तुम्ही लिहिलेलं डिलीट करता येत नाहीये, सेव्हदेखील करुन ठेवता येत नाहीये. दोन दशकांपासून माझ्यातला थोडा-थोडा भाग तुमच्यापर्यंत कुठल्या न कुठल्या रूपात पोहोचत राहिलाय, आज ते सगळं तुमच्या संदेशांद्वारे फिरुन माझ्याकडं परत आलंय. कित्येक महिने प्रवास करुन एक मोठी नाव जणू पुन्हा किनाऱ्याला लागलीय. तुमच्या हजारो मेसेजेसमधून माझी कित्येक वर्षं फिरुन परत आलीत, असं मला वाटतंय. प्रेम, कृतज्ञता आणि काळजीनं प्रत्येक मेसेज भरलेला आहे. त्या मेसेजेसमध्ये माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके मला जाणवताहेत. ज्यामध्ये तुमचा प्राण असेल, ती गोष्ट तुम्ही डिलीट कशी करु शकता ? इच्छा असूनही सर्वांना उत्तर देऊ शकत नाहीये.
व्हॉट्सऐपवर सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपले संदेश पाठवलेत. शेकडो ई-मेल्स आल्यात. एसेमेस आहेत. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंट्स आहेत. असं वाटतंय की, तुम्ही सगळ्यांनी मला आपल्या मिठीत घेतलंय. कुणी सोडायलाच तयार नाही, आणि मीसुद्धा सुटायचा प्रयत्न करत नाहीये. रडत नाहीये, पण काही थेंब बाहेर येऊन कोपऱ्यात गर्दी करुन बसलेत. हा सोहळा बघताहेत. बाहेर येत नाहीयेत, पण आतसुद्धा जायला तयार नाहीयेत. तुम्ही श्रोत्यांनी आणि वाचकांनी मला तुमच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात या थेंबांसारखं जपून ठेवलंय.
तुम्हा सगळ्यांचं प्रेम पहाटेच्या हवेसारखं वाटतंय मला. कधी-कधी असं होतं ना, रात्र परतीला लागलेली असते आणि सकाळ यायची असते. त्याच वेळी, रात्रीच्या ऊबेमध्ये न्हायलेली हवा थंड होऊ लागते. ती जाणवू लागताच तुम्ही तिच्या जवळ-जवळ जाऊ लागता. फुला-पानांचा सुगंध श्वासांत भरुन घेण्यासाठी हा सर्वांत सुंदर क्षण असतो. पहाटेचं आयुष्य खूप छोटं असतं, पण प्रवासाला निघण्यासाठी नेमकी हीच योग्य वेळ असते. कालपासून मी माझ्या आयुष्यातल्या याच क्षणामध्ये थांबून राहिलोय. पहाटेच्या हवेसारखा थंड झालोय.
मला खूप चांगलं वाटतंय. आजूबाजूला माझ्यासारखेच लोक आहेत. तुमच्यासारखाच आहे मी. माझा आनंद तुमच्यामुळंच आहे. माझ्या आनंदाचं रक्षण करणारे, डोळ्यांत तेल घालून जपणारे एवढे सारे लोक आहेत. तुमच्या आठवणींमध्येच मी सुरक्षित आहे. तुमच्या शुभेच्छांमध्ये. तुमच्या प्रार्थनेमध्ये. तुम्ही मला सुरक्षित करुन ठेवलंय. तुमच्या मेसेजेसचे, तुमच्या प्रेमाचे आभार मानणं शक्य नाही. फक्त तुमचा होऊन जाणं शक्य आहे. मी तुम्हा सर्वांचा झालोय. मी माझा उरलोच नाही. आता तुम्हीच सांभाळून घ्या मला. माझं आयुष्य गहाण आहे तुमच्याकडे, अशाच कुठल्या तरी प्रसंगी परत देत रहा.
शुभेच्छांबद्दल आभार नाही मानू शकत. या केवळ शुभ-इच्छा नाहीत, तुम्ही माझ्या गालांवरुन हात फिरवलेत, माझ्या केसांमधून बोटं फिरवलीत, माझी पाठ थोपटलीत, माझा हात हातात घेऊन प्रेमाने दाबलात. तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलंय, मलाही तुम्हाला प्रेमच द्यायचंय. तुम्ही सारे किती प्रेमळ आहात. माझे आहात.
- रवीश कुमार ०३/०८/२०१९
(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)
No comments:
Post a Comment