ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, April 26, 2019

ल्युसी

ल्युसी
- मंदार शिंदे 9822401246

माणूस आपल्या मेंदूचा किती वापर करतो याबद्दल खूप संशोधन झालंय, अजूनही, होतंय. असं म्हणतात की, मानवी मेंदूच्या जास्तीत जास्त दहा टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेचा अजूनपर्यंत वापरच झालेला नाही. जर दहा टक्के क्षमता वापरुन माणसानं कॉम्प्युटर, रोबो, विमानं, सॅटेलाईट, अणुबॉम्ब, आणि काय काय बनवलं असेल, तर पन्नास-साठ-सत्तर टक्के क्षमतेनं अजून काय-काय करु शकेल ?!?
याच विषयावर २०१४ साली आलेला एक सिनेमा म्हणजे ‘ल्युसी’.
तैवान देशातल्या तैपेई शहरात शिक्षणासाठी येऊन राहिलेल्या, पंचवीस वर्षांच्या एका अमेरिकन तरुणीची, ल्युसीची ही गोष्ट. ल्युसीचा नवीन बॉयफ्रेन्ड आहे रिचर्ड. रिचर्ड काम करतो जॅन्ग नावाच्या एका कोरियन डॉन आणि ड्रग माफियासाठी. या रिचर्डमुळं ल्युसीला काहीही कल्पना नसताना एक ‘ड्रग म्यूल’ बनावं लागतं. (ड्रग म्यूल म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आपल्या शरीराचा वापर करणारे / करु देणारे लोक.)
होतं असं की, रिचर्ड ल्युसीला एक छोटंसं काम सांगतो. काम एवढंच की, काही कागदपत्रांची एक ब्रीफकेस जॅन्गकडं नेऊन द्यायची असते. अर्थातच, रिचर्ड ल्युसीशी खोटं बोलतो. प्रत्यक्षात त्या ब्रीफकेसमध्ये असतात अतिशय किंमती सिन्थेटीक ड्रग ‘सीपीएच-फोर’ची चार पाकिटं. ब्रीफकेस पोहोचवताना झालेल्या गडबडीत जॅन्गचे लोक रिचर्डचा गोळ्या घालून खून करतात आणि ल्युसीला पकडून नेतात.
ल्युसीनं जॅन्गला देण्यासाठी आणलेली सीपीएच-फोरची चारही पाकिटं युरोपात पोहोचवायची असतात. त्यासाठी तीन माणसांचं पोट फाडून, प्रत्येकी एक पाकीट त्यांच्या पोटातल्या पोकळीत लपवलं जातं. ल्युसी आयतीच त्यांच्या तावडीत सापडलेली असते. एक तर अमेरिकन, त्यातून स्टुडंट. युरोपात ड्रग्ज वाहून न्यायला परफेक्ट ‘कॅरीयर’ !! तिच्याकडं बघून कुणाला शंकासुद्धा येणार नाही. मग तिचं पोट फाडून चौथं पाकीट तिच्या पोटात लपवलं जातं.
माफियांच्या कैदेत असताना झालेल्या झटापटीत, एक गुंड ल्युसीच्या पोटात लाथ घालतो. तिच्या पोटात लपवलेलं ड्रग्जचं पाकीट त्यामुळं फुटतं आणि मोठ्या प्रमाणावर ते ड्रग तिच्या शरीरात पसरु लागतं.
ल्युसीच्या शरीरात पसरणाऱ्या सीपीएच-फोरचा तिच्यावर काय परिणाम होतो माहितीये ? तिच्या शरीरात काही बिघाड होण्याऐवजी तिला विलक्षण शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होतात. (आपल्या हिंदी-मराठी सिनेमात एखादा बॉम्बस्फोट होऊन हिरोचा सुपरहिरो होतो, आणि फक्त लाल रंगाचं फूल किंवा रुमाल त्याची शक्ती नाहीशी करु शकतो, वगैरे, असंच काहीतरी असावं बहुतेक…)
तिला प्राप्त झालेल्या शक्ती म्हणजे - टेलिपॅथी (म्हणजे कुठल्याही भौतिक साधनांशिवाय थेट दुसऱ्या व्यक्तीच्या मनाशी संवाद साधणं - मन की मन से बात!); टेलिकिनेसिस (म्हणजे हात न लावता नुसत्या इच्छाशक्तीनं प्रत्यक्ष वस्तू हलवणं); मनातल्या मनात भूतकाळ किंवा भविष्यकाळात प्रवास करणं (म्हणजे ज्याला मराठीत ‘टाईम ट्रॅव्हल’ म्हणतात तेच); आणि कुठल्याही प्रकारच्या वेदनेची जाणीवच न होणं (म्हणजे, ल्युसी को दर्द नही होता, हाईंग !!).
या शक्ती प्राप्त होत असताना ल्युसीचं व्यक्तिमत्त्वसुद्धा अंतर्बाह्य बदलून जातं. आता ती एक निर्दयी आणि भावनारहीत व्यक्ती (?) बनलेली असते. तिला मिळालेल्या अचाट शक्तींचा वापर करुन ती, तिला डांबून ठेवणाऱ्या गुंडांना मारुन टाकते आणि त्यांच्या कैदेतून पळून जाते.
सगळ्यात आधी ल्युसी जवळचं हॉस्पिटल शोधून काढते आणि तिच्या पोटात लपवलेलं ड्रग्जचं पाकीट काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करुन घेते. तिथल्या डॉक्टरांना तिच्या पोटातून ते पाकीट काढून टाकण्यात यश येतं. ऑपरेशन करणारे डॉक्टर ल्युसीला सीपीएच-फोर बद्दल आणखी माहिती देतात.
प्रत्येक गरोदर स्त्री नैसर्गिकरीत्या गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यात सीपीएच-फोर नावाचा पदार्थ निर्माण करते, पण अगदीच सूक्ष्म प्रमाणात. पोटातल्या गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्याचं काम हा पदार्थ करतो. मोठ्या प्रमाणावर हा पदार्थ शरीरात पसरला तर ती व्यक्ती वाचणं शक्य नसतं. त्यामुळं ल्युसीचं जिवंत राहणं डॉक्टरांच्या मते चमत्काराहून कमी नसतं.
आपल्या वाढत चाललेल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याची इच्छा ल्युसीमध्ये जागृत होते. तिच्यासोबत ज्यांची पोटं फाडून सीपीएच-फोरची पाकीटं लपवण्यात आली होती, त्या इतर तिघांचा शोध लावायचं ती ठरवते. त्यासाठी ती पुन्हा जॅन्गच्या हॉटेलमध्ये जाते. यावेळी जॅन्गच्या बॉडीगार्डना धडाधड मारुन टाकत, ती थेट जॅन्गपुढं जाऊन पोहोचते आणि टेलिपॅथीच्या माध्यमातून जॅन्गऐवजी त्याच्या मनाशी संवाद साधते. त्याच्या मनातून त्या तीन ड्रग म्यूल्सची ठिकाणं ती माहिती करुन घेते. (मला काय वाटतं, पोलिसांकडं अशी ताकद आली तर गुन्ह्यांचा तपास केवढा सोपा होईल ना ? लपवलेली शस्त्रं, लपवून ठेवलेला चोरीचा माल, फरार सहकारी, अशा सगळ्यांची माहिती डायरेक्ट आरोपीच्या मनातून पोलिसांच्या मनात. मग पोलिस कस्टडी नको की थर्ड डिग्री नको. टायरमध्ये घालणं नको की बर्फाच्या लादीवर झोपवणं नको. अहिंसा परमो धर्मः !!)
आता पुढची योजना आखण्यासाठी ल्युसी एका मैत्रिणीच्या घरी येते. आपल्याला नक्की काय झालंय आणि आपलं यापुढं नक्की काय होणार आहे, हे समजून घेण्याचा ती प्रयत्न करते. इंटरनेटवर याबद्दल खूप सारी माहिती शोधते आणि वाचून टाकते. त्या माहितीमध्ये तिला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर सॅम्युएल नॉर्मन यांच्याबद्दल कळतं. प्रोफेसर नॉर्मन याच विषयाचा अनेक वर्षं अभ्यास करतायत, असं समजल्यावर ती त्यांची सगळी भाषणं, लेख, रिसर्च पेपर, वगैरे वाचून टाकते. (जगात केवढं ज्ञान आहे आणि आपल्याकडं किती थोडासाच वेळ आहे, असं वाटणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना ही शक्ती मिळवायला फारच आवडेल…)
तर, प्रोफेसर नॉर्मन यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचा काही मिनिटांत फडशा पाडून, ल्युसी त्यांना डायरेक्ट फोन लावते. तिच्या वाढत जाणाऱ्या क्षमतांबद्दल, मेंदूच्या वाढत्या वापराबद्दल ती त्यांना सांगते. आधी प्रोफेसर नॉर्मनचा तिच्यावर विश्वास बसत नाही, त्यांना वाटतं कुणीतरी त्यांची चेष्टा करतंय. पण ल्युसी आपल्या अचाट शक्तींचा वापर करुन, त्यांना काही जादूचे प्रयोग करुन दाखवते, ज्यामुळं ते अचंबित होतात आणि ल्युसीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात.
एकूण क्षमतेच्या दहा टक्के मेंदूचा वापर करुन माणूस काय करु शकतो, वीस टक्के वापरता आली तर काय करु शकेल, तीस टक्क्याला तो कुठं पोहोचेल, आणि चाळीस-पन्नास-सत्तर टक्के क्षमता वापरता आली तर काय-काय घडू शकेल, या सगळ्याचे अंदाज बांधणारं प्रेझेंटेशन प्रोफेसर नॉर्मननी जगासमोर केलेलं असतं. पण ही केवळ कल्पना आहे, असं घडू शकणार नाही, असंही त्यांचं मत असतं. ल्युसी त्यांना फोनवर सांगते की, त्यांचे अंदाज बरोबर आहेत, कारण ती मेंदूच्या क्षमतेचे हे टप्पे पार करत चाललेली आहे आणि नॉर्मनच्या भाकीतानुसार शक्ती तिला प्राप्त होत चाललेल्या आहेत. नॉर्मनसाठी हे एकाच वेळी समाधानकारक आणि भीतीदायकसुद्धा असतं. (आपले अंदाज खरे ठरले याचं समाधान, पण ते खरे ठरल्यावर काय भयानक परिस्थिती ओढवेल याचं ज्ञान असल्यानं भीतीसुद्धा !)
प्रोफेसर नॉर्मनशी बोलून झाल्यावर ल्युसीच्या मनात बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता येते. ती आता जॅन्गच्या मनातून काढलेल्या माहितीनुसार सीपीएच-फोरची बाकी तीन पाकिटं मिळवायला पॅरीसला जाते. पॅरीसच्या वाटेवर असताना ती पेरी देल रिओ नावाच्या एका फ्रेंच पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधते आणि ड्रग्जची पाकिटं शोधण्यात मदत करायची विनंती करते.
विमान प्रवासादरम्यान ल्युसी शॅम्पेनचा एक घोट घेते, ज्यामुळं तिच्या पेशींची रचना अस्थिर होऊन, तिच्या शरीराचं विघटन व्हायला लागतं. तिचं शरीर आता पेशींचं पुनर्निमाण करु शकणार नाही आणि शरीराचं विघटन थांबवण्यासाठी तिला आणखी सीपीएच-फोरचा डोस घ्यायला लागणार, हे तिच्या लक्षात येतं.
पॅरीसमध्ये पोहोचल्यावर ल्युसी पोलिस ऑफीसर देल रिओच्या मदतीनं ड्रग्जची पाकिटं शोधून काढते. सशस्त्र पोलिसांना आणि कोरियन ड्रग टोळीतल्या गुंडांना ती आपल्या शक्ती वापरुन निष्प्रभ करुन टाकते. सीपीएच-फोर हातात आल्यावर ती गडबडीनं प्रोफेसर नॉर्मन यांना भेटायला धावते.
ल्युसीच्या बाबतीत घडत असलेल्या गोष्टी, आधी कुणाच्याही बाबतीत घडलेल्या नसतात. त्यामुळं, तिचं पुढं काय होणार किंवा तिनं आता काय करावं, याबद्दल ठोस काहीच सांगता येणार नाही, फक्त अंदाज व्यक्त करता येईल, असं प्रोफेसर नॉर्मन सांगतात. ते ल्युसीला म्हणतात, “हे बघ… तू आयुष्याचा अगदी मुळापासून विचार केलास तर - म्हणजे, अगदी सुरुवातीला, एका पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी तयार होण्याची प्रक्रिया, तिथपासून बघितलं तर - आयुष्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपल्याला मिळालेलं ज्ञान पुढे देत राहणं. यापेक्षा उच्च उदात्त असा दुसरा कुठलाही उद्देश नव्हता, नसेल. त्यामुळं, तुला प्राप्त होत असलेल्या ह्या एवढ्या सगळ्या ज्ञानाचं काय करायचं, असं जर तू मला विचारत असशील, तर मी म्हणेन… पुढे देत रहा.” (जे जे आपणांसि ठावे । ते ते इतरांसि सांगावे । शहाणे करोनि सोडावे । सकळजन ॥ असं समर्थ रामदासांनी उगीच म्हटलंय का ?)
आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होईल ते सगळं, प्रोफेसर नॉर्मन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं जगाला देऊन टाकण्यासाठी ल्युसी तयार होते.
इकडं प्रोफेसर नॉर्मन आणि ल्युसी जगाच्या उद्धारासाठी मोठमोठ्या योजना बनवत असताना, ह्याच जगातला एक करंटा डॉन जॅन्ग ते ड्रग्ज मिळवण्यासाठी आपली टोळी घेऊन येतो आणि फ्रेंच पोलिसांसोबत गोळीबार-गोळीबार खेळतो. (जॅन्ग्या लेका, कुठं फेडशील ही पापं ??)
आता प्रोफेसर नॉर्मनच्या प्रयोगशाळेत ल्युसी काळ आणि आयुष्य या विषयांवर शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करत असते. तिच्या सांगण्यानुसार, मानवी जीवनाचं आणि मानवाच्या अस्तित्त्वाचं खरं मोजमाप फक्त वेळेच्या स्वरुपातच होऊ शकतं. वेळेचा संदर्भ काढून टाकला, तर आपलं अस्तित्त्वच नष्ट होतं. सर्व गोष्टी विशिष्ट काळापुरत्याच अस्तित्त्वात असतात, आणि त्या विशिष्ट काळाच्या आधी किंवा नंतर त्या आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण तेव्हा त्या अस्तित्त्वात नसतात. त्यामुळं, आपल्या अस्तित्त्वाचं खरं मोजमाप वेळेव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही परिमाणात होऊ शकत नाही. (हे परत परत तेच लिहिलंय की काय, असं वाटू शकेल. पण इलाज नाही… कारण, ते समजायला जेवढं अवघड आहे, त्यापेक्षा समजावून सांगायला जास्त अवघड आहे. असो.)
ल्युसीच्या सांगण्यावरुन, त्या शिल्लक राहिलेल्या तीन पाकिटांमधलं सीपीएच-फोर तिच्या शरीरात भसाभस घुसवलं जातं. तिच्या शरीराचा आकार आता बदलायला लागतो आणि तिचं शरीर एका विचित्र काळ्या रंगाच्या वायरचं रुप घेते. अशा अनेक वायर्स, सापांसारख्या सळसळत सुटतात आणि त्या प्रयोगशाळेतल्या कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आपोआप गुंडाळल्या जातात. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं एकत्रित दळण घालून, ल्युसी एक नवीनच वस्तू तयार करते - सध्याच्या कॉम्प्युटर्सपेक्षा अगदी वेगळा असा पुढच्या पिढीतला एक ‘सुपर कॉम्प्युटर’ ! एक असा सुपर कॉम्प्युटर, ज्यामध्ये ल्युसीला प्राप्त झालेलं विश्वभरातलं ज्ञान साठवलेलं असेल.
पूर्वी आयुष्यभर कष्ट करुन, घरं, व्यवसाय, इमारती, वगैरे बांधून झाल्यावर लोक म्हातारपणी तीर्थयात्रेला जायचे. आपला सुपर कॉम्प्युटर बांधून झाल्यावर ल्युसी काळ-यात्रेला जायला निघते… स्पेस-टाईम जर्नी ! मानवजातीची आत्तापर्यंत माहिती असलेली सर्वांत जुनी पूर्वज, जिचं नावसुद्धा ल्युसीच ठेवलेलं आहे, तिच्यापर्यंत (म्हणजे काही हजार कोटी वर्षं) भूतकाळात जाऊन पोहोचते. मग काळाच्या सुरुवातीला, म्हणजे बिग-बॅन्गपर्यंत जाते, डायनासोर आणि उत्क्रांतीच्या वाटेवरच्या बाकीच्या सगळ्या प्राण्यांची भेट घेत येते.
हे असलं ब्रह्मांडाला कवेत घेणारं काहीतरी ‘न भूतो न भविष्यति’ प्रकरण सुरु असताना, तो करंटा कोरियन जॅन्ग नेमका मधेच कडमडतो. प्रोफेसर नॉर्मनच्या प्रयोगशाळेचं दार तोडून उघडण्यासाठी त्याला चक्क रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र वापरायला लागलेलं असतं. (बहुतेक असं बजेट वाढत गेल्यामुळंच तो जास्त वैतागला असावा…) जॅन्ग थेट ल्युसीच्या डोक्याला बंदूक लावतो. ती बिचारी काळ-प्रवासात कुठल्या कुठं जाऊन पोहोचलेली असते आणि हा तिच्या मर्त्य शरीरावर बंदूक रोखून उभा असतो. मानवी जीवनाचा उद्देश ‘देण्या’वरुन ‘घेण्या’कडं सरकला, की ही अशी विध्वंसक माणसं तयार होत असावीत. आपण दुसऱ्यांसोबत स्वतःचासुद्धा नाश करतोय, हेसुद्धा त्यांना कळत नसतं.
सीपीएच-फोरच्या भरमसाठ डोसामुळं ल्युसीच्या मेंदू वापराची क्षमता झपाट्यानं वाढत असते. जॅन्ग बंदुकीतून गोळी झाडतो खरी, पण ती गोळी ल्युसीपर्यंत पोहोचण्याआधीच, ल्युसी शंभर टक्के क्षमता साध्य करते आणि बुम्‌… क्षणात तिथून अदृश्य होते. एकदम गायब !! तिचे कपडे आणि तो काळा सुपर कॉम्प्युटर फक्त शिल्लक राहतात.
पोलिस भारतातले असोत की फ्रान्सचे, सगळं महत्त्वाचं घडून गेल्यावरच पोहोचतात. देल रिओ असाच (नियमानुसार) उशीरा पोहोचतो. बाहेर गोळीबार-गोळीबार खेळ अर्धवट सोडून आत घुसलेला जॅन्ग त्याला दिसतो. अखिल मानवजातीच्या वतीनं तो जॅन्गवर गोळ्यांचा वर्षाव करुन त्याच्या दुष्कृत्यांचा बदला घेतो. तिकडं आपला काळा सुपर कॉम्प्युटर आपलं सगळं ज्ञान एका अद्ययावत काळ्याच रंगाच्या पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो. तो ब्रह्मांडाचं ज्ञान साठवलेला पेन ड्राईव्ह विश्वकल्याणासाठी प्रोफेसर नॉर्मनच्या हवाली करतो आणि आपलं अल्प मुदतीचं अवतार कार्य संपवून, आहे त्या जागेवर विसर्जित होतो.
उशीरा पोहोचलेला पोलिस ऑफीसर देल रिओ प्रोफेसर नॉर्मनकडं चौकशी करतो - “ल्युसी कुठं आहे?” त्याच वेळी त्याच्या फोनवर टेक्स्ट मेसेज येतोः “मी सगळीकडे आहे.”
ल्युसी शेवटी सगळ्यांना सांगते, “आपल्याला करोडो वर्षांपूर्वी हे आयुष्य मिळालं. त्याचं करायचं काय हे आता तुम्हाला माहिती झालंय…”
मानवी मेंदूच्या क्षमतेपैकी दहा टक्क्यांच्या आत वापर करुन माणसानं जे काही साध्य केलंय, ते बघता, दहा टक्क्यांच्या पुढं गेल्यास तो काय करु शकेल, याबद्दल कुतूहल आणि भीती दोन्ही वाटते. प्रोफेसर नॉर्मन म्हणतात तसं, “माणसाला आपल्या स्वतःच्या असण्यापेक्षा (अस्तित्वापेक्षा) आपल्याकडं काय आहे (मालकीच्या वस्तू) याचीच जास्त काळजी लागून राहिलेली असते.” (मूळ वाक्यः We humans are more concerned with having than with being.) या देण्या-घेण्याच्या प्रवृत्तीवरच माणसाचं ‘असणं’ ठरणार आहे, हे मात्र नक्की !

‘ल्युसी’ (२०१४)
लेखक-दिग्दर्शकः ल्युक बेसाँ
ल्युसीः स्कार्लेट जोहॅन्सन
प्रोफेसर नॉर्मनः मॉर्गन फ्रीमन
(संदर्भः विकीपीडिया आणि आयएमडीबी)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment