"अवघड सोपे झाले हो..."
'बालभारती'च्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात नवीन पद्धतीनं अंकांचं शब्दलेखन दिलेलं आहे, त्याबद्दल -
१) मुलांना एक, दोन, तीन, चार असे बेसिक अंक आणि दहा, वीस, तीस, चाळीस असे युनिट अंक पटकन कळतात. त्यापुढं पुन्हा एक, दोन, तीन जोडून आकड्यांची रचना समजणं खरंच खूप सोपं जातं.
२) दुसरीच्या पुस्तकात, एकवीसच्या 'ऐवजी' वीस एक, बावीसच्या 'ऐवजी' वीस दोन, असं दिलेलं नाही. उलट, वीस एक 'म्हणजे' एकवीस आणि वीस दोन 'म्हणजे' बावीस असं स्पष्ट करुन मांडलेलं आहे. यामुळं मुलांना एकवीस म्हणजे नक्की किती आणि बावीस म्हणजे नक्की किती हे चांगलं कळेल. तिसरीच्या पुढं वीस एक, वीस दोन नसेल. हे फक्त सुरुवातीला समजावून देण्यासाठी आहे.
३) दुसरीच्या मुलांना 'जोडाक्षरांचा खूप त्रास नको' असं एक कारण या बदलासाठी दिलेलं आहे. पण जोडाक्षरं नको 'म्हणूनच' आकडे लिहायची पद्धत बदलली असा विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे. त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं.
४) नवीन पद्धतीनं 'मराठीचा गळा आवळला' वगैरे म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न - एकोणसाठ आणि एकोणसत्तर हे आकड्यात लिहिताना तुमचा स्वतःचा गोंधळ व्हायचा की नाही. अनेकांचा आजही होतो. त्यापेक्षा पन्नास नऊ आणि साठ नऊ जास्त लॉजिकल नाही का ? (माझ्या मोबाईल नंबरमध्ये शेवटी शेहेचाळीस - ४६ आहे. संपूर्ण नंबर मराठीत सांगितला तरी शेवटचं शेहेचाळीस म्हणजे 'फोर सिक्स' हे मी गेली सतरा वर्षं सांगत आलोय !)
५) आधीच्या पिढीला शाळेत पावकी, दिडकीचे पाढे शिकवले जायचे. ती पद्धत बंद झाल्यावर तेव्हाच्या लोकांनी असेच गळे काढले होते. आपण शाळेत पावकी, दिडकी शिकलो नाही, मग काय नुकसान झालं ? किंवा शिकून काय फायदा झाला असता कुणी सांगू शकेल काय ? आता आपल्या मुलांसाठी काहीतरी सोपी पद्धत येतीय म्हटल्यावर आपण स्वागत करण्याऐवजी विरोध का करतोय ?
६) मोबाईलमुळं फोन नंबर लक्षात ठेवायची शक्ती नष्ट झाली, कॅल्क्युलेटरमुळं आकडेमोड करायची ताकद संपली, कॉम्प्युटरमुळं हातानं लिहायची सवय मोडली, अशा तक्रारी करणाऱ्यांनी मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर बहिष्कार का नाही टाकला ? ही दांभिकता मुलांच्या फायद्याच्या आड का आणतोय आपण ?
७) दुसरीच्या पुस्तकात आकडे अक्षरांत लिहायची पद्धत बदलली, याला राजकीय रंग देणं तर महादुर्दैवी आहे. गणिताचं पुस्तक तयार करणाऱ्या समितीवर कोण आहे, तेवढी तरी माहिती घेऊन मगच त्यावर कॉमेंट करावी, ही विनंती.
८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही नवीन पद्धत एकदा आपल्या मुलांना दाखवा आणि त्यांचं मत विचारा. मला अशा पद्धतीनं गणित शिकवलं असतं तर कदाचित मलाही तो विषय आवडला असता. असो.
मुलांच्या मनाचा विचार करुन, भाषेच्या खोट्या अस्मितेकडं दुर्लक्ष करुन, अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीत धाडसी प्रयोग करणाऱ्या 'बालभारती'चे आणि विशेषतः डॉ. मंगला नारळीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
- मंदार शिंदे
(नव्वद-आठ वीस-दोन चाळीस बारा चाळीस-सहा)
![]() |
(वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.) |

No comments:
Post a Comment