चोर - पोलिस
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
(एक मोठा पण निर्जन रस्ता. फूटपाथवर दोन बेंच दिसत आहेत. रात्रीचे साडेनऊ वाजलेत. दोन माणसांचे आवाज ऐकू येतात.)
पहिलाः चल, चल म्हणतो ना…
दुसराः नाही साहेब, जाऊ द्या मला.
पहिलाः आता जाऊ द्या काय? मगाशी त्या एकट्या माणसाला कशी दमदाटी करत होतास? नशीब, त्यानं मला बघितलं आणि आवाज दिला. चल, तुला दाखवतोच माझा हिसका…
दुसराः चुकी झाली साहेब, जाऊ द्या मला…
(एक इन्स्पेक्टर एका माणसाला ओढत आणतोय. इन्स्पेक्टर युनिफॉर्ममधे आहे. दुसऱ्या माणसाचे कपडे चुरगळलेले आहेत. तो इन्स्पेक्टरच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करतोय.)
इन्स्पेक्टरः चल बस इथं. (त्या माणसाला बेंचवर बसवतो. तो मान खाली घालून बसतो.)
माणूसः साहेब, जाऊ द्या ना मला…
इन्स्पेक्टरः गप रे! काय लावलंय, जाऊ द्या ना.. जाऊ द्या ना.. (इन्स्पेक्टरचा फोन वाजतो. तो फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हां हॅलो… कधी पोचनार?... का? आत्ता कसलं ट्रॅफीक?... पण आपलं नऊचं ठरलं होतं ना?... सॉरीला काय अर्थ आहे? दुसऱ्याच्या वेळेची काही किंमत आहे की नाही?... आता अजून अर्धा तास थांबून राहू?... (बेंचवर बसलेल्या माणसाकडं बघतो.) ठीकाय, मी पण एक काम उरकून घेतो तोवर… शक्य तितक्या लवकर या. (फोन ठेवतो आणि परत येतो.) हां, तर कोण, आहेस तरी कोण तू?
माणूसः (मान वर न करता) साहेब, चुकी झाली. माफ करा.
इन्स्पेक्टरः (फोनवरचा राग त्याच्यावर काढतो. आवाज चढवून) जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं. नाव काय तुझं? कधीपासून आलास ह्या एरियात?
माणूसः (मान खालीच) मी… मी इथंच राहतो साहेब.
इन्स्पेक्टरः एऽऽ मला शिकवतो काय रे? गेली पाच वर्षं ह्याच एरियात आहे आपण. इथल्या गोट्या खेळणाऱ्या पोरांनासुद्धा नावानं ओळखतो हां. तू याआधी कधी दिसला नाहीस इकडं…
माणूसः मी… खरं सांगतो साहेब… मला… मला जाऊ द्या… (उठून पळून जायचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर झडप घालून त्याला पकडतो आणि पुन्हा बेंचवर बसवतो.)
इन्स्पेक्टरः हे बघ, तुझ्यासारखे छप्पन भुरटे चोर आत टाकलेत मी. माणसाचा चेहरा बघून ओळखतो आपण, त्याच्या मनात काय चाललंय ते… (त्याच्या जवळ जातो आणि त्याचा चेहरा वर करतो. काही क्षण निरखून पाहतो.) तुला बघितल्यासारखं वाटतंय कुठंतरी…
माणूसः (पुन्हा मान खाली घालतो) सांगितलं ना साहेब, मी इथलाच आहे…
इन्स्पेक्टरः गप रे! इथं नाही पाहिलेलं तुला. आणि गेल्या चार-पाच वर्षांत सुद्धा नाही. कुठंतरी पूर्वी भेटल्यासारखं वाटतंय. खरं सांग, कोण आहेस तू? कुठून आलास?
माणूसः जाऊ द्या ना साहेब, कशाला विषय वाढवताय. छोट्या-मोठ्या चोऱ्या करतो मी. ह्या रस्त्याला सामसूम असते संध्याकाळपास्नं. पोलिस-बिलिस कुणी फिरकत नाही आठनंतर…
इन्स्पेक्टरः (पटकन बोलून जातो) ते माहितीये मला…
माणूसः (मान वर करुन) आँ?
इन्स्पेक्टरः नाही… म्हणजे माझाच एरिया आहे ना, त्यामुळं माहिती आहेच मला - कुठं सामसूम असते, कुठं वर्दळ असते.
माणूसः (पुन्हा मान खाली घालतो) पण आजच कसं काय ह्या वेळेला आलात तुम्ही साहेब?
इन्स्पेक्टरः (आवाज चढवून) एऽऽ भुरट्या, आता माझी ड्युटी मी कुठं आणि कधी करायची हे तू सांगणार का रे मला?
माणूसः (मान वर करुन) तसं नाही साहेब, पण माझा हिशोब चुकला ना त्यामुळं.
इन्स्पेक्टरः तुझा हिशोब तर मीच जुळवणार आज… (बोलत बोलत त्याच्याकडं जाऊ लागतो. त्याचा चेहरा बघून पुन्हा थांबतो. बसलेला माणूस पटकन चेहरा फिरवतो.) तू खरं सांग कोण आहेस… तू…? (त्याला ओळख पटते पण विश्वास बसत नाही.)
माणूसः (मानेनेच होकार देतो.) होय, मीच आहे. मला माहिती होतं तू ओळखशील मला…
इन्स्पेक्टरः तू… तू खरंच राजूदादा आहेस? (त्याच्या शेजारी जाऊन त्याच्या चेहऱ्याकडं बघत बसतो.)
राजेशः (उठून उभा राहतो.) होय, मीच आहे राजेश घोडके. राजेश बळीराम घोडके. तुझा राजूदादा.
इन्स्पेक्टरः म्हणजे तू ओळखलं होतंस मला?
राजेशः होय, मगाशी त्या माणसानं पकडून दिलं ना मला तेव्हाच…
इन्स्पेक्टरः मग तोंड का लपवत होतास एवढा वेळ? ओळख का नाही सांगितलीस?
राजेशः (खिन्न हसतो) कुठल्या तोंडानं सांगणार? धाकट्या भावानं मोठ्या भावाला चोरी करताना पकडलं ही काय अभिमानाची गोष्ट आहे?
इन्स्पेक्टरः (उठून त्याच्या जवळ येतो. खांद्यावर हात ठेवतो.) दादा, अरे काय बोलतोयस तू? किती वर्षांनी भेटतोय अरे आपण… आठ? दहा?
राजेशः नऊ वर्षं झाली मला घर सोडून, बंटी. सॉरी… साहेब!
इन्स्पेक्टरः नाही नाही, बंटीच म्हण ना! किती वर्षांनी तुझ्या तोंडून माझं नाव ऐकतोय. आता कुणीच बंटी नाही म्हणत रे, सगळे बाळासाहेब म्हणतात. बाळासाहेब घोडके. (हसतो.) फक्त आई बाळ म्हणते…
राजेशः आई… कशी आहे रे आई? तुझ्यासोबतच राहते? की गावाकडंच आहे? आणि बाबा? आपले बाकीचे नातेवाईक? आपले मित्र? कसे आहेत सगळे?
बंटीः (शांतपणे चालत जाऊन बेंचवर बसतो.) तुला आठवतात का अजून… सगळे?
राजेशः म्हणजे काय! सगळ्यांची खूप आठवण येते. आईची, तुझी, मित्रांची, काका-काकू, मामा, आजी… सगळ्यांची… (बेंचवर जाऊन बसतो.)
बंटीः (कुत्सितपणे हसतो.) एवढीच आठवण येते तर आला नाहीस कधी भेटायला… एखादं पत्र नाही की फोन नाही… तू घर सोडून गेल्यावर आईची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना तरी आहे का तुला?
राजेशः मान्य आहे मला… मान्य आहे मी तुम्हा सगळ्यांना त्रास होईल असा वागलो. पण… पण मला घर सोडणं भाग होतं बंटी. मला असह्य झालं होतं त्या वातावरणात राहणं… बाबांचे काळे धंदे, पोलिसांच्या धाडी, टोळ्यांमधली भांडणं, घरी दारु आणि पत्त्यांचे अड्डे… मला लवकरात लवकर त्यातून बाहेर पडायचं होतं बंटी… मला बाबांच्या छायेत राहून त्यांच्यासारखा गुंड नव्हतं व्हायचं…
बंटीः मग काय व्हायचं होतं तुला? हा असा भुरटा चोर? निर्जन रस्त्याला एकट्या-दुकट्याला अडवून घड्याळं-मोबाईल चोरणारा भामटा बनायचं होतं तुला?
राजेशः (शरमेनं मान खाली घालतो.) मान्य आहे मला… माझे निर्णय चुकले असतील. जे ठरवलं ते करता आलं नसेल. पण… पण मगाशी तुझ्याकडं बघून मी ते सगळं विसरलो. तू तरी त्या चक्रातून सुटलास. तू पोलिस झालास बंटी… माझंदेखील स्वप्न होतं पोलिस इन्स्पेक्टर व्हायचं. लहानपणी आपल्याला, आईला मारहाण करणारे आपले बाबा फक्त पोलिसांच्या वर्दीला घाबरायचे. तेव्हापासून वाटायचं, आपण मोठं झाल्यावर पोलिस व्हायचं. आणि… आणि बळीराम घोडकेच्या टोळीचा नायनाट करायचा!
बंटीः दादा… काय बोलतोयस तू हे?
राजेशः होय बंटी, हे स्वप्न घेऊनच मी घराबाहेर पडलो. पण… (निराशेनं मान हलवतो.) बरं, ते जाऊ दे. आई… आई खूप खूष असेल ना रे? तिनं बिचारीनं सगळीच आशा सोडून दिली होती. मला… मला भेटवशील तिला? मी घरी येऊ तुझ्या?
बंटीः (डोळे पुसतो.) अरे, म्हणजे काय… घरी ना… हो हो… (फोन वाजतो. बंटी फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हॅलो… हो हो, तिथंच थांबलोय मी… या तुम्ही लवकर… किती वाजले काही कळतंय की नाही? (राजेशकडं बघतो.) आणि हो, जवळ आल्यावर मला फोन करा. डायरेक्ट येऊ नका, माझ्यासोबत आणखी कुणीतरी असेल… नाही नाही, काळजी नको… अहो, भाऊच आहे माझा… हो, सख्खा मोठा भाऊ आहे. खूप दिवसांनी भेटलाय ना, म्हणून जरा गप्पा चालल्यात… या तुम्ही. (फोन ठेवतो आणि परत येतो.)
राजेशः तुझं महत्त्वाचं काम आहे का काही?
बंटीः नाही… म्हणजे हो… एक्चुअली काहीजण भेटायला येणार आहेत.
राजेशः (संशयाने विचारतो) इथं?
बंटीः हो… म्हणजे जरा कॉन्फिडेन्शियल काम आहे. चौकीवर सगळी कामं नाही करता येत, म्हणून इथं… पण जास्त वेळ नाही लागणार. तू थांब इथंच. ते आले की मी जाऊन बोलतो आणि मग एकत्रच जाऊ घरी. ए मी आईला फोन करुन सांगू का, तू येणारेस म्हणून? (मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घालतो.) ती खूष होईल खूप.
राजेशः (बंटीचा हात धरतो.) नको नको, तिला सरप्राईज देऊ आपण. मी थांबतो. तू तुझं काम करुन घे.
बंटीः एक काम कर ना नाहीतर… मी तुला पत्ता सांगतो, तू डायरेक्ट घरीच जा. आईला भेट, गप्पा मार. मी येतो माझी ड्युटी संपवून.
राजेशः अरे नको, मला एकट्याला नको पाठवूस. माझी अजून मनाची तयारी नाही झाली तेवढी. मी भेटल्याचा आनंद होईल म्हणा आईला, पण मी कोण आहे हे कळाल्यावर तिला काय वाटेल सांगता येत नाही. ती कशी रिऐक्ट होईल माहिती नाही. त्यापेक्षा आपण सोबतच जाऊ.
बंटीः असं म्हणतोस? बरं, ठीकाय. मी आपलं तुला ताटकळत ठेवायला नको म्हणून म्हटलं… (अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतो.) ही समोरची पार्टी पण एवढा वेळ लावतीय ना… आत्तापर्यंत ड्युटी संपवून घरी गेलो पण असतो… (फोन वाजतो. बंटी फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हां हॅलो… पोचले का तुम्ही?... हो हो, थांबा तिथंच… आलोच मी रोड क्रॉस करुन… (फोन ठेवतो. राजेशकडं वळतो.) दादा, तू थांब इथंच. मी आलो काम उरकून. (गडबडीनं दुसऱ्या बाजूला निघून जातो.)
(बंटी गेल्याची खात्री करुन राजेश उठतो. कपडे झटकतो, शरीर ताणतो. त्याची चाल बदललेली असते. बंटी गेला त्या दिशेला बघत उभा राहतो. काही सेकंदातच पोलिस गाडीचा सायरन वाजतो. अचानक घाबरलेला बंटी धडपडत येतो आणि राजेशच्या अंगावर आदळतो.)
बंटीः दादा… दादा, पोलिस… पळ इथून, दादा… मेलो…
राजेशः (बंटीला घट्ट धरुन ठेवतो.) बंटी… अरे काय झालं तुला? तू स्वतः पोलिस आहेस, विसरलास काय?
बंटीः नाही दादा… मी… खोटं बोललो. मी पोलिस नाही… मी बाबांचाच धंदा चालवतोय… आपण दोघंही सारखेच आहोत, दादा. आपल्या रक्तातच हा धंदा आहे… तू चल, मी तुला सांगतो सगळं… आत्ता इथून निघ आधी… ते येतील… ते बघ आले… इकडंच आले ते…
राजेशः अरे पण त्यांच्याकडं गाडी आहे. तू किती लांब पळणार? त्यापेक्षा… तुझ्याकडं रिव्हॉल्व्हर आहे ना? चालव ना त्यांच्या गाडीवर… पंक्चर तरी कर…
बंटीः (राजेशच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपडतो, ओरडतो.) तुला समजत कसं नाही रे… मी खरा पोलिस नाही. ही वर्दी खोटी आहे, ही पिस्तूलपण खोटी आहे. तू… तू चल ना इथून…
राजेशः (शांतपणे पँटच्या मागे खोचलेलं रिव्हॉल्व्हर काढतो.) मग ही ट्राय करतोस?
बंटीः (राजेशच्या हातात पिस्तूल बघून अवाक् होतो. मागं मागं सरकत बेंचवर कोसळतो.) कोण… कोण आहेस तू?
राजेशः तू जसा खोटा पोलिस होतास ना, तसाच मी पण खोटा चोर होतो. (पिस्तूल बंटीवर रोखतो. खिशातून फोन काढतो. नंबर डायल करतो.) गुड इव्हिनिंग सर, एसीपी राजेश घोडके हिअर… येस्स सर, मिशन सक्सेसफुल! बळीराम घोडके टोळीचा म्होरक्या बाळासाहेब घोडके माझ्या ताब्यात आलाय… होय सर, मी त्यासाठीच थांबलो होतो. समोरच्या पार्टीच्या चारही जणांना आपली माणसं घेऊन गेलीत… होय सर, मी स्वतः बाळा घोडकेला घेऊन येतोय… थँक्यू सर, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलात म्हणूनच हे शक्य झालं… आता बळीराम घोडकेच्या टोळीचा नायनाट झालाच म्हणून समजा… ओक्के सर… गुड नाईट! (फोन ठेवतो. बंटीकडं बघतो आणि चालायला लागतो. बंटी मान खाली घालून त्याच्यामागे चालत जातो.)
© मंदार शिंदे 9822401246 (प्रयोगासाठी पूर्वपरवानगी आवश्यक)
No comments:
Post a Comment