ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, September 18, 2012

सांगलीच्या गणेशोत्सवात तरुणाईचे योगदान

सार्वजनिक गणेशोत्सव आणि गणेश मंडळांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार झालेलं नकारात्मक चित्र बदलण्यासाठी आणि उत्सवानिमित्त प्रगट होणारी ऊर्जा विधायक कार्यांकडं वळवण्यासाठी सांगलीची तरुणाई पुढे सरसावली आहे. 'आरंभ फाउंडेशन' या सांगलीतल्या उत्साही व सकारात्मक विचारांच्या युवा संघटनेनं गणेशोत्सवाकडं विधायक आणि विकासात्मक दृष्टीनं पाहण्याचं आवाहन समस्त सांगलीकरांना केलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळं फक्‍त वर्गणी गोळा करतात, मांडव घालून रस्ते अडवतात, आणि मिरवणुकीत दंगा घालतात, असा सरसकट शिक्का सगळ्या मंडळांवर मारला जातो. पण प्रत्यक्षात कित्येक लहान-मोठी मंडळं आपापल्या परीसरात चांगले कार्यक्रम व्हावेत, यासाठी प्रयत्‍न करीत असतात. कित्येकदा चांगले पर्याय, योग्य मार्गदर्शन, आवश्यक निधी व मनुष्यबळ यांच्या अभावामुळं अशा मंडळांचं काम खूपच मर्यादीत राहतं. शिवाय, वाईट व नकारात्मक गोष्टींच्या प्रसिद्धीपुढं छोट्या-छोट्या मंडळांचं काम अज्ञातच राहतं. खरं पाहता, गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे त्या-त्या भागाचे कृतीशील रहिवाशी असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि चांगले पर्याय उपलब्ध करून दिले तर, स्थानिक पातळीवर प्रबोधन आणि विकास साधणं सहज शक्य होईल. याच भावनेतून, 'आरंभ'चे तरुण सांगलीतल्या गणेशमंडळांशी संपर्क साधत आहेत. प्रत्यक्ष भेटून मंडळांच्या कार्याची माहिती घेणं, सर्व प्रकारचं प्रदूषण टाळण्यासाठी करता येणार्‍या उपायांची चर्चा करणं, पारंपारिक व विधायक गणेशोत्सवाबद्दल मंडळांच्या कल्पना जाणून घेणं व अभिनव कल्पना सुचवणं, अशा प्रकारचं काम 'आरंभ' करीत आहे. आतापर्यंत भेटलेल्या मंडळांनी या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला असून, मिरवणुकीशिवाय विसर्जन, डॉल्बीमुक्‍त मिरवणूक, निर्माल्यकुंडांचा वापर, तसंच कार्यक्रम आणि मिरवणुकीतून समाज प्रबोधन या माध्यमातून 'विधायक गणेशोत्सव' साजरा करण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, कार्यकर्तांचा उत्साह व ऊर्जा गणेशोत्सवापुरती मर्यादीत न ठेवता, आपल्या परिसराच्या व शहराच्या विकासासाठी वर्षभर कार्यरत राहण्याचा संकल्पही काही मंडळांनी केला आहे. विधायक कार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीतील सेवाभावी संस्था व प्रशासनाने या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठीही 'आरंभ' प्रयत्‍न करीत आहे. त्यासाठी विविध संस्थांना भेटून त्यांच्या कार्याची माहिती घेतली जात आहे. गणेश मंडळ व अशा संस्थांना एकत्रित आणून चांगल्या उपक्रमांची आखणी करणं, गणेशोत्सवातील कार्यक्रम व मिरवणुकीच्या निमित्तानं एकत्र येणार्‍या सांगलीकरांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणं, हे 'आरंभ'चं उद्दिष्ट आहे. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची आखणी 'आरंभ'च्या युवकांनी केली आहे. आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता -

गणेश मंडळाचे कार्यकर्ते असाल तर, आपल्या मंडळाची 'आरंभ विधायक गणेशोत्सव' उपक्रमात नोंदणी करा;
कोणत्याही सेवाभावी संस्थेशी संबंधित असाल तर, संस्थेच्या कार्याची माहिती 'आरंभ'कडे पाठवा;
मनोरंजक व प्रबोधनपर कार्यक्रम घेत असाल, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवत असाल, देखावे व कार्यक्रमांबद्दल आपल्याकडं काही अभिनव कल्पना असतील तर, आपली माहिती 'आरंभ'कडे पाठवा;
आपला बहुमूल्य वेळ देऊन प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असेल तर, 'आरंभ फाउंडेशन'ला संपर्क करा -

राहुल बिरनाळे - ७६२०१०२०३०
मंदार शिंदे - ९८२२४०१२४६


Share/Bookmark

No comments:

Post a Comment