ठाण्याच्या तीन हात नाक्याला फ्लायओव्हरखाली दहा-बारा कुटुंबं गेल्या वीसेक वर्षांपासून राहतायत. सिग्नलला भीक मागणं आणि छोट्या-मोठ्या वस्तू विकणं हे त्यांचं काम. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित. अर्ध्या-एक किलोमीटरवर महापालिकेची शाळा आठवीपर्यंत मोफत शिक्षण पुरवते. पण या मुलांना शाळेपर्यंत पोचवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. मग गेल्या जून महिन्यात भटू सावंत या कार्यकर्त्यानं आख्खी शाळाच उचलून या मुलांच्या दारात आणली. एका जुन्या कंटेनरला शाळेचं रूप देऊन त्यांनी या पुलाखाली राहणा-या पंचवीस-तीस मुलांच्या शिक्षणाची सोय केली.
यंदाच्या जानेवारी महिन्यात एका रविवारी ठाण्यात होतो. सावंत सरांना फोन केला, भेटता येईल का विचारलं. रविवार असूनही ते खास शाळा दाखवण्यासाठी आले. शाळेचं फाटक उघडलं आणि आमच्याबरोबरच, समोर राहणारी सगळी मुलं शाळेत घुसली. सावंत सर उत्साहानं शाळा दाखवत होते. मुलांच्या अडचणी, त्यांची परिस्थिती, त्यांच्यासाठी शिक्षण का महत्त्वाचं आहे, यावर तळमळीनं बोलत होते. मधेच आणखी कुणीतरी पाहुणे आले म्हणून ते वर्गाबाहेर (कंटेनरच्या बाहेर) गेले. ते परत येईपर्यंत मुलांशी मस्त गप्पा झाल्या. त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या अभ्यासाच्या वह्या चाळताना जाणवली या मुलांची शिकण्याची अचाट भूक. सात-आठ महिन्यांत मुलांनी मराठी बाराखडी, इंग्लीश अल्फाबेट्स, आणि मूलभूत गणितीय संकल्पनांचा अक्षरशः फडशा पाडलेला दिसत होता.
बोलताना आणि लिहिताना 'एथे' आणि 'येथे' या शब्दांमधे कसा गोंधळ होतो, यावर दहा-अकरा वर्षांचा समीर माझ्याशी चर्चा करत होता. आज रविवारची शाळा उघडलेली बघून टेन्शनच आलं, असं बोलता-बोलता म्हणाला. मी विचारलं, कसलं टेन्शन? तर म्हणाला, होमवर्क झाला नाही ना शनिवारी दिलेला. कारण काय, तर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजूबाजूच्या सिग्नलवर झेंडे विकायचा ओव्हरटाईम सुरू आहे! मी होमवर्क काय दिलाय ते बघत होतो. वहीमधे पाच-सहा वेळा बाराखडी लिहून आणायची होती.
मी मुद्दामच त्याला म्हटलं, आता कधी होणार रे तुझी सात पानं लिहून?
यावर तो जबरदस्त काॅन्फीडन्सनं बोलला - काय नाय सर, एक पान झालंय.. आता सहाच पानं बाकी हैत. होतील आज रात्री!
पाॅझिटीव्ह अॅटीट्यूडवर कुणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर समीरचा पत्ता आहे - सिग्नल शाळा, तीन हात नाका, ठाणे.
- मंदार शिंदे 9822401246
http://mahamtb.com/Encyc/2017/10/14/Article-on-Signal-Shala-by-Bhatu-Sawant.html
http://www.thebetterindia.com/67316/signal-shala-school-thane-mumbai

No comments:
Post a Comment