भव्यदिव्य युद्धांवर फोकस करणारी 'ब्रेकिंग न्यूज' स्टाईल शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं नाही का वाटत? युद्धामागची परिस्थिती आणि लॉजिक लक्षात न घेता, प्रत्यक्ष युद्धवर्णनात आपण जास्त रंगून जात नाही ना, याचं भान शिक्षकांनी आणि पालकांनी राखलंच पाहिजे. ज्या धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजव्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथल्या शाळांमधून, धर्मांची शिकवण, क्षत्रियाचा धर्म म्हणून 'वध' माफ, मुसलमान 'परके' म्हणून त्यांची कत्तल, अमूक या धर्मातला मोठा नेता, तमूक त्या जातीचा तारणहार, अशा कन्फ्युजिंग आणि मिसलीडिंग गोष्टी वेचून काढून टाकल्या पाहिजेत. आडनावावरुन जात ओळखायचा खेळ आपल्या पिढीपासून तरी बंद केला पाहिजे. शाळा-कॉलेजच्या वर्षांमधे मुलांना कोणत्याही अर्जावर जात-धर्म लिहिण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. संदर्भहीन इतिहास शिकवण्यापेक्षा, वर्तमान आणि भविष्यात उपयोगी पडेल असं सामाजिक भान - सिव्हिक सेन्स, सहिष्णुता, आपण करत असलेल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, अनुकंपा - कम्पॅशन, कला-क्रीडा-विचारांनी आयुष्य समृद्ध बनवण्याचं कौशल्य, अशा कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. फुटकळ अस्मितांमधे गुरफटून जाण्याऐवजी, 'आपल्या' देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या व त्यायोगे उपभोगायला मिळणारं स्वातंत्र्य नि अधिकार जाणून घेणं मुलांसाठी जास्त महत्त्वाचं नाही का? हे सगळं पटत असेल तर, सरकारनं सिलॅबस बदलावा - शाळेनं शिक्षक बदलावेत, वगैरे शेळ्या न हाकता, तुम्ही काय कराल, हे उंटावरुन खाली उतरुन सांगा. मी स्वतः तर करतोच आहे, तुम्हालाही काही करावंसं वाटलं तर या. खूप हातांची आणि डोक्यांची गरज आहे इथं. शेवटी प्रश्न नवी पिढी घडवण्याचा आहे ना!


Share/Bookmark

Thursday, June 5, 2014

जात आणि शास्त्रप्रामाण्य

"जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा. म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून


Share/Bookmark

Tuesday, June 3, 2014

माणूस गेला की...

माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की...
मग कसला जय नि कसला पराजय.
कसलं राजकारण, कसली निवडणूक.
कसली सत्ता, कसलं पद.
कसले मनसुबे, कसले डावपेच.
माणूस आहे तोपर्यंत सगळं आहे.
माणूस गेला की संपलं सगळं!

Share/Bookmark

Monday, June 2, 2014

कलंदरी

दंगलीच्या अफवा, दहशतीचं वातावरण, व्यक्तिगत नि व्यावसायिक नुकसानीतून होणारी चिडचिड... या सगळ्यावर उतारा म्हणजे कालची उषाकुमारींची गझल मैफल - कलंदरी. उषाकुमारींच्या स्वरचित मराठी गझलांचं शास्त्रीय संगीतावर आधारीत सादरीकरण. पुण्यातल्या उद्यान प्रसाद हॉलमधे. उषाकुमारी रचित माझ्या या आवडत्या रुबाईशिवाय निवेदन पूर्ण कसं झालं असतं...

कायमचे धडधडणारे मन शांत करावे क्षणभर कोणी
जहरामधले जहरीलेपण कमी करावे क्षणभर कोणी
एक एक एकटेपणाच्या लाटा मजवर करीती हल्ला
चंद्रकिनारी चंद्रकमानीमधून यावे क्षणभर कोणी

Share/Bookmark

धर्म आणि जात

धर्म आणि जात या कृत्रिम गोष्टींनी माणसाचं पार माकड करुन टाकलंय. किती शिकण्यासारखं आहे जगात. किती फिरण्यासारखं आहे. केवढी पुस्तकं आहेत वाचलीच पाहिजेत अशी. किती सिनेमे आहेत बघितलेच पाहिजेत असे. किती गाणी आहेत गुणगुणावीतच अशी. केवढी माणसं आहेत भेटलीच पाहिजेत अशी. आणि माणूस काय करतोय तर, माझा धर्म श्रेष्ठ का तुझा, माझी जात वरची का तुझी... कशी संपवायची ही जात? कसं सोडवायचं माणसाला धर्माच्या कचाट्यातून? मला जे सुचतंय ते मी करतोयच. तुम्हीही विचार करा आणि सांगा अजून काय करता येईल...


Share/Bookmark

Sunday, June 1, 2014

दुकान बंद

दुकानासाठी सामान खरेदी करत लक्ष्मी रोडवरुन कोथरुडकडं येत होतो.
दुकानातून फोन आला, कोथरुडला कसलीतरी दंगल झालीय, सगळी दुकानं बंद करायला लावलीत.
कोथरुडात येईपर्यंत तरी काही वेगळं जाणवत नव्हतं.
करिश्मा सोसायटीपासून मात्र  दुकानं बंद-बंद दिसू लागली.
पुढच्या चौकातल्या पुतळ्याकडं लक्ष गेलं. दंगल म्हटलं की पुतळा आठवलाच पाहिजे ना.
नाही नाही, शिवाजी महाराजांचा नव्हता! महर्षी कर्वेंचा पुतळा.
याची कोण काय विटंबना करणार? आणि केलीच तर त्यासाठी कोण दंगा करणार?
पुढच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं पण नीट बघितलं.
पुतळा ठीक होता, पण खाली खूप माणसं जमली होती.
भगवे झेंडे घेतलेली, भगवे नाम ओढलेली तरुण माणसं.
शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर गंभीर चेहर्‍यानं गर्दी करुन उभी होती.
पुढं-पुढं सगळीच दुकानं बंद दिसत होती.
दुकानात आलो. शटर उघडलं. काम चालू केलं.
शेजारुन माहिती मिळाली - काल रात्री कुणीतरी कुठंतरी शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची विटंबना केली म्हणे. त्यामुळं कोथरुडात पण दंगा झाला. मुसलमानांची दुकानं-बिकानं फोडली म्हणे.
आमचं दुकान सोडून बाकी सगळी दुकानं बंद होती. कस्टमर येत होते.
थोड्या वेळानं आठ-दहा बाईक्सवरुन वीस-पंचवीस पोरं आरडाओरडा करत, घोषणा देत निघून गेली.
त्यामागोमाग तीन-चार गाड्यांवरुन काही टगे आले.
बंद कर रे शटर, कळत नाय का सगळं बंद आहे. चल रे, बंद कर दुकान, बंद कर!
फुल्ल आरडाओरडा, दमदाटी.
चेहर्‍यावर भाव काहीतरी महान देशकार्य करतोय असे. इतर वेळी चेहर्‍यावरची माशीपण उडणार नाही, पण आत्ता माज, मग्रूरी अगदी ओसंडून वाहतीय.
बंद केलं शटर... थोड्या वेळासाठी.
आणखी काय करता येईल?


Share/Bookmark

Saturday, May 31, 2014

सत्पात्री दान

दुकानात एक वयस्कर बाई आल्या. आमचं हिंदुराष्ट्राला वाहिलेलं एक पाक्षिक की साप्ताहिक काहीतरी आहे म्हणाल्या. तुमच्या दुकानाची त्यात जाहिरात द्या म्हणाल्या. मी विचारलं, तुम्ही काय छापता त्यात? त्या म्हणाल्या, हिंदु संस्कृतीचं रक्षण, हिंदु बांधवांची जागृती, आपल्या धर्माच्या ख-या परंपरांचा प्रसार, इतर धर्मियांची कारस्थानं, वगैरे वगैरे. मी नम्रपणे म्हणालो, सॉरी! मी तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही. यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे. मग देणगी द्या. समर्थ हिंदुराष्ट्रासाठी हे सत्पात्री दान करा. तुम्हाला हजार पटीत फायदा होईल. एक रुपया दिलात तर तुम्हाला हजार मिळतील. मी पुन्हा म्हटलं, सॉरी! ही आमची व्यवसायाची जागा आहे. इथं आम्ही कसलंही दान, देणगी, वर्गणी देत नाही. बाई ऐकेचनात. म्हणाल्या, ठीक आहे. पैसे नका देऊ. आमच्या पन्नास-शंभर लोकांना चहा-नाष्टा स्वरुपात तरी सत्पात्री दान द्या. मी म्हटलं, हे चालेल. पण आम्ही चहा-नाष्टा नाही बनवत. चिकन-मटण बिर्याणी, पापलेट, सुरमई... माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाई अशक्य वेगानं पाय-या उतरून चक्क पळून गेल्या!


Share/Bookmark