ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, November 30, 2015

शिक्षणाच्या आयचा घो

एका फारच नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधे काही कामासाठी गेलो होतो. प्रचंड डोनेशन आणि अफाट फी घेणारं हे इंटरनॅशनल लेव्हलचं कॉलेज. तिथल्या एका सिनियर पोस्टवरच्या व्यक्तिनं मला सहज पुरवलेली माहिती - (माझी त्या व्यक्तीशी कोणतीही पर्सनल ओळख नसताना व आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत असताना ही माहिती दिली याचा अर्थ त्या व्यक्तीला मनापासून हेच वाटत असणार...)

"यू नो सर, धिस कॉलेज ओन्ली फॉर बिग फॅमिली स्टुडंट्स..." (ही व्यक्ती बाकी सगळ्यांशी मराठीत बोलत होती, पण माझ्याशी बोलताना मात्र दर वाक्याला इंग्रजीचा मुडदा का पाडत होती कोण जाणे!) "ओन्ली रिच चिल्ड्रन्स लर्न हियर सर. ऑल आर कमिंग फ्रॉम आऊट ऑफ स्टेट, नो महाराष्ट्रा स्टुडंट. बिकॉज ऑफ टू थिंग, सर. वन इज बिग फी. महाराष्ट्रा स्टुडंट डोण्ट अफॉर्ड धिस बिग फी, सर. ॲन्ड सेकंड इज दॅट दे डोण्ट सूट द कोर्स, सर. धिस मॅनेजमेंट कोर्स, सर. महाराष्ट्रा स्टुडंट ॲन्ड फॅमिली थिंक ट्रॅडिशनल, सर. ट्रॅडिशनल पिपल्स डू आर्ट, सायन्स, कॉमर्स, सर. धिस ऑल रिच पिपल्स फ्रॉम नॉन-महाराष्ट्रा डू मॅनेजमेंट, सर. बट यू नो सर, दे आर ऑल लाईक 'अमीर बाप की बिगडी औलाद'. दे डोण्ट हॅव मनी व्हॅल्यू, सर..." आणखी बरंच काही.

एका फॉर्मल मीटिंगमधे, आपल्याच कॉलेजात बसून ही सिनियर व्यक्ती अशा दिव्य भाषेत आपला कॉलेजबद्दलचा दिव्य दृष्टीकोन मला सांगत होती. आणि अशा कॉलेजमधे आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून आई-बाप प्राण पणाला लावतात. (ॲक्चुअली पैसे पणाला लावतात, पण पैसे हाच त्यांचा प्राण असल्यानं...)

मोराल ऑफ द स्टोरी काय, तर कॉलेजमधे ॲडमिशन तिथल्या शिक्षकांचा ॲटिट्यूड बघून नव्हे, तर कॉलेजच्या ब्रॅन्डकडं बघून घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं त्यांना अशा निगेटीव्ह माइंडसेटच्या अगाध 'शिक्षकां'सोबत काढावी लागतात. आणि मग हीच मुलं पुढं जाऊन मॅनेजर, शिक्षक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-बाप होतात. तुम्ही बाभळीचं रोप लावून गुलाब फुलायची अपेक्षा करु शकत नाही, मग या अशा शाळा-कॉलेजांत मुलांना का पाठवता, याचा विचार केलाय का कधी?


Share/Bookmark

Tuesday, October 27, 2015

मसाला दुधाची आठवण

चिंचवड स्टेशनजवळ रहायला होतो तेव्हाची गोष्ट. चाकणवरुन रात्री दहा वाजता सेकंड शिफ्ट सुटली की अकरा वाजेपर्यंत चिंचवडच्या रुमवर पोचायला हरकत नव्हती. पण कंपनीतनं थेट रुमवर आलो असं फार क्वचित व्हायचं. अरुणची ट्रॅक्स क्रूझर गाडी पिक-अप ड्रॉपसाठी असायची. नाशिक फाट्यावरुन वळण्यासाठी गाडीला दोन ऑप्शन असायचे - एक तर डावीकडं वळून बोपोडीपर्यंत ड्रॉप करुन मग पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे, किंवा उजवीकडं वळून पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे करुन शेवटी बोपोडी. या दोन्ही ऑप्शनमधे चिंचवड सगळ्यात शेवटी यायचं कारण नव्हतं. पण बोपोडी - पिंपरी - निगडी आणि शेवटी चिंचवड असा अरुणचा स्पेशल रुट होता. कधी कधी तर पिंपरी - निगडी - बोपोडी आणि मग पुन्हा चिंचवड असा द्राविडी प्राणायामसुद्धा करायचा. यामागं एक विशेष कारण होतं - मसाला दूध.

चिंचवडच्या चापेकर चौकात तेव्हा आतासारखा उड्डाणपूल नव्हता. चापेकरांच्या पुतळ्यासमोर मसाला दुधाची एक गाडी लागायची. रात्री खूप उशिरापर्यंत तिथं दूध प्यायला गर्दी असायची. एका मोठ्ठ्या काळ्या कढईत दूध आटवत ठेवलेलं असायचं. ग्लासभर गरम गरम मसाला दूध पिऊन ढेकर दिल्याशिवाय दिवस संपला असं वाटायचंच नाही. त्यामुळं निगडी - बोपोडी दोन्ही टोकांचे ड्रॉप संपवून आम्ही रात्री उशिरा मसाला दूध प्यायला खास चिंचवडला यायचो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचं अप्रूप मात्र आमच्या या नेहमीच्या दुग्धप्राशनामुळं पूर्ण संपलं होतं. (नेहमीच्या म्हणजे नक्की कधी ते पुढं सांगेन. सात्विक विचाराच्या वाचकांनी इथपर्यंतच वाचावं, ही नम्र विनंती!)

तर आम्ही नेहमी मसाला दूध प्यायला चिंचवडच्या चापेकर चौकात जायचो. नेहमी म्हणजे ज्या दिवशी दारु प्यायला गेलो नाही त्या दिवशी! ते उलट-सुलट रुट मारुन शेवटी चिंचवडला येण्यामागचं खरं मोटीव्हेशन होतं - कामिनी बार. हा रात्री उशिरापर्यंत चालू असायचा. उशिरा म्हणजे खरंच रात्री बारा-साडेबारा-एक वगैरे, मसाला दुधाच्या गाडीपेक्षासुद्धा उशिरा. इथं आम्ही फक्त प्यायचो आणि बोलायचो. बाकी डायव्हर्जन कसलंच नाही. कारण इथं स्टार्टर-मेनकोर्स-डेझर्ट वगैरेसारखे डिस्टर्बन्स नव्हते. हा प्युअर बार होता. शेजारी त्यांचंच प्युअर व्हेज फ्यामिली गार्डन रेस्टॉरंट होतं. खाणारे सगळे तिकडं. इथं डाळ-शेंगदाणे सोडले तर बाकी फक्त बीयरचा महापूर. तेव्हा अजून ब्रँड वगैरे ठरायचा होता. कधी कॅनॉन, कधी किंगफिशर, कधी झिंगारो, कधी खजुराहो... कधी कधी तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत तीन-चार ब्रँड बदललेले असायचे, कळत-नकळत.

काही विशेष कारण नव्हतं रोज प्यायचं. कसलं दुःख आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, असा कुठलाच बहाणा नाही. स्वच्छ मनानं, आत्ता प्यावीशी वाटते म्हणून, प्यायचो. आणि बोलायचो खूप. तेव्हा जग फार बघून झालं नव्हतं. फार मोठं अनुभवांचं गाठोडंही पाठीशी नव्हतं (आताही आहे असं काही म्हणणं नाही). पण बोलायला आणि ऐकायला खूप आवडायचं (जे आताही आवडतं). मग त्यासाठी ही आयडीयल जागा होती.

'चश्मेबद्दूर' पिक्चरमधे फारुख शेख आणि दिप्ती नवल एका गार्डनमधल्या ओपन रेस्टॉरंटमधे बसलेले असतात. (हे खरंखुरं गार्डनमधलं रेस्टॉरंट असतं, टेबलाभोवती कुंड्या ठेवलेलं पहिल्या मजल्यावरचं गार्डन रेस्टॉरंट नाही.) ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला ते विचारतात, "यहां अच्छा क्या है?" वेटर शांतपणे उत्तर देतो, "जी यहां का माहौल बहुत अच्छा है!"

तर अशा माहौलसाठी जवळपास रोज जाऊन बसायचो. खूप बोलायचो, ऐकायचो, प्यायचो, मझा होती. (टीपः मजा वेगळी, मज्जा वेगळी, आणि मझा वेगळी. ह्यांतला फरक सांगून कळत नाही, अनुभवावा लागतो.) नंतर रहायच्या जागा बदलत गेल्या, 'बसायच्या' जागाही बदलत गेल्या, पार्टनर बदलत गेले, विषय बदलत गेले, पण संवादाची आवड मात्र तेवढीच राहिली, किंबहुना वाढत गेली.

कोजागिरी आली की लोक मसाला दुधावर बोलतात. आमच्या दुधाच्या आठवणीदेखील शेवटी दारुवर जाऊन थांबतात...

स्थितप्रज्ञ आम्ही, अम्हाला नसावी
प्रतिक्षा गटारी नि कोजागिरीची
दवा द्या की दारु, सुखानेच मारु
मझा त्याची तुम्हा न कळायाची


Share/Bookmark

Sunday, October 25, 2015

केतकी गुलाब जूही...

शंकर-जयकिशनपैकी शंकर हे मन्ना डे यांचे मोठे चाहते होते. मुकेशना राज कपूर यांचा आवाज मानला जाण्याच्या काळात शंकर-जयकिशननी राज कपूरची 'आ जा सनम मधुर चाँदनी में हम...' आणि 'ये रात भीगी भीगी, ये मस्त फिजाएँ...' अशी गाणी मन्ना डे यांच्याकडून गाऊन घेतली. १९५६ सालच्या 'बसंत बहार'मधे मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याबरोबर मन्ना डे यांनाही एसजेंनी गाणी दिली. एकूण नऊ-दहा गाण्यांच्या जागा होत्या. एका गाण्यासाठी शंकरनी मन्नादांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, "या सिनेमात तुम्हाला एक ड्युएट गायचं आहे."

मन्नादा म्हणाले, "अरे वा! कुणाबरोबर? लता, आशा...?"

शंकर म्हणाले, "नाही नाही, हे जरा वेगळ्या पद्धतीचं क्लासिकल ड्युएट आहे. सिनेमातल्या एका कॉम्पिटीशनसाठीचं हे गाणं आहे. तुम्ही हिरोसाठी गाणार आहात आणि हिरो कॉम्पिटीशन जिंकणार आहे."

"बरं, समोर कोण गाणार आहे?" मन्नादांनी विचारलं.

शंकर उत्तरले, "भीमसेन जोशी."

मन्नादा तिथून चक्क पळून गेले. घरी गेल्यावर बायकोला म्हणाले,

"शंकर पागल झालेत. माझं आणि भीमसेन जोशींचं ड्युएट रेकॉर्ड करायचं म्हणतायत."

"मग करा की..." बायको म्हणाली.

"करा की काय? हे कॉम्पिटीशनचं गाणं आहे. कॉम्पिटीशन हिरो जिंकणार आहे आणि शंकर म्हणतायत की या क्लासिकल ड्युएटमधे मी हिरोसाठी गायचं आणि भीमसेन जोशींना हरवायचं! मला नाही जमणार बुवा..."

मन्नादांच्या बायकोनं त्यांची समजूत काढली, "हे बघा, गाण्याची सिच्युएशन आधीपासून तयार आहे. हिरोनं जिंकायचं असेल तर शंकर-जयकिशन तशाच पद्धतीनं गाणं बांधतील ना. शिवाय भीमसेनजी खूप मोठे कलाकार आहेत. ते सिच्युएशन समजून घेऊन थोडं कमी गातील, तुम्ही थोडी मेहनत करुन जास्त गा, म्हणजे होऊन जाईल..."

होय-नाही करत शेवटी मन्नादा तयार झाले आणि 'केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले' हे गाणं रेकॉर्ड झालं. मन्नादा व्हर्सटाईल सिंगर असले तरी त्यांनी शास्त्रीय संगीताचं कसलंही फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नव्हतं. 'केतकी गुलाब जूही'च्या रेकॉर्डिंगनंतर भीमसेन जोशी मन्नादांना म्हणाले, "तुम्ही क्लासिकल गात जा, चांगले गाता!" पण क्लासिकलसाठी करावा लागणार रियाज आणि मेहनत मन्नादांना अवघड वाटत असल्यानं ते फारसे त्या प्रकाराकडं वळले नाहीत.

पुढं एकदा एका मुलाखतीत मन्नादा म्हणाले होते, "ही फिल्म इंडस्ट्री फारच अजब चीज आहे. इथं मला किशोरकडून 'इक चतुर नार' (पडोसन) गाण्यात हरावं लागलं आणि इथंच भीमसेनजींना 'केतकी गुलाब जूही'मधे माझ्यासारख्याकडून हरावं लागलं..."


Share/Bookmark

Saturday, October 24, 2015

तिच्याविना...

का भास तिचा होई मना, रोज रोज पुन्हा पुन्हा
अडखळतो - सावरतो, रोज रोज पुन्हा पुन्हा

ना पटले जरी सत्य हे, सांगितले मी तिला
हा श्वास चाले बघुनी तुला, रोज रोज पुन्हा पुन्हा

ती येऊनी प्रत्यक्ष कधी जागविते चेतना
अन्‌ त्रास देती आठवणी मग रोज रोज पुन्हा पुन्हा

ती असता जग सुंदर, ती नसता भेसूर का
जग बदलते हे असे कसे, रोज रोज पुन्हा पुन्हा

हे जगणे ना संभव अता, तिच्याविना तिच्याविना
हे झुरणे घेई प्राण अता, रोज रोज पुन्हा पुन्हा

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, September 26, 2015

पाळी मिळी गुपचिळी - डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख

मॅन्युफॅक्चरींग आणि आयटी इंडस्ट्रीत काम करताना या विषयावर सार्वजनिक चर्चेचे प्रसंग फारसे यायचे नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातदेखील हा प्रश्न कधी जाणवला नाही. पुरुषप्रधान (की पुरुषकेंद्रीत?) समाजव्यवस्थेतल्या पुरुष मित्रांच्या गप्पांमधे "अरेरे, आता चार दिवस उपवास!" एवढाच काय तो या गोष्टीचा उल्लेख. मुली-बायका आपापसांत तरी या विषयावर बोलतात की नाही याबद्दलच शंका, मग मित्र-मैत्रिणींमधे यावर चर्चा कुठून होणार... खाद्यपदार्थांच्या उद्योगात आल्यावर मात्र अनपेक्षितपणे या प्रश्नाला तोंड द्यावं लागलं. आपलं प्रॉडक्ट भारी असलं पाहिजे, प्रॉडक्टबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे, म्हणजे झालं असं आधी वाटायचं. पण अगदी सुरुवातीलाच एका कस्टमरनं गुगली टाकलेली आठवते. "तुमच्याकडून घेतलेले पदार्थ आम्ही नैवेद्याला ठेवणार आहोत, त्यामुळं त्यादिवशी बनवणा-या बाईचा 'प्रॉब्लेम' नसावा एवढं बघा," असं एका कस्टमर बाईंनी फोनवर सांगितलं. यावर काय उत्तर द्यावं हेच सुचेना. लहानपणापासून ऐकलेल्या - वाचलेल्या महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, र. धों. कर्वे यांच्या गोष्टी आठवल्या. शिक्षण, टेक्नॉलॉजी, पैसा या गोष्टींनी पुढारलेल्या आपल्या प्रगत समाजाची दांभिकता लख्खपणे समोर आली. आपल्याला शाळेत, पुस्तकांतून दिले जाणारे पुरोगामित्वाचे धडे खोटे आहेत, प्रत्यक्षात आपण एका दुतोंडी समाजाचा भाग आहोत, याची लाज वाटली. आता या प्रसंगानंतर बराच काळ लोटलाय. हळूहळू अशी भरपूर सत्यं नागवी होत गेली. प्रत्येक वेळी त्यांना टाळणं शक्य नव्हतं, प्रत्येक वेळी भांडणंदेखील शक्य नव्हतं. आता असे प्रश्न अनपेक्षित नाही वाटत. (होय, आजही काही कस्टमर अशा गोष्टींची 'काळजी घ्यायला' सांगतात. आणि असं सांगणा-यांमधे सत्तरीतल्या आजीबाईंपासून तिशीतल्या वहिनीसाहेबही आहेत, आणि ही 'उदात्त परंपरा' जपणा-यांमधे धुणीभांडी करणा-या बायकांपासून सीएफओ-सीईओ लेव्हलच्या मॅडमदेखील आहेत. पुरुषांचं या विषयातलं ज्ञान आणि इंटरेस्ट तर अजूनच अगाध...) आता यावर न चिडता बोलणंही जमू लागलंय. पण अजूनही अशी माणसं - पुरुष आणि बायका - बघून उद्विग्नता येतेच... हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख. मासिक पाळीविषयी आणि त्याभोवतीच्या प्रथा, समज-गैरसमजांविषयी सर्व स्त्री-पुरुषांनी मुळातूनच वाचावा आणि विचार करावा असा हा लेख -

"पाळी मिळी गुपचिळी"

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.

एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.

खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’

वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’

‘क्ष’

क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.

‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’

‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.

‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.

शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.

ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.

एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.

अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत. 

पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.

का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!

पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!

पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.

‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं

हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.

डॉ. शंतनू अभ्यंकर

वाई, जि. सातारा. पिन ४१२ ८०३.
मो.क्र.९८२२०१०३४९

(मूळ लेख - http://shantanuabhyankar.blogspot.in/2015/09/blog-post_2.html)


Share/Bookmark

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark