जीटीच्या गुजगोष्टी
- मंदार शिंदे 9822401246
📐📌📎✏📏🖇💡😀
इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना जीटी म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही…
इंजिनियरींग किंवा मशीन ड्रॉईंग विषयात सगळ्यांनाच बिनचूक आणि रेखीव ड्रॉईंग करता यायचं नाही. त्यातून, ड्रॉईंग शीटचा 'स्नो व्हाईट' म्हणजे बर्फाएवढा स्वच्छ पांढरा प्रकार वापरणं सक्तीचं होतं. त्यावर काही चूक झाली म्हणून खोडरबर वापरला तर, लहान मुलांच्या डोळ्यातलं काजळ फिसकटतं तसा सगळा राडा व्हायचा. मग गुरुजींकडून ड्रॉईंगच्या पिरीयडला जाहीर सत्कार व्हायचा. शिवाय, सबमिशनसाठी वेळेची मर्यादा असायची. ड्रॉईंग नक्की कशाचं आहे आणि कसं काढायचं आहे, हे समजलं नाही तरी चालेल, पण वेळेत पूर्ण करुन सबमिट करणं सगळ्यांनाच सक्तीचं असायचं...
अशा वेळी, होतकरु इंजिनियर्सच्या मदतीला धावून यायची ग्लास ट्रेसींग (जीटी) टेक्नॉलॉजी. याची रेसिपी अशीः
एका मोठ्या बादलीत चाळीस किंवा साठ वॅटचा पिवळा बल्ब ठेवायचा. बादलीवर मोठी काच ठेवायची. ज्याच्यावरुन कॉपी करायची ती ‘ओरिजिनल’ शीट खाली आणि त्यावर आपली कोरी शीट क्लॅम्प करायची. बल्ब ऑन केला की खालचं ड्रॉईंग दिसू लागतं, त्याबरहुकूम वरच्या कोऱ्या कागदावर पेन्सिलीनं हलक्या हातानं आऊटलाईन बनवायच्या. नंतर ती शीट स्वतंत्र बोर्डवर घेऊन फिनिशिंग करायचं.
बादली उपलब्ध नसेल तर दोन बाजूंना पुस्तकांची चळत रचून त्यावर काच ठेवली जायची.
जीटी 'मारताना' वेळेचं भान महत्त्वाचं असायचं. सलग खूप वेळ बल्ब ऑन राहिला, तर काच तापून तडकण्याचा धोका असायचा. शिवाय, काच तापल्यामुळं खालची 'ओरिजिनल' शीट पिवळी पडायची. अनेक जणांच्या 'जीट्या' मारण्यासाठी एकच ओरिजिनल शीट वापरली, तर ती काचेवर घासून काळी आणि बल्बच्या उष्णतेमुळं पिवळी पडायची शक्यता असायची. त्यामुळं पहिल्या शीटवरुन दुसरी बनवायची, मग दुसरीवरुन तिसरी, तिसरीवरुन चौथी... असं 'ज्योत से ज्योत जलाते चलो' हे तत्त्व पाळलं जायचं.
ही ओरिजिनल शीट शक्यतो वर्गातल्या सर्वात हुशार आणि तत्पर विद्यार्थ्याची असायची. पण सगळ्यात आधी ड्रॉईंग पूर्ण होऊनसुद्धा जनकल्याणार्थ तिचं सबमिशन लांबणीवर पडायचं. शिवाय अनेकांकडून हाताळली गेलेली ही मूळची ‘स्नो व्हाईट’ गंगा बऱ्यापैकी ‘मैली’ होऊनच मूळ मालकाकडं परतायची. आधीच सबमिशनला लेट झालेला असल्यानं आणि पुन्हा त्या निर्मितीकळा सोसण्याचं त्राण नसल्यानं, आहे तशीच शीट गुरुजींसमोर सादर केली जायची. संपूर्ण बॅचसमोर त्या ‘कळकट मळकट, कामाला बळकट’ शीटचा सरांकडून उद्धार केला जायचा. त्याच शीटवरुन जन्मलेल्या पण आपला ‘स्नो व्हाईट’ शुभ्रपणा टिकवलेल्या बाकीच्या शीट्स मूक सहानुभूती व्यक्त करायच्या...
एकदा मात्र उलटाच प्रकार घडला. झालं असं की, फ्लुईड मेकॅनिक्स विषयातलं एक अवघड हायड्रॉलिक सर्कीट अख्ख्या बॅचनं जीटी मारुन काढलं. जीटी मारण्यासाठी मार्गदर्शक शीट मागच्या वर्षीच्या सबमिशन झालेल्या जर्नलमधून घेतली होती. पूर्ण केलेलं जर्नल तपासून घेण्यासाठी सरांच्या केबिनबाहेर रांग लावून सगळे थांबले होते. रोल नंबरनुसार एकेकाला आत बोलावलं जात होतं. पहिल्या एक-दोन मुलांचं जर्नल सरांनी थोडं चाळून बघितलं, पण त्यानंतर ते फक्त 'त्या' हायड्रॉलिक सर्कीटचं पान दाखवायला सांगू लागले. मुलांनी ते पान उघडलं की त्यावर एका सेकंदात लाल पेनानं फुली मारुन 'रिपीट' असा शेरा मारु लागले.
सगळ्यांच्या जर्नलचं एकच पान बघून जर्नल रिजेक्ट केलं जात होतं. कुणालाच काहीच कळेना. सगळ्यांच्या फाईल तपासून झाल्यावर सरांनी सगळ्यांना एकदम केबिनमध्ये यायला सांगितलं. मग पुढचा अर्धा तास संपूर्ण बॅचचं, कामचुकारपणा, कॅज्युअल ॲप्रोच, टाईमपास, अभ्यासात लक्ष नसणं, आई-वडीलांच्या अपेक्षा, वेळेची आणि कॉलेजची किंमत नसणं, इंजिनियर होण्याची एकाचीही लायकी नसणं, वगैरे विषयांवर सभ्य आणि सौम्य भाषेत प्रबोधन करण्यात आलं.
सगळं ऐकून घेतल्यावर एकानं धाडस करुन विचारलंच, "पण सर, एकच ड्रॉईंग बघून तुम्ही सगळ्या बॅचचे जर्नल रिजेक्ट का केले ?"
यावर गालातल्या गालात हसत सर म्हणाले, "बेट्यांनो, मीसुद्धा इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकूनच इथं आलोय. तुमच्या वयापेक्षा जास्त वर्षं मी इथं शिकवायचं काम करतोय. मला सांगा, हायड्रॉलिक सर्कीटची जीटी मारायला तुम्ही कुठली शीट वापरलीत ?"
सगळे इकडं-तिकडं बघू लागले. काहीजण पुटपुटले, "सर, आम्ही जीटी नाही मारली, रात्रभर जागून ड्रॉईंग काढलंय."
सरांनी टेबलवरचं एक जर्नल उचललं. हायड्रॉलिक सर्कीटचं ते विवादास्पद ड्रॉईंग काढून बॅचसमोर धरलं आणि एका विशिष्ट जागेवर बोट ठेवून विचारलं, "सर्कीटमध्ये हा पार्ट कुठला आहे कुणी सांगू शकेल का ?"
सगळ्यांनी ड्रॉईंगकडं बघितलं आणि एका सुरात उत्तर दिलं, "हो सर, ती कॉईल स्प्रिंग आहे!"
यावर मोठ्यानं हसत सर म्हणाले, "गाढवांनो, जीटी मारताना थोडं तरी लॉजिक वापरावं. हायड्रॉलिक सर्कीटमध्ये स्प्रिंग कुठून येणार ? ती कॉईल स्प्रिंग नाही... माझी सही आहे, सही !!"
आत्ता सगळ्या बॅचच्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या वर्षी सरांनी तपासून सही केलेलं ड्रॉईंग जीटी मारायला वापरलं होतं. पहिली जीटी मारणाऱ्यानं स्प्रिंगसारखी दिसणारी सरांची सही हुबेहूब कॉपी करुन फिनिशिंगमध्ये तिची टोकंसुद्धा (त्याला योग्य वाटेल तिथं) जुळवून टाकली होती. पुढच्या सगळ्या 'जीट्या' सेम टू सेम सरांच्या सहीसह अवतरल्या होत्या...
॥ इति श्री इंजिनियरींगमोचनं नाम जीटीस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥
📐📌📎✏📏🖇💡😀
© मंदार शिंदे १२/०४/२०१९
No comments:
Post a Comment