ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 29, 2019

खुर्च्या

खुर्च्या

त्या अवाढव्य प्रेक्षागृहामध्ये
एकटा मी
स्टेजवर उभा राहून
समोर पहात होतो -
खुर्च्या... फक्त खुर्च्या...
अस्तित्वाच्या टोकापर्यंत
क्षीण होत जाणाऱ्या उजेडात
नुसत्या खुर्च्या...
रिकाम्या...
आणि तरीही सचेतन
नुकत्याच उठून गेलेल्या माणसांपेक्षाही
भयानक सचेतन
स्वतःचं भानामती विश्व
निर्माण करणाऱ्या
क्रूर...
स्टेजकडे एकटक पाहणाऱ्या
नि:शब्द... निर्दय...
हजारो माणसांची कलेवरं
प्रेक्षालयाच्या दरवाजाबाहेर
फेकून देणाऱ्या...
राक्षसिणी...
जागेवरून उठत नव्हत्या
करकचून बसलेल्या
आणि तरीही पसरत होत्या
सार्‍या हवेमध्ये
तडजोड नसलेल्या द्वेषाने...
मी चटकन विंगमध्ये गेलो
आणि जाता जाता ऐकला
हास्याचा एक प्रचंड स्फोट
गलिच्छ तिरस्काराने,
निथळलेला,
जो होता माझ्यासाठी
आणि त्या सर्वांसाठीही
जे खुर्च्यांवर बसून गेले होते
भूतकाळात
आणि बसणार होते
भविष्यकाळातही.

- कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment