ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, July 5, 2019

असंस्कृतपणे वागण्याचे परिणाम

(मॅनेजमेंट विषयातील संशोधक क्रिस्टीन पोरॅथ यांचं टेड डॉट कॉम वरील भाषण)

असंस्कृतपणे वागण्याचे लोकांवर काय परिणाम होतात, याचा मी अभ्यास करते.

असंस्कृतपणे वागणं म्हणजे काय ?

दुसऱ्यांचा आदर न करणं किंवा उद्धटपणाने वागणं. यामध्ये वागण्याच्या निरनिराळ्या तऱ्हांचा समावेश होतो - जसं की, एखाद्याची नक्कल करणं किंवा त्याला/तिला कमी लेखणं, किंवा लोकांना बोचेल अशी चेष्टा करणं, किंवा एखाद्याचे मन दुखावणारे विनोद सांगणं, वगैरे.

म्हणून मग आम्ही असंस्कृतपणे वागण्याचे लोकांच्या कामगिरीवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास सुरू केला. आणि आम्हाला जे दिसून आलं, त्यानं आमचे डोळे उघडले.

आम्ही बिझनेस स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांना एक सर्वे पाठवला. ते सर्वजण निरनिराळ्या कंपन्यांमध्ये काम करीत होते. आम्ही त्यांना काही वाक्यं लिहिण्यास सांगितली - अशा एका अनुभवाबद्दल, जेव्हा त्यांच्याशी कुणीतरी उद्धटपणे वागलं होतं, त्यांचा अपमान केला होता, त्यांच्या भावना दुखावेल असं वागलं होतं. आणि यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही विचारलं.

एका व्यक्तीनं आम्हाला त्यांच्याशी अपमानकारक भाषेत बोलणाऱ्या बॉसबद्दल सांगितलं. ते म्हणायचे, "हे तर एखाद्या बालवाडीतल्या मुलालासुद्धा जमेल." आणि दुसर्‍या एका बॉसनं कुणाच्यातरी कामाचे कागद संपूर्ण टीमसमोर फाडून टाकले होते.

आम्हाला असं लक्षात आलं की, या असंस्कृत वागण्यामुळं लोकांची काम करण्याची प्रेरणा कमी होत होती: ६६% लोकांनी त्यानंतर काम करताना घेत असलेले प्रयत्न कमी केले. जे घडलं त्याबद्दल चिंता करण्यात ८०% लोकांचा वेळ वाया गेला, आणि १२% लोकांनी ती नोकरीच सोडून दिली.

सिस्को कंपनीने हे आकडे वाचले आणि अंदाज बांधला की, अशा असंस्कृत वागण्यामुळं त्यांना वर्षाला एकंदर १२ दशलक्ष डॉलर्स एवढी किंमत मोजावी लागत होती.

पण तुम्हाला स्वतःला असा अनुभव आलेला नसेल तर काय ? तुम्हाला असं काही घडताना फक्त बघायला किंवा ऐकायला मिळालं असेल तर ?

दुसऱ्या एका संशोधनामध्ये आम्ही, एका छोट्या समूहातील एक सहकारी दुसऱ्याचा अपमान करत असताना त्याचे इतरांवर होणारे परिणाम तपासले. आणि त्यातून आम्हाला खरोखर आश्चर्यकारक गोष्ट कळाली. ती म्हणजे, अशी काही घटना घडताना बघणार्‍यांची कामगिरीदेखील खालावलेली होती, आणि थोडीफार नव्हे, तर बऱ्यापैकी लक्षात येण्यासारखी.

असंस्कृतपणा हा एखाद्या रोगासारखा आहे. तो संसर्गजन्य असतो आणि आपणसुद्धा नकळत त्याचे वाहक बनतो, फक्त त्याच्या आजूबाजूला असल्यामुळे.

मग जर असंस्कृतपणाची एवढी मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असेल, तरीदेखील आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही तसे वागताना लोक का दिसतात ?

सगळ्यात पहिलं कारण आहे तणाव. लोक कशामुळं तरी दडपून गेले आहेत, घाबरून गेले आहेत.

लोकांनी सुसंस्कृतपणे न वागण्यामागं आणखी काय कारण असू शकेल ? त्यांना कदाचित असं वाटतं की, सुसंस्कृतपणे वागल्यामुळं इतर लोक त्यांचं नेतृत्व मान्य करणार नाहीत. ते विचार करतात की: चांगलं वागणारी व्यक्ती नेहमी मागेच राहते ना ? खरंतर दीर्घकाळाचा विचार केल्यास, चांगल्या व्यक्ती मागे पडलेल्या दिसत नाहीत.

एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सहकाऱ्यांना आणि मला असं दिसून आलं की, सुसंस्कृत दिसणाऱ्या व्यक्तींकडं इतरांपेक्षा दुप्पट वेळेला लीडर म्हणून बघण्यात येत होतं, आणि ते लक्षणीय प्रमाणात चांगली कामगिरी बजावत होते.

सुसंस्कृतपणा मूल्यवान का आहे ? कारण लोक तुम्हाला एक महत्त्वाची आणि एक ताकदवान व्यक्ती समजू लागतात - दोन महत्त्वाच्या गुणांचं असामान्य मिश्रण: आपुलकीनं वागणारे आणि कामासाठी सक्षम, मित्रत्वानं वागणारे आणि स्मार्ट देखील.

तर मग सुरुवात कुठून करायची ? लोकांचा आत्मसन्मान कसा जागा करता येईल ? तर एक चांगली गोष्ट म्हणजे, हे करण्यासाठी खूप मोठा बदल करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडू शकतो. मला असं लक्षात आलं की, लोकांचे आभार मानणं, त्यांच्या कामाचं श्रेय त्यांना देणं, लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकणं, नम्रपणे प्रश्न विचारणं, इतरांची दखल घेणं, आणि हसतमुख राहणं, या सगळ्यांचा खूप मोठा प्रभाव पडतो.

माझ्या अभ्यासातून मला कळलेली गोष्ट म्हणजे, जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण अधिक सुसंस्कृत असेल, तेव्हा आपण जास्त कार्यक्षम असतो, जास्त क्रिएटिव असतो, इतरांना मदत करण्याची जास्त तयारी दाखवतो, आपण जास्त आनंदी असतो, आणि जास्त निरोगीदेखील असतो. आपण अधिक चांगलं आयुष्य जगू शकतो.

आपल्यापैकी प्रत्येकानं थोडासा जास्त विचार केला तर, कामाच्या ठिकाणी, घरी, ऑनलाईन, शाळांमध्ये आणि आपल्या समाजामध्ये आजूबाजूला असलेल्या इतर लोकांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

प्रत्येक वेळी संवाद साधताना या गोष्टीचा विचार करा: तुम्हाला नक्की कसं वागायचं आहे ? सुसंस्कृतपणे की असंस्कृतपणे ?


Share/Bookmark

No comments:

Post a Comment