किचनमधल्या सिंकमधे भांडी घासत होतो. दहा-बारा छोटी-मोठी भांडी घासायची होती. अचानक सिंकच्या जाळीत काहीतरी अडकून बसलं. पाणी खाली जाईना. काय अडकलंय ते बघायचा / काढायचा कंटाळा केला. म्हटलं, बघू सगळी भांडी घासून झाल्यावर...
भांडी घासली, धुतली. सिंकमधली पाण्याची लेव्हल वाढत गेली. शेवटी एकदम जाईल सगळं पाणी, असं वाटत होतं. सगळी भांडी झाल्यावर जाळीत अडकलेली कोथिंबिर वगैरे काढून टाकली. लगेच पाणी भसाभस ड्रेन व्हायला लागलं. काम झालं असं वाटत असतानाच पायाखाली ओल जाणवली...
खाली वाकून बघितलं तर, ड्रेनेज पिटमधून पाणी ओव्हरफ्लो होत बाहेर आलेलं. किचनच्या फरशीवर पाणी पसरु लागलं. वर सिंकमधे तुंबलेलं पाणी झपाट्यानं कमी होत होतं, पण ड्रेनेज पिटमधून वाहून न जाता उसळून बाहेर येत होतं...
खाली ठेवलेल्या वस्तू पटापट उचलून वर ठेवल्या. भांड्यांचं रॅक, मोठे डबे, गॅस सिलिंडर, वाट फुटेल तिकडं पाणी पसरत होतं. कपडे टाकून, मॉप फिरवून, भांड्यानं बादलीत भरुन, पसरणारं पाणी कन्ट्रोल करायचा प्रयत्न केला. पण व्हायचं ते नुकसान झालंच...
ड्रेनेज पिटमधून पाणी वाहून जायला छोटीशीच जागा आहे. पण दिवसभरात पन्नास-साठ भांडी घासली तरी त्यातून पाणी वाहून जातं. मग आता तर दहा-बाराच भांडी घासली होती. तरी ओव्हरफ्लो का झाला ?
ड्रेनेज पिटमधून पाणी वाहून जायच्या कपॅसिटीचा प्रश्नच नाहीये. सतत थोडं-थोडं पाणी जात राहीलं असतं, तर असं घडलं नसतं. पण सिंकमधे आधी पाणी तुंबू दिलं आणि नंतर एकदम भसकन सोडून दिलं, तेव्हा ड्रेनेज पिटमधून ते बाहेर आलं. दहा-बारा भांडी घासल्यावर किती पाणी साठेल याचा विचारच केला नाही. नंतर एकदम एवढं सगळं पाणी कसं वाहून जाईल, याचाही विचार केला नाही. पाणी इकडं-तिकडं पसरायला लागल्यावर विचार करणं आपोआपच बंद झालं...
सांगली-कोल्हापूरची पूरपरिस्थिती समजून घ्यायचा विचार करतोय. अजून पुण्यातच आहे. एकदा तिकडं गेलो की कदाचित हे विचार बंद होतील, म्हणून आधीच विचार करुन ठेवतोय. लिहूनसुद्धा ठेवतोय. पुढं-मागं उपयोगच होईल, झाला तर...
- मंदार शिंदे 9822401246
(१०/०८/२०१९)
No comments:
Post a Comment