ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, January 16, 2017

होमस्कूलिंग – स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या वाटेवर

शिक्षण म्हटलं की शाळा आणि शाळा म्हटलं की वेळापत्रक. हे समीकरण गेल्या काही पिढ्यांपासून अगदी पक्कं झालं आहे. शिक्षण किंवा जगभर ज्याला सार्वजनिक शालेय शिक्षण  - पब्लिक स्कूलिंग – म्हटलं जातं, त्याची सुरुवात खरं तर एकोणिसाव्या शतकात झाली. त्यापूर्वी समान अभ्यासक्रम, समान बोर्ड, समान परीक्षा, वगैरे गोष्टींचे संदर्भ सापडत नाहीत. तेव्हा स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणपद्धती रचल्या जात असत. त्या शिक्षणपद्धतीवर स्थानिक भाषा, स्थानिक व्यवसाय, सांस्कृतिक व राजकीय विचारसरणी यांचा मोठा प्रभाव असे. त्यामुळं भौगोलिक अंतर, नैसर्गिक आपत्ती, सत्ताबदल, अशा गोष्टींनीही शिक्षणाचे प्रवाह बदलले, असं जागतिक इतिहासकारांचं म्हणणं आहे.

एकोणिसाव्या शतकात औद्योगिकीकरण आणि वसाहतवादाबरोबरच सार्वजनिक शालेय शिक्षणाचीही सुरुवात झाली. त्यामागचे हेतु काय होते, त्यातून फायदे जास्त झाले की तोटे, वगैरे गोष्टींची चर्चा करणं या लेखाचा उद्देश नाही. पण स्वयंरचित शिक्षणपद्धती किंवा सेल्फ-डिझाईन्ड एज्युकेशन सिस्टीम ही संकल्पना नवीन वगैरे नसून, उलट सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीपेक्षा ती जुनी आहे, एवढंच सांगण्यासाठी हे इतिहासाचे दाखले. अर्थात, त्या काळी असे ‘स्वयंरचित’ वगैरे शब्द कुणी वापरलेही नसतील, पण संकल्पना मात्र तशीच आहे.

शिक्षण कशासाठी घ्यायचं? हा एक ज्वलंत वादविवादाचा मुद्दा राहिलेला आहे. स्थल-काल-व्यक्तीपरत्वे याचं उत्तर वेगवेगळं असणार हे नक्की. पण सर्वसाधारणपणे, ज्ञानार्जनातून स्वतःचा व पर्यायानं समाजाचा विकास, अर्थार्जनाच्या अधिक संधी व त्यातून कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा, अशा काही ढोबळ प्रेरणा शिक्षण घेण्यामागं दिसून येतात. बदलती जागतिक परिस्थिती व रोजगाराच्या संधी यांच्यासाठी स्थानिक परिस्थितीनं रचलेल्या शिक्षणपद्धती अपु-या पडू लागल्या आणि समान अभ्यासक्रम, समान कौशल्ये, समान गुणमापन पद्धतीचं सार्वजनिक शालेय शिक्षण लोकांना सोयीचं, आश्वासक, आणि आवश्यक वाटू लागलं. म्हणूनच, व्यक्तिगत, कौटुंबिक, व सामाजिक प्रगतीसाठी शाळेत जाऊन शिक्षण घेतलंच पाहिजे, अशी भावना मोठ्या प्रमाणावर तयार झाली. या शिक्षणपद्धतीची यशस्वी उदाहरणं समोर येतील तसा अधिकाधिक लोकांचा कल शालेय शिक्षणाकडं वाढत गेला.

असं असलं तरी, आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितींमुळं समाज एकाच वेळी दोन टोकाच्या गटांत विभागत गेला. एका बाजूला पिढ्यांमागून पिढ्या शालेय आणि उच्च शिक्षणाच्या प्रवाहात पुढं जात असतानाच दुस-या बाजूला पिढ्यान्‍पिढ्या शाळेचं तोंड न बघितलेले लोकही इथं दिसतात. याबरोबरच, जागतिकीकरण, शहरीकरण, रोजगारासाठी स्थलांतर, तांत्रिक प्रगतीचा वेग, अशा अनेक घटकांचा या शिक्षणामुळं मिळणा-या संधींवर आणि कौशल्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळं या शिक्षणपध्दतीबद्दल ‘आवश्यक पण बेभरवशाची’ असं लोकांचं काहीसं संमिश्र मत बनलं आहे.

याशिवाय, सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीबद्दल सध्याच्या शिकलेल्या पिढीच्या मनात काही तक्रारी तयार झाल्या आहेत. उदाहरणार्थ –

* मुलांचा कल लक्षात न घेता साचेबद्ध शिकवण्याची पद्धत,
* सर्वांना समान वागवण्यामुळं काही अंशी दडपली जाणारी मुलांची अंगभूत कौशल्यं,
* परिक्षा आणि गुणमापन पद्धतींचा अतिरेक,
* व्यक्तिगत मार्गदर्शनाचा अभाव,
* शालेय शिक्षणासाठी मोजावी लागणारी किंमत, इत्यादी.

या गोष्टींवर कुणाकडंही रामबाण उपाय तयार नसले तरी, या समस्या टाळण्याच्या दृष्टीनं लोकांनी पर्यायी शिक्षणपद्धतींचा विचार करायला सुरुवात केली आहे.

आपल्या घरामधे, कुटुंबामधे, परिसरामधे ज्ञान मिळवण्याचे स्रोत उपलब्ध नसतील किंवा असले तरी ते पुरेसे नसतील तर सार्वजनिक शालेय शिक्षणपद्धतीतूनच ते मिळवावे लागेल. परंतु, ज्यांच्याकडे असे स्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी आपल्या मुलांचा कल, आपली परिस्थिती, व्यक्तिगत ध्येय आणि उद्दीष्टं, यांचा विचार करुन पुन्हा स्वयंरचित शिक्षणपद्धतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्यापैकी ‘घरी राहून शिक्षण’ म्हणजे ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ हा या लेखाचा विषय आहे.

‘होम-बेस्ड एज्युकेशन’साठी ‘होमस्कूलिंग’ हा शब्द सध्या प्रचलित आहे. खरं तर ‘होम-बेस्ड एज्युकेशन’च्या दोन महत्त्वाच्या पद्धतींपैकी ‘होमस्कूलिंग’ ही एक पद्धत आहे. यामधे मुलं शाळेत जात नसली तरी घरीच शाळेसारखं शिकतात. म्हणजे, घरी राहून अभ्यास करायचं वेळापत्रक पाळलं जातं. वयानुरुप त्या-त्या इयत्तेचा अभ्यास केला जातो. त्यासाठी लागणारी पुस्तकं, शैक्षणिक साधनं, चाचण्या, खाजगी शिकवणी, परीक्षा, आणि गुणमापन पद्धती जवळपास शाळेसारखीच असते. म्हणजे पूर्णवेळ कॉलेजमधे जाणं शक्य नसेल तर घरुन अभ्यास करुन बाहेरुन परीक्षेला बसता येतं, तसाच काहीसा प्रकार. वर सांगितल्याप्रमाणं शाळेबद्दलच्या तक्रारी टाळून तोच अभ्यास घरी राहून केला जातो. शक्यतो दहावी किंवा बारावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडून मुलं पुन्हा उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतात.

‘होम-बेस्ड एज्युकेशन’चा दुसरा प्रकार म्हणजे ‘अन-स्कूलिंग’ किंवा मुक्त-शिक्षण. यामधेही मुलं शाळेत न जाता घरी राहूनच शिकतात. पण शिकण्यासाठी इयत्ता, वेळापत्रक, परिक्षा, असा कोणताही साचा नसतो. मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरं शोधण्याची सवय लागावी, असं वातावरण देण्याचा प्रयत्न या पद्धतीत केला जातो. औपचारिक शिक्षणपद्धतीत ज्यांचा ‘छंद’ या प्रकारात समावेश केला जातो, त्या कला, कौशल्ये, खेळ, इत्यादींसाठी मुक्त-शिक्षणात जास्त वेळ देता येतो. वयानुरुप विशिष्ट विषय व संकल्पनांचं ज्ञान मिळण्यापेक्षा व्यक्ती म्हणून मुलांच्या विकासावर जास्त भर दिला जातो. यामधे ज्ञानाचे स्रोत पुस्तकांबरोबरच, व्यक्तिगत भेटी व ओळखी, प्रवास व निरीक्षण, परिसरातील उपक्रमांमधे सहभाग, स्वयंसेवी पद्धतीचे काम, असे निरनिराळे असतात. दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात परत येण्याचा पर्याय इथंही खुला असतोच.

साचेबद्ध शालेय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून प्रायोगिक तत्वावर चालवल्या जाणा-या शाळाही (एक्स्पेरिमेंटल स्कूल्स) असतात. यामधे औपचारिक अभ्यासक्रम अनौपचारिक पद्धतीनं शिकवला जातो. वर्गात बसून शिकवण्यापेक्षा कृतीशील उपक्रमांवर जास्त भर दिला जातो. विषय, परिक्षा, वेळापत्रक यांचे नियम मुख्य प्रवाहातील शाळांच्या तुलनेत शिथील केलेले असतात. काही पालक आपल्या मुलांना औपचारिक शाळेतून थेट होमस्कूलिंग किंवा अन-स्कूलिंगमधे न आणता अशा एक्स्पेरिमेंटल स्कूलमधे पाठवणं पसंत करतात. परंतु, एक्स्पेरिमेंटल असली तरी ही शाळा असल्यानं ‘होम-बेस्ड एज्युकेशन’मधे या प्रकाराचा समावेश केला जात नाही.

वर सांगितलेल्या ‘होमस्कूलिंग’ आणि ‘अन-स्कूलिंग’ या दोन्ही स्वयंरचित शिक्षणपद्धती – सेल्फ-डिझाईन्ड एज्युकेशन सिस्टीम – म्हणता येतील. मुलांच्या, पालकांच्या, कुटुंबातील इतर सदस्यांच्या वेळेचं आणि कौशल्याचं नियोजन करुन या पद्धतीनं शिकण्याची आखणी करावी लागते. मुलांना काही गोष्टी शिकवणं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळवून देणं, त्यांच्यासोबत काही उपक्रम स्वतः करणं, त्यांच्या इतरांशी ओळखी व प्रवास घडवून आणणं, या सगळ्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो पालकांचा वेळ. शाळेत जाऊन शिकणा-या आणि घरी राहून शिकणा-या मुलांमधे हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फरक असतो. त्यामुळं, ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ ही फक्त मुलांसाठीची शिक्षणपद्धती न राहता हळूहळू ती त्या कुटुंबाची जीवनपद्धतीच बनून जाते.

सुरुवातीलाच उल्लेख केल्यानुसार, शिक्षण म्हटलं की शाळा आणि शाळा म्हटलं की वेळापत्रक, हे समीकरण आपल्या मनात अगदी पक्कं झालेलं असतं. मग शाळेत न जाता घरी राहून मुलं शिकतात हे समजलं की पालकांना असंख्य प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. उत्तरं द्यावी लागतात असं मी म्हणत नाही, कारण सगळ्या प्रश्नांची सगळ्यांना पटणारी उत्तरं असतीलच असं नाही. शिवाय स्वयंरचित शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यामागची प्रत्येक पालकाची भूमिका आणि कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. काही निर्णय सखोल चर्चा आणि विचार करुन घेतलेले असतील, तर काहींचे निर्णय परिस्थितीजन्यही असू शकतील. पण या पालकांना विचारले जाणारे प्रश्न ठराविकच असतात, ते म्हणजे –

* मुलं शाळेत गेली नाहीत तर अभ्यास कसा करणार?
* मुलांचं सोशलायजेशन कसं होणार? समाजातले निरनिराळे घटक आणि स्तर त्यांना घरी राहून कसे बघायला मिळणार?
* मुलांना मित्र-मैत्रिणी कसे मिळणार? मुलांचं शेअरिंग कुणाबरोबर होणार?
* मुलांना शिस्त कशी लागणार? मुलांना कुणाचा तरी धाक कसा राहणार?
* दिवसभर घरी राहून मुलांना वेळेचं महत्त्व कसं कळणार?
* शाळेत न जाता सगळ्या विषयांचं ज्ञान कसं मिळणार?
* मुलांना स्पर्धेची, यशापयशाची सवय कशी होणार?
* मुलांना घरी राहून बक्षिसं, सर्टीफिकेटं, जाहीर कौतुक, वगैरे कसं मिळणार?
* शाळेत न गेल्यानं क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव यामधे भाग घेण्याची, कला-गुण दाखवण्याची संधी मुलांना कशी मिळणार?
* सतत घरी राहिल्यानं मुलांच्या आणि पालकांच्या नात्यावर परिणाम नाही का होणार?
* शाळेत न जाता मुलांचं करीअर कसं होणार? वगैरे वगैरे.

हे सर्व प्रश्न पडण्यामागं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रकारच्या शिक्षणपद्धतीचे प्रॉडक्ट म्हणता येतील अशी उदाहरणं समोर न दिसणं. गेल्या काही वर्षांमधे पालकांनी ‘ट्रायल-अॅन्ड-एरर’ पद्धतीनं होमस्कूलिंग, अन-स्कूलिंग, एक्पेरिमेंटल स्कूलिंग या सर्व प्रकारांच्या मिश्रणातून मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. अगदी अलीकडं होमस्कूलिंग किंवा अन-स्कूलिंग केलेल्या मुलांना मोठ्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाल्याच्या किंवा नोकरी-व्यवसायात ही मुलं चमकल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण तरीही सध्याच्या प्रस्थापित शालेय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून ही वेगळी पद्धत ताबडतोब स्वीकारली जाईल, इतकी ही उदाहरणं भरीव आणि भरपूर नाहीत.

एकंदरीतच मुलांचा विकास ही हळू-हळू होणारी प्रक्रिया असल्यानं या पद्धतींचं यशापयश ठरवताना संयम राखण्याची गरज आहे. मुलांच्या शिक्षणाभोवती – विकासाभोवती आपली लाईफ-स्टाईल रचून पालक मुलांच्या आणि स्वतःच्याही भविष्यातील अनिश्चिततेचा धोका पत्करत आहेत. विशेष म्हणजे, मुलांचं ‘होम-बेस्ड एज्युकेशन’ राबवणारे पालक स्वतः लहानपणी औपचारिक शाळेत जाऊनच शिकले आहेत. त्यामुळं, मुलांच्या लर्निंगपूर्वी पालकांचं अन-लर्निंग होत असतं. हा विषय असाच शिकायचा असतो, हे असंच पाठ करायचं असतं, असले प्रश्न विचारायचे नसतात, अशा अनेक गोष्टी पालकांना ‘अन-लर्न’ कराव्या लागतात. मुलांना पुरेसा वेळ देण्यासाठी स्वतःच्या वेळेचं आणि कामाचं व्यवस्थित नियोजन करावं लागतं. मुलांना ज्ञानाचे स्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतःला ते माहिती करुन, शक्य झाल्यास पडताळून पहावे लागतात. संबंधित विषयतज्ञांशी मुलांच्या ओळखी करुन देण्याआधी स्वतःचं वर्तुळ विस्तारावं लागतं. थोडक्यात, मुलांच्या बरोबरीनं स्वतःच्या शिक्षणाची आणि विकासाची वाट धरावी लागते.

स्वयंरचित शिक्षणपद्धतीमधे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांच्या मुलांकडून असणा-या अपेक्षांचं व्यवस्थापन. प्रस्थापित औपचारिक शिक्षणपद्धतीपासून फारकत घेताना, त्या शिक्षणपद्धतीचे संभाव्य फायदे आपल्या मुलांना मिळणार नाहीत याची जाणीव पालकांनी ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या तथाकथित स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना आपणच कुठली आयुधं देत आहोत हे त्यांच्या यशापयशाच्या मूल्यमापनाआधी तपासून पहावं. एक व्यक्ती म्हणून मुलांचा विकास घडवण्यासाठी पालक प्रयत्नशील असतील तर, योग्य वयात आपल्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याची आपली तयारी आहे का हेही स्वतःला विचारावं.

समाजातील सर्वच घटकांना एकाच वेळी एकसारखीच शिक्षणपद्धती लागू करता येणं शक्य नाही. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती आणि ध्येय यांच्यानुसार प्रत्येकाच्या गरजा व अपेक्षा वेगवेगळ्या असणार आहेत. आपल्या स्वतःच्या परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करुन आजूबाजूला उपलब्ध असणा-या पर्यायांमधून उत्तम पद्धती तयार करणं, हाच खरा मार्ग असणार आहे. ही आपणच आपल्यासाठी बनवलेली अथवा निवडलेली पद्धती स्वयंरचित शिक्षणपद्धतीच्या पर्यायांमधे आज ना उद्या स्थान मिळवेलच.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६



Share/Bookmark

1 comment:

  1. सर खुप सुंदर आणि चांगल काम आपण केलं परंतु आम्हां पालकांना या गोष्टी करण्याची प्रचंड भीती होती परंतु आता आम्ही मुलांना शिक्षणात स्वातंत्र्य नक्कीच देऊ .हा प्रचंड मोठा विश्वास तुमच्याशी बोलल्यावर निर्माण झाला .

    ReplyDelete