ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, September 21, 2014

शिवसेना आणि काँग्रेस

"शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे - एस. एम. जोशी - अत्रे - जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना 'लक्ष्य' करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं... आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता! एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे..."

- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment