सांगलीत कृष्णा नदीला आलेल्या महापुराचं पाणी नगर वाचनालयात शिरल्यानं हजारो पुस्तकांचं नुकसान झाल्याची बातमी वाचली.
मी सांगली जिल्हा नगर वाचनालयाचा भाग्यवान लाभार्थी आहे.
दिवसा वाचनालयात बसून एक पुस्तक संपवायचं आणि संध्याकाळी घरी जाताना दुसरं घेऊन जायचं, असं अनेक वर्षं केलंय. अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकं त्यावेळी दुकानातसुद्धा मिळायची नाहीत, ती या वाचनालयात वाचायला मिळायची. जगभरातल्या लेखकांची नावं, साहित्य प्रकार, सगळ्याची ओळख इथूनच झाली, असं म्हणता येईल.
सकाळी शाळेत जाण्यापूर्वी वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर वर्तमानपत्र विभागात न चुकता जायचो. त्यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स' सांगलीत दुपारी पोहोचायचा. 'संडे ऑब्झर्व्हर'सारख्या प्रकाशनांच्या सांगलीत मोजून चार-पाच प्रती यायच्या. नगर वाचनालयात मात्र रोजच्या रोज हे सगळं वाचायला मिळायचं. इराक-इराण युद्ध आणि १९९६ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी जुने संदर्भ शोधण्यामध्ये नगर वाचनालयाकडून खूप मोठी मदत मिळाली होती. 'पुढारी'च्या ऑफीसमधून सांगितलं होतं की, आमच्याकडं 'पुढारी'चे जे जुने अंक मिळणार नाहीत, ते नगर वाचनालयात नक्की मिळतील. आणि तसाच अनुभव आला. एकच बातमी निरनिराळ्या वृत्तपत्रात कशी सादर करतात, हे बघायची सवयही तेव्हापासूनच लागली.
याच वाचनालयाच्या हॉलमध्ये वसंत बापट, मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांना ऐकता, भेटता आलं.
वाचनालयात अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत (होती), जी बाहेर वाचनासाठी देत नसत. तिथं बसूनच वाचावी लागत. त्यामुळं पुस्तक वाचताना नोट्स काढायची सवय लागली. शाळा-कॉलेजमध्ये तर या सवयीचा फायदा झालाच, पण अजूनही ही सवय टिकून आहे. विकत आणलेल्या पुस्तकातून निवडक भाग पुन्हा डायरीत लिहून कशासाठी घ्यायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांना या सवयीचं मूळ आणि महत्त्व सांगून समजणार नाही.
वाचलेल्या पुस्तकांचा सारांश लिहिणं, पुस्तकांमधून संदर्भ शोधून भाषण करणं, ठराविक दिवसांत जास्तीत जास्त पुस्तकं वाचून त्यावरील स्पर्धेत भाग घेणं, असे अनेक उपक्रम नगर वाचनालयात चालायचे. मला आठवतंय, एका पुस्तक वाचन स्पर्धेत मी विद्यार्थी म्हणून नोंदणी केल्यानं मला 'बालसाहित्य विभागा'त एन्ट्री दिली होती. पण मी वाचनालयाच्या व्यवस्थापनाला आणि स्पर्धेच्या आयोजकांना खूप विनंती करुन 'सर्वसाधारण विभागा'त एन्ट्री मिळवली होती. (आणि दुसरं की तिसरं बक्षिसही मिळवलं होतं.)
सांगलीतच वि. स. खांडेकर वाचनालय, गणेश वाचनालय, महात्मा गांधी वाचनालय, अशी आणखी महत्त्वाची वाचनालये आहेत. आग, पूर, भूकंप अशा आपत्तींपासून या खजिन्यांचं रक्षण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत, असं मनापासून वाटतं. तळमजल्यावरुन पुस्तकं वरच्या मजल्यांवर हलवणं, आगरोधक मटेरियल वापरुन पुस्तकांचे रॅक / कपाटं / फर्निचर बनवणं, नियमितपणे इमारतींचं फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणं, यासाठी व्यवस्थापनानेच नव्हे, तर वाचकांनीही पुढाकार घ्यायची गरज आहे.
- मंदार शिंदे 9822401246
१६/०८/२०१९

No comments:
Post a Comment